आपल्या भारत देशामध्ये जगात आढळून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वातावरणाचा अनुभव आपल्याला घेता येतो. भारतातील ऋतुचक्र हे  ठरलेल्या निसर्गनियमाप्रमाणे अबाधित आणि अव्याहतपणे चालले आहे. भारतामध्ये उन्हाळा , हिवाळा ,पावसाळा हे तीन ऋतू आपल्या् ठरलेल्या नियमाप्रमाणे वर्षानुवर्षे येत आहेत. कुणाला पावसाळा आवडतो, कुणाला हिवाळा तर कुणाला  उन्हाळा आवडतो . चला तर मग आपण  बघूया  एक छानसा निबंध  ज्याचं नाव आहे 
                                  माझा आवडता ऋतू .
          """"""""""""""""""'''''"""""""""""""""""""'''''"
                             माझा आवडता ऋतू                            
                                                                          निबंध क्रमांक 1
उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू कोणताही असो प्रत्येक कृतीचे आपले खास वैशिष्ट्ये असतात आणि प्रत्येक ऋतूमध्ये परिस्थिती ही वेगवेगळी असते मग कोणाला कोणताही ऋतू आवडत परंतु मला आवडतो रणरणत्या उन्हाचा ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा आता तुम्ही म्हणाल ग्रीष्म म्हणजे रणरणते ऊन या ग्रीष्मा मध्ये तर सर्व सजीव सृष्टी अगदी होरपळून निघते सर्वत्र उष्णता असते हा ग्रीष्म ऋतू मानवाला नकोनकोसे करून सोडतो सर्वजण म्हणू लागतात नको नको तो  उन्हाळा कुणी काहीही म्हणो परंतु मला मात्र उन्हाळा ऋतु खूप आवडतो अर्थात त्याचं कारणही तसंच आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र उष्णता वाढलेली असते रणरणत्या उदाहरणे मानवाच्या अंगाची आणि या धरणीमातेची लाही-लाही होत असते; पण या उष्ण परिस्थितीत जेव्हा छानसे थंड पाणी आपण पितो त्यावेळी तृप्ततेचा जो आनंद मिळतो तो इतर कोणत्याही ऋतूमध्ये मिळू शकत नाही . गार पाणी जेव्हा घशातून खाली पोटात जाते तेव्हा सगळ्या शरीराला गारव्याचा आणि पूर्णत्वाचा अनुभव मिळतो .  शरीराचे गात्र शांत होतात . ती मजाच काही वेगळी असते. 
         मे महिन्यामध्ये तर उन्हाची तीव्रता उच्च स्तरावर असते . त्यामुळेच मे महिन्यात शाळांना ,कॉलेजांना सुट्टी असते ही सुट्टी कुणाला नको बरं? या सुट्टी मध्येच आमच्या घरी खूप पाहुणे येतात .मामा-मामी त्यांची मुले ही सर्व आमच्या घरी आनंदाने येतात .कधीकधी मीही मामाच्या गावाला जातो . मामाच्या गावाला जाताना शाळेत शिकवलेले एक गाणे मला आजही आठवते,
       "झुक झुक झुक झुक आगीनगाडी 
           धुरांच्या रेषा हवेत काढी 
           पळती झाडे पाहूया 
             मामाच्या गावाला जाऊया."
           मे महिन्याच्या सुट्टी मध्येच फळांचा राजा आंबा याचा मनमुराद आनंद घेता येतो. भरपूर आंबे खायला मिळतात .आई तर खूपदा आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा बेत करते. पुरणपोळी आणि आंब्याचा रस म्हणजे माझ्यासाठी एक मेजवानीच.  अगदी येथेच्छ भोजन करतो मी त्यादिवशी.  गोड गोड आंबे तसेच आंबट कैरीच्या फोडींवर मीठ आणि थोडीशी मिरचीची चटणी लावून खाण्यामध्ये स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो .आत्ता तर नुसत्या विचारानेच माझ्या तोंडाला पाणी आले आहे.
                 मामाच्या गावाला गेल्यानंतर आम्ही शेतातल्या आंब्याच्या झाडावर चढतो. भरपूर कैऱ्या तोडतो आणि घरून मिठाची पुडी बांधून घेऊन गेलेलो तर असतोच त्याच्याबरोबर त्या कैऱ्यांच्या फोडी मिटक्या मारत आम्ही खातो . वाह!तो आनंद तर मला शब्दात सांगता येणार नाही. आंब्याबरोबरच आंबट चिंचा , बोरी, इंग्रजी चिंचा यांचा आनंद घ्यायला ही आम्ही विसरत नाही. आता तुम्हीच सांगा इतका आनंद देणारा उन्हाळा ऋतु मला का बरं आवडणार नाही ?
                    या दिवसांमध्येच आंब्याच्या लोणच्याचा खमंग वास गल्लीमध्ये दरवळत असतो. घराघरांमध्ये लोणचे बनवण्यासाठी स्त्रियांची लगबग चालू असते. दुकानातही लोणच्याचा बाजार करण्यासाठी स्त्रिया गर्दी करताना दिसतात. वातावरणामध्ये एक वेगळीच मजा असते.
                 सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळा आला की सुरू होतात दररोजच्या आईस्क्रीमच्या पार्ट्या. घरी आलेली सर्व पाहुणे मंडळी व आम्ही मिळून वेगवेगळे खेळ खेळतो.  त्या खेळांमध्ये जो संघ हरेल त्या संघाने समोरच्या संघातील सर्व खेळाडूंना आईस्क्रीमची पार्टी द्यायची असा एक अलिखित नियमच असतो. म्हणून खेळांमध्ये जिंकण्यासाठी सर्वजण प्राणपणाने प्रयत्न करतात आणि जिंकल्यावर आईस्क्रीम खाताना सर्व थकवा कुठच्या कुठे पळून जातो हे शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे.
              उन्हाळ्यामध्ये आमच्या घरातील सर्व मंडळी आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी मिळून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो. आमच्या गावातील धरणावर आम्ही मोठ्या उत्साहाने जातो .धरणाजवळच एक छानशी रोपवाटिका आहे. त्या रोपवाटिकेत झाडांच्या वाळलेल्या काड्या गोळा करून आम्ही मस्तपैकी चुल पेटवतो आणि त्या चुलीवर खिचडी शिजवून मोठ्या उत्साहाने आम्ही खातो. त्या खिचडीची चव संपूर्ण वर्षभर म्हणजेच पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टी पर्यंत आमच्या जिभेवर रेंगाळत राहते . खिचडी बनवताना प्रत्येकाची कामे वाटून दिलेली असतात. प्रत्येक जण आपापली कामे अगदी चोखपणे पार पाडत असतो. खिचडी शिजत असते त्या वेळेत आम्ही बुद्धिबळ, पकडापकडी ,लपाछपी असे अनेक खेळ खेळतो . मोबाईलच्या विळख्यात अडकून पडलेल्या तरुण व बाळ गोपाल मंडळी त्यादिवशी तर मोबाईल ला अगदी विसरून गेलेले असतात. मोबाईलची आठवण येते ती फक्त हे आनंदाचे क्षण फोटोमध्ये कैद करून घेण्यासाठी.
              उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने बऱ्याच ठिकाणी टरबूज विक्रेते तसेच पपई विकणारे छान पैकी दुकान लावून बसलेले असतात . प्लेटमध्ये टरबूज आणि पपईचे काप सुंदर पद्धतीने रचून विकण्यासाठी ठेवलेले असतात. तिथेच खुर्चीवर बसून  त्या गारगार टरबूज आणि पपईच्या रसाळ फोडी चाखण्यामध्ये एक वेगळीच गोडी मिळते .तसेच अनेक प्रकारचे कोल्ड्रिंक्स आणि गारेगार वाले म्हणजेच कुल्फी वाले मोठ्याने आवाज देऊन आपले मन आकर्षून घेत असतात . खरोखर उष्णतेची झळ देणारा  उन्हाळा ऋतू शरीराला गारवा देण्यासाठी अनेक पर्याय देखील उपलब्ध करून देतो . म्हणूनच हा छान उन्हाळा ऋतू मला खूप आवडतो.              


तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद
       




Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने