1001marathiessay.blogspot.com
झाडे लावा झाडे जगवा
| zade lava zade jagva marathi essay
झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा आपण सगळीकडे ऐकतो . विशेषत: आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी या घोषणा अनेकदा कानी पडतात. चला तर मग आता यावर आधारित एक छानसा निबंध बघूया.
| झाडे लावा झाडे जगवा
| jhade lava jhade jagva marathi essay
हिरवे हिरवेगार झाडे आपल्या मनाला मोहून टाकतात .झाडाखाली बसून मिळणाऱ्या सावलीचा आनंद काही वेगळाच. थकून-भागून जेव्हा माणसाचा जीव नको नकोसा होतो त्यावेळी झाडाखाली बसल्यानंतर ते झाड जणू हळुवार मायेची फुंकर घालून आपला त्रास नाहीसा करते. पण माणूस काही झाडांना त्रास द्यायचे बंद करत नाही
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की झाडे लावण्याची धावपळ सुरू झालेली दिसते. झाडे लावली जातात परंतु झाडे जतन करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात नाही आणि मग विनोदाने असे म्हणावे लागते की दरवर्षी झाडे लावावी लागतात पण दरवर्षी खड्डा मात्र एकच असतो .
एक गोष्ट लक्षात ठेवा , "झाडे लावून जतन केली नाहीत तर आपल्याला एक दिवस खड्ड्यात नक्कीच जावे लागेल" यात तिळमात्र शंका नाही झाडे म्हणजे एक प्रकारे आपले गुरू, मित्र आणि सर्वस्व आहेत .म्हणून तर तुकाराम महाराज हे प्रेमाने म्हणतात ,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती
म्हणजे वृक्षांचे महत्व फार पूर्वीच्या लोकांना ही माहित होते . आत्ताच्या लोकांना महत्त्व माहीत नाही असे नाही परंतु आचरण मात्र तसे दिसत नाही. प्रगतीच्या नावाखाली सिमेंट काँक्रीटचे जंगल वाढू लागले आणि डोळे दिपवणारे हे हिरवे जंगल मात्र माणसाने डोळे लावल्यासारखे कापून टाकले. झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करू लागले . मोठे महामार्ग, हमरस्ते तयार करण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू झाली .त्या प्रमाणात झाडे मात्र लावली गेली नाहीत ;आणि जी लावली गेली ती व्यवस्थित जतन केली गेली नाहीत. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होऊन अनेक भौगोलिक व पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात . ऋतुचक्र व्यवस्थित चालण्यासाठी झाडांची संख्या योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रमाण चुकल्या मुळेच पावसाचे हे बेभरवशाचे वर्तन वाढलेले आहे. याला सर्वस्वी जबाबदार माणूस आहे.
मला तर वृक्ष म्हणजे मोठ्या तपस्वी सारखे वाटतात . दानशूर..... कशाचीही अपेक्षा न ठेवता .बघा ना जरा विचार करून झाडे आपल्याला पाने-फुले लाकूड ,औषधे ,मध ,फळे इत्यादी प्रकारच्या मौल्यवान वस्तू देतात .याच्या बदल्यात कृतघ्न माणूस या झाडांची निर्दयपणे हत्या करतो. झाडे मात्र परोपकाराचे कार्य थांबवत नाहीत .म्हणतात ना
" जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती परोपकारे"
मला या ठिकाणी ही गोष्ट अजून सांगावीशी वाटते की पावसामुळे झाडे वाढत नाहीत. उलट झाडांमुळे पाऊस पडतो. म्हणून प्रगतीच्या नावाखाली माणसाने जी वृक्षतोड चालू ठेवलेली आहे या वृक्षतोडीमुळे मनुष्य आपल्या भविष्याची मुळेच कापून टाकत आहेत. हे विसरून चालणार नाही झाडे आहेत तर आपण आहोत. नव्हे तर झाडा मुळेच सजीव सृष्टी टिकून आहे.
ज्या भागामध्ये झाडे मोठ्या प्रमाणात आहेत त्या भागात पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची झीज मोठ्या प्रमाणात रोखली जाते .कार्बन डाय-ऑक्साइड सारखा घातक वायू शोषून प्राणवायू देण्याचे महत्त्वपूर्ण काम झाडे अनेक वर्षांपासून करत आहेत. कोणताही मोबदला न घेता. ही गोष्ट माणसाने झाडांपासून नक्कीच शिकली पाहिजे व झाडांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
आता वेळोवेळी बातम्या ऐकायला भेटतात अमेझॉन सारख्या जंगलांमध्ये वणवा पेटला .इतकी भयंकर आग अशी आग विझवण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला .या आगीमध्ये झाडे जळाली नाहीत तर आपल्या पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचे भविष्यातील काही वर्ष जाळली आहे ते लक्षात ठेवा.
आपणही आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने झाडे लावली पाहिजेत .जागा कमी असेल तर कमी जागेत वाढणारी झाडे आपल्याला लावता येतील. घराच्या आजूबाजूला छान परसबाग तयार करता येईल. या परसबागेत छोट्या छोट्या औषधी वनस्पती लावल्यात तर आपला दवाखान्याचा बराच खर्चही कमी होईल . घराच्या आजूबाजूची हवा आणि वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल .त्यामुळे घरातील माणसे लहान मुले यांच्या शारीरिक विकासावरही सकारात्मक परिणाम होईल.
चला तर मग आता एक पण करुया प्रत्येकाने एक तरी झाड लावूया आणि ते जतन करूया. आपल्या घरात जे आनंदाचे प्रसंग येतात कोणाचे वाढदिवस असतील, लग्न समारंभ असेल तर अशा प्रसंगांना पैशांचा चुराडा न करता आठवण म्हणून एखादे झाड लावले तर अनेक वर्षांपर्यंत ते झाड आपल्याला त्या प्रसंगांची आठवण करून देत राहील .
आज पर्यंत तुम्ही एकही झाड लावले नसेल तर आता लावा. चांगले काम करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही .ज्या क्षणी चांगले काम करण्याचा विचार आपल्या मनात येतो तो क्षणच एक चांगला मुहूर्त असतो. मी तर लावले झाड आता तुम्ही एक झाड लावा. झाडे लावा झाडे जगवा हा विचार मनात रुजवा आणि त्यानंतर सुंदर सुंदर झाडे फुलवा यासाठी मी तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो.
या निबंधाचे खालीलप्रमाणे शीर्षकही असू शकतात
- | झाडे असतील तर भविष्य असेल
- | झाडांचे महत्त्व
- | झाडांचे उपकार
- | झाडांचे मानवासाठी उपयोग
- | झाडे व मानवी संस्कृती
प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही दिलेल्या झाडे लावा झाडे जगवा एसे इन मराठी
निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हालाही तुमचे निबंध पाठवायचे असतील तर नक्की पाठवा .आपण तुमच्या नावासह निबंध प्रकाशित करू.
धन्यवाद
छान निबंध
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.