1001marathiessay.blogspot.com
आपण जगत असताना या जीवनामध्ये् विविध प्रकारचेेेेे अनुभव आपल्याला येतात . या अनुभवातूनच माणसाचे व्यक्तिमत्व घडत जातं आणि मनुष्य संपन्न होत जातो .असाच एक प्रसंग आज या निबंध मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
हा प्रसंग माझ्या बरोबर प्रत्यक्षात घडलेला आहे; म्हणून तो माझ्या मनावर आजन्म तसाच कोरलेला राहील . या अनुभवामुळे सुरुवातीला काही दिवस मला आमच्या घरामध्ये तसेच इतरही सगळीकडे खूप भीती वाटायची. तुमच्याही आयुष्यात असे प्रसंग घडले असतील .
चला तर मग माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो .
निबंंधाचे नाव आहेे
मी पाहिलेला अपघात
माझ्या गावाचे नाव पिंपळनेर आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेलं एक छानसं गाव .मला आजही आठवतो शनिवारचा दिवस होता. सकाळची शाळा होती. नेहमीप्रमाणेच माझी आई मला शाळेत सोडण्यासाठी आलेली होती. हा आईचा नित्यनेम होता .मला सकाळी आई तयार करून शाळेत सोडण्यासाठी येत असे . शाळा सुटली की संध्याकाळी पाच वाजता आई गेटवरच उभी असलेली मला दिसायची .आणि मग मी शाळेच्या गेट पासून आईचा हात धरला की आम्ही गप्पा मारत घरी यायचो .आई आजूबाजूच्या छान छान गोष्टी यांची माहिती मला द्यायची .
आज शनिवार असल्यामुळे शाळा सकाळी होती . मला उठण्यासाठी ही उशीर झाला होता ;म्हणून आईने घाईघाईने माझी आंघोळ करून मला नाश्ता खाऊ घातला. घरी पाहुणे आले होते म्हणून आई मला बोलली ,'"बाळा आज तू एकटाच शाळेत जा .जमलं तर मी तुला घेण्यासाठी येईल ;नाहीतर आजच्या दिवस शाळेतून घरी एकटाच ये ." मी थोडा नाराजच झालो ;कारण शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी सकाळी थंडी वाजायची मग आई मला अलगद कडेवर उचलून घ्यायची. तसा मी काही हलका नव्हतो. कारण मी त्या वेळेस इयत्ता तिसरी मध्ये शिकत होतो ;आणि घरच्यांच्या प्रेमामुळे माझी तब्येतही चांगली होती . आईच्या कुशीत आईच्या कडेवर बसून शाळेत जाण्यात एक वेगळीच मजा होती .आई मला छान गोष्टी सांगत सांगत शाळेत घेऊन जात असे . आज आई येणार नव्हती म्हणून मी थोडा नाराजच झालो .थोडा नाराज का होईना पण मी दप्तर पाठीवर अडकवलं आणि घरातून बाहेर पडलो .डाव्या बाजूने रस्त्याच्या कडेने चालत चालत निघालो. हे मला आईनेच सांगितले होते .जात असताना आमच्या शाळेजवळूनच जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापर्यंत मी येऊन पोहोचलो. रस्ता ओलांडताना कोणती काळजी घ्यावी हे मला आईने चांगल्या पद्धतीने शिकवून ठेवलेलं होतं.
मी रस्त्याच्या पलीकडे गेलो आणि बघतो तर काय माझ्या वर्गातील माझा आवडता मित्र समीर सायकल शिकत होता .त्याच्याच घराजवळील दोन मुलं सायकल दोन्ही बाजूने धरून हळूहळू पुढे ढकलत होते . समीर सीटवर बसून हळूहळू पेडल मारत होता .अर्थात सायकल चा पूर्ण भार दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या त्याच्या मित्रांनीच धरलेला होता .ते बघून मी समीरला सांगितले ,"समीर आज शाळेत येत नाहीस का ? आणि हो, या रस्त्याच्या कडेने इथेच सायकल चालवायचा प्रयत्न करू नकोस हायवे आहे .इथे गाड्या भरधाव वेगाने जातात आणि ही दोघं मुलंही तुझं वजन चांगलं पेलू शकत नाही ." पण समीर म्हणाला," काही अडचण नाही ,आज मी काही शाळेत येणार नाही आणि रस्त्यावर वाहने आली तर ती आतल्या बाजूने जातात आम्ही रस्त्याच्या कडेकडेने हळूहळू सायकल शिकणार आहोत .""ठीक आहे पण काळजी घे "असे सांगून मी शाळेच्या दिशेने निघून गेलो.
शनिवार मुळे आज पहिला तास शारीरिक शिक्षणाचा झाला . कवायती झाल्या. त्यानंतर मराठी गणिताचा तास होऊन मधल्या सुट्टीची वेळ झाली .तितक्यात आमच्या शाळेतील शिपाई काका वेगाने धावत आले व आमच्या वर्ग शिक्षकांना सांगू लागले की ,"आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अपघात झालेला आहे पटकन चला ."माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली; आणि मनात नको ते विचार येऊ लागले. दहाच मिनिटात मुख्याध्यापकांच्या ऑफिस मधून निरोप आला .शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे. मात्र आजच्या सुट्टी ची बातमी ऐकूनही आम्हाला आनंद होत नव्हता. त्याउलट मनामध्ये भीतीमय वातावरण दाटले होते .हृदयाची धडधड वाढली होती . विचारांचे काहूर माजले होते .मला तर समीर शिवाय दुसरे काही सुचतच नव्हते .प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटमधून सावकाशपणे बाहेर जायला सांगितले .अपघाताची बातमी ऐकून बऱ्याच मुलांचे पालक त्यांना घेण्यासाठी आले होते. शिक्षकांनी मुलांना पालकांच्या स्वाधीन करून अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली .मी मात्र तसाच घाबरलेलो होतो.
अपघात झालेल्या ठिकाणी गर्दीतन सावकाश रस्ता काढत मी पुढे पोहोचलो. तर माझ्या पायाखाली कसला तरी ओलावा मला जाणवला. खाली बघितलं तर माझा पाय रक्तात पडलेला होता. मी चटकन घाबरून पाय मागे घेतला. अरे समोर बघतो तर काय समीर रस्त्यावर सायकली सह त्याच्या डोक्यावरून ट्रकचे एक चाक चालून गेले होते. ट्रक तिथे जागेवर थांबलेला होता व चाकाच्या मागच्या बाजूला समीरचा मेंदू निघून बाहेर पडलेला होता. लोकांचे चर्चा चालू होती सायकल शिकत असताना आजूबाजूच्या दोन्ही पोरांनी गाडीला घाबरून सायकल सोडली . सायकल पडल्यामुळे समीर गाडीखाली सापडला. हे ऐकून मात्र मला खूपच घाबरल्यासारखे झाले. कारण मी समीरला याबाबतीत सकाळी शाळेत जातानाच काळजी घ्यायला सांगितले होते .
हा विचार करत असतानाच अचानक माझ्या मागून माझ्या पाठीवर दोन हात आले. त्या हातांनी माझ्या हाताखाली जाऊन मला लगेच उचलून घेतले .मी भानावर आलो आणि बघितले तर आईने मला कवटाळून छातीशी धरले होते. तिच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा लागलेल्या होत्या, कारण माझ्या सारखेच तिच्या मनात अनेक शंकाकुशंका येऊन गेलेल्या होत्या ,
मी आईचे डोळे पुसले व आईचा खांद्वयारच डोके ठेवून डोळे बंद करून रडू लागलो. घरी आल्यावर जवळपास एक आठवडा भर मला झोप लागली नाही .मला सतत माझा मित्र समीर दिसत असे .आम्ही घालवलेले आनंदाचे क्षण मला आठवत असत . अचानक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला समीरचा तो देहही मला आठवत होता.
आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अगदी तसाच जिवंत आहे आणि तो अपघात मी कधीही विसरणार नाही.
मित्रांनो हा निबंध माझ्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत आहे .तुमच्याही आयुष्यात यापेक्षा वेगळ्या अनेक घटना घडल्या असतील.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.