1001marathiessay.blogspot.com
महात्मा ज्योतिबा फुले.
Mahatma jyotiba phule nibandh in marathi.
महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला .त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेरबा फुले व आईचे नाव चिमणाबाई असे होते.
ज्योतिबा यांचे पूर्वज पुण्यामध्ये फुले विकण्याचा व्यवसाय करत असत .त्यामुळे त्यांना फुले हे आडनाव पडले. प्रखर राष्ट्रवादाच्या फुलारातून फुललेले महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाजसेवक होते .ज्या काळात अस्पृश्यांच्या मुलांना शिक्षण मिळणे कठीण होते .अशा वेळी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणारे ज्योतिराव फुले हे भारतीय स्त्री शिक्षणाचे उद्गाते समजले जातात.
केवळ शिक्षणानेच माणसाचा उद्धार होऊ शकतो . त्यातही जर स्त्रिया शिकल्या तर बहुजन समाज लवकर विकासाच्या दिशेने अग्रेसर होण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल. यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता, म्हणून त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण दिले . त्यांच्या सहाय्याने प्रथम मुलींची शाळा काढली . अनेक हालअपेष्टा सहन करूनही त्यांनी शाळा बंद पडू दिली नाही. या कामात सावित्रीबाई ,ज्योतिबा फुले यांच्या मागे हिमालयासारख्या उभ्या होत्या. शिक्षणासारख्या माध्यमाच्या जोरावर राष्ट्र तारण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.
समाजाच्या परंपरागत दृष्ट रूढींवर आघात करून परिवर्तन घडवण्याचे कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना समाज कोणत्या नजरेने बघतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. ब्राह्मणांना त्यांच्या कूटनीतीची कानउघडणी करून समाजाच्या पुन्हा स्थापनेचे रणशिंग त्यांनी फुंकले . समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी आयुष्यभर झटत राहिले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फारच प्रभावित झाले होते ,तर ज्योतिबा फुलेंवरती थॉमस पेन यांचा प्रभाव होता.
महात्मा फुले यांचे ब्राह्मणांचे कसब व शेतकऱ्यांचा आसूड ही पुस्तके फारच गाजली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा मूळ आधारभूत ग्रंथ मानला जातो
स्त्री शिक्षणाला महत्त्व देऊन पुण्यात त्यांनी त्यासाठी अति कष्टप्रद अनुभव सोसले . स्वतःच्या पत्नीच्या मदतीने त्यांनी पुण्यात तीन शाळा सुरू केल्या .त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांचा शनिवारवाड्यात जाहीर सभेत मानाचा सत्कार झाला. समाज नितीनियमात बदल करून समाज परिवर्तन घडवण्यासाठी अस्पृश्यांना मानवजातीची वागणूक दिली पाहिजे. मानव इथून तिथून एकच असतो. जातिभेद मानु नये .समतेने वागावे. यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रखर लढा दिला ,म्हणूनच त्यांना जनतेने महात्मा हा किताब बहाल केला.
ज्ञानाचे महत्त्व पटवून देताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालील विचार मांडले
"विद्येविना मती गेलीमती विना नीती गेलीनीतीविना गती गेलीगतीविना वित्त गेलेवित्ताविना शूद्र खचलेइतके अनर्थ एकाअविद्येने केले."
त्यांच्या या विधानाने संपूर्ण मानव समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ उडवून दिली होती . शिक्षणाच्या बाबतीत समाज जागृत होऊ लागला होता. आयुष्यभर शिक्षणाच्या प्रसारासाठी ते झटत राहिले. तुकारामांच्या अभंगांचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. सत्य हाच खरा देव आहे यावर त्यांचा विश्वास होता आणि ते सत्यालाच परमेश्वर मानत असत . त्यांच्या कौतुकासाठी मला काही काव्यपंक्ती आठवतात,
मुक्या मनाने
किती उधळावे
शब्दांचे बुडबुडे
तुझ्या यशाचे गाणे गाती
तोफांचे चौघडे
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.