1001marathiessay.blogspot.com



कल्पनात्मक निबंध 

                                मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा




      आज शाळेतून घरी आलो तेव्हा माझी मनस्थिती काही चांगली नव्हती. काल आमचा  क्रिकेटचा सामना फारच रंगला होता .खेळण्याच्या नादात अभ्यास करायचं राहून गेलं ,त्यामुळे आज सरांनी शाळेत चांगली खरडपट्टी काढली .वरून दोन छड्याही बसल्या. मनात ठरवूनच टाकलेलं होतं .आता काहीही झालं तरी अभ्यास पूर्ण करायचा.सगळ्या वर्गासमोर मार खाताना आणि सरांचे रागवणे ऐकताना फारच लाजिरवाणं वाटतं.
  आईला म्हटलं," आई आज माझा स्वयंपाक जास्त कर आज खूप खातो आणि खूप खूप अभ्यास करतो."
            आईने आज छान पैकी पुरी भाजी बनवलेली होती आणि आईच्या हाताची पुरी भाजी म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद होय. तोंडातून हात घातला तर बोटाला पुरी लागेल इतके जेवलो. जेवताना मनात एकच विचार होता जेवण झाल्याबरोबर अभ्यासाला बसायचं .आजचा अभ्यास पूर्ण करायचा व नंतर आठवड्याभरातच शुद्ध लेखन लिहून काढायचं.
         जेवण झालं हात  धुतला आणि आता मात्र अभ्यासाच्या विषयी मनात विचार येत नव्हता. फक्त जाऊन पटकन झोपावे अशी माझी अवस्था झाली होती. पोट भरलेले असल्यामुळे मला पेंग येऊ लागली .लगेच मनात विचार आला .आता झोपायचे नाही .आपल्याला अभ्यास करायचा आहे. असा विचार करत असतानाच कधी झोप लागली हे कळलच नाही
           सकाळी लवकर उठलो अभ्यासाच्या वह्या  बाहेर काढल्या आणि राहिलेला अभ्यास कसातरी पूर्ण केला ,परंतु तोही व्यवस्थित झाला नाही; कारण शाळेची वेळ झाली होती ना.  पटकन आवरलं आणि शाळेची वाट धरली आणि पुन्हा काल सारखेच आजही खरडपट्टी झाली.
         सरांनी वर्गाच्या बाहेर जायला सांगितले आणि मैदानाच्या पाच चक्कर मारण्याची शिक्षा दिली.मैदानाच्या तीन चक्कर मारल्यानंतर घामाच्या धारा अंगातून वाहू लागल्या .दम लागल्यामुळे शाळेच्या एका कोपऱ्यात असलेल्या झाडाजवळ जाऊन बसलो .ते झाड मला फार आवडायचे पण कशाचे होते ते काय मला माहीत नव्हते.
       आजही अभ्यास पूर्ण न केल्यामुळे शिक्षा झाली .याची मनात खंत होती . झाडाखाली बसून वाटले इथे वही  घेऊन आलो असतो तर अभ्यास करत बसलो असतो. तितक्यात माझा मित्र माझी  वही घेऊन तिथे आला . मला म्हणाला ,"ही  घे तुझी वही येथे सरांनी अभ्यास पूर्ण करत बसायला सांगितले आहे." मला आशर्य वाटले मनात विचार केला आणि लगेच वही मिळाली . पळून पळून घसा कोरडा पडला होता थोडं पाणी मिळालं तर फार बरं होईल असा विचार करू लागलो.असा विचार करतो न करतो तोच आमचे सरच माझ्यासाठी ग्लास भरून पाणी घेऊन आलेत . माझा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता . माझ्याबरोबर हे काय घडत आहे ? मी विचार करतो आणि तसे घडते .
माझं पाणी पिऊन झाल्यानंतर सर ग्लास घेऊन गेले आणि मला म्हणाले बाळा चांगला अभ्यास कर आणि मला अभ्यास दाखव तुला जर काही समजत नसेल तर तेही सांग मी अजून चांगले समजावून देईन सरांचे हे शब्द ऐकल्यावर मला मात्र आकाश ठेंगणे झाले आणि यावर कळस म्हणजे सर म्हणाले अजून तू आठ दिवस अभ्यास केला नाहीस तरी चालेल अरे बापरे आता मात्र माझी पक्की खात्री झाली की मी जो विचार करतो इच्छा व्यक्त करतो ती इच्छा पूर्ण होते.
          मी सरांना निघून जाऊ दिल्यानंतर म्हटले,' इथं काल सारखेच आईच्या हातची पुरी भाजी खायला मिळाली तर.. किती मजा .. येईल. एवढ्यात माझ्यासमोर पुरी भाजीचे काठोकाठ भरलेले ताट वाढून तयार. आनंदाच्या भरात पुरी भाजी खाल्ली पोटावरून हात फिरवला आणि विचार करू लागलो .असे कसे  घडते ?म्हटलं येथे कोणी आहे का जे मी सांगितलेल्या सर्व इच्छा पूर्ण करते. 
इतक्यात मला आवाज आला," हो मी आहे ना. बोल, तुला काय  हव   आहे    अजून..  आवाज ऐकल्याबरोबर मी इकडे तिकडे बघू लागलो .आवाज कुठून येत आहे हे काही कळत नव्हते .मी म्हटलं,' कोण आहे ?'पुन्हा आवाज आला ,"अरे मी हे झाड बोलतो आहे ज्याच्या सावली तू बसलेला आहेस'
तू कोण बोलत आहेस असा प्रश्न मी पुन्हा विचारल्यावर मला आवाज आला अरे मी हे झाडच बोलतो आहे, ज्या झाडाखाली तू बसलेला आहेस बऱ्याच दिवसापासून माझं नाव जाणून घेण्याची तुझी इच्छा होती ना? माझं नाव आहे कल्पवृक्ष.  कल्पवृक्ष म्हणजेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे वृक्ष.
        बोलणारे झाड बघून माझे पाय लटलट कापत होते. घसा कोरडा पडू लागला . म्हटलं थोडं पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं .असा विचार करताच पाण्याने भरलेला ग्लास माझ्या समोर हजर. कसेतरी पाणी पिले लगेच माझ्या मनात विचार आला झाडावर एखादी भूत तर नसेल ?विचार करायचा उशीर तितक्यात झाडावरून भूताने खाली उडी मारली .घाबरून विचार करू लागलो ,या भुताने मला खाल्लं तर...... आणि काय भुताने मारली ना  माझ्या अंगावर उडी ......तसा मी जोरात ओरडलो आणि जोराचा आवाज झाला घरातली सगळी मंडळी धावत आले तर माझं डोकं फरशीवर आदळून चांगलं टेंगूळ आलेलं होतं.
        वर बघितलं तेव्हा कळलं की कालची पुरी भाजी खाऊन लागलेली  झोप अजून काही उघडलेली नव्हती. सगळे माझ्याकडे बघून हसू लागलेत. मी मात्र मला स्वप्नात भेटलेल्या त्या कल्पवृक्षाच्या झाडाचा विचार करू लागलो . शाळेत जाऊन कधी एकदा त्या झाडाला बघतो असे मला झाले.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने