मराठी निबंध

         आई    / माझी आई


       आज सकाळी मंदिरात जाताना कानावर शब्द आले,

         “आई तुझ्या मूर्ति वाणी

             या जगात मुर्ती नाही

            अनमोल जन्म दिला ग आई

           तुझे उपकार फिटणार नाही”

   मागे वळून बघितले, तर उशिरा का होईना पण सकाळी- सकाळी वासुदेव  आपल्या चिपळ्या वाजवत आणि डोक्यावरची मोरपिसांची टोपी हलवत मंजुळ आवाजात गात होता. गाण्यांमध्ये इतकं प्रेम आणि त्याच्या आवाजात इतका गोडवा होता की, काही क्षणांसाठी माझी समाधीच लागली. गाणं संपताच समाधी संपली. पण विचारचक्र सुरू झाल. मंदिरात दगडाच्या मूर्तीचे दर्शन घ्यायला आपण दररोजच जातो पण घरातल्या जिवंत हाडामासाच्या देवाचं दर्शन तर आपण कधी घेतच नाही.

          सकाळच्या पहिल्या प्रहरापासून हा “आई” नावाचा देव आपल्या बाळाच्या उज्वल आरोग्यासाठी, भविष्यासाठी कामाला लागतो. आईला देवा पेक्षाही श्रेष्ठ मानले गेलेले आहे. अध्यात्म किंवा धर्मशास्त्रातही आईच्या पूजेला देवपुजे पेक्षाही महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आई-वडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या श्रावण बाळाचे आजही शेकडो वर्षानंतर मोठ्या आदराने नाव घेतले जाते

      स्वामी विवेकानंदांनी आईची महती सांगताना असे म्हटले आहे की

“ स्वामी तिन्ही जगाचा

 आईविना भिकारी”

म्हणजेच तिन्ही जगाचा स्वामी जरी असला तरी तो आईच्या प्रेमा विना भिकारीच असतो आई आपल्या मुलांवर निर्व्याज व निरपेक्ष प्रेम करत असते. नऊ महिने बाळाला आपल्या पोटात सांभाळते. दोन अडीच किलो वजनाच्या मांसाचा गोळा इतके दिवस पोटात वागणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. नऊ महिने बाळाला आपल्या पोटात  सांभाळते . आईच्या हाडामासाचातूनच आपल्या    हाडामासाची  निर्मिती . बाळाच्या जन्माच्या वेळी होणाऱ्या प्रसववेदना  तिला तिच्या बाळावर प्रेम करण्यास कारणीभूत ठरत असावेत असे मला वाटते; कारण संकटातुन व अडचणीतून मिळालेल्या वस्तूंचे मोल अधिक वाटते .

        संपूर्ण पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी आईचे उपकार त्यावर लिहिले जाणार नाही . आपल्या मुलाचे कधीही वाईट होऊ नये अशी एक सहजप्रवृत्तीच असते तिची. आपल्या शरीराच्या कातडीचे जोडे करून जरी आईच्या पायात घातले तरीही तिचे उपकार फिटणे अशक्य म्हणून म्हणतात

            “ ।न ऋण जन्मदेचे फिटे।”

     आपल्या मुलांवर प्रेम करणे एवढे एकच तत्व आईला माहित असतं. मुलगा कसाही असो उलट हुशार मुलांपेक्षा मूर्ख मुलावर आईचे जास्त प्रेम  असते असे म्हणतात

       अनेक ठिकाणी मुलांनी आईला त्रास दिल्याच्या किंवा छळल्याच्या  बातम्या वर्तमानपत्रांमधून , दूरदर्शनवरून ऐकायला , पहायला मिळतात. अशा मुलांना केवळ कपाळकरंटेच म्हणावे लागेल . आईच्या महत्त्वाचे  गुणगान गाताना  संत मुनीजन थकले ; आणि आपल्या देशात जिथे

“मातृ देवो भव पितृ देवो भव”

    असे म्हटले जाते तिथे आईची  अशी दुर्दशा.

      आज गावागावांमध्ये विशेष करून शहरांमध्ये वृद्धाश्रम स्थापन झालेले दिसतात आणि या वृद्धाश्रमांमध्ये अनेक मातांना आपली मुले सोडून जातात. विशेष करून यापैकी जवळ-जवळ सगळेच मोठ्या घरातली व उच्च पदस्थ नोकरीत असणारी मुले दिसुन येतात. मग काय फायदा अशा शिक्षणाचा त्यामुळे आईची किंमतही कळु. नये यापेक्षा कमी शिकलेली खेड्यातली माणसे कितीतरी पटीने चांगली.

      आज आपण सर्वांनी  मनाशी पक्के ठरवून घेऊया की, काहीही झाले तरी आपल्या आईला अंतर द्यायचे नाही कारण आई हाच खरा देव आहे.

             धन्यवाद

💐💐💐💐💐💐💐💐💐


 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

         कृपया  ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल ,  आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .

निबंध कसा वाटला याविषयी नक्की कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका


 


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने