1001marathiessay.blogspot.com


निसर्गाचे मनुष्यास पत्र

प्रिय मनुष्य,
                खूप खूप आशीर्वाद.
     सध्या तुला माझ्या आशीर्वादाची फार गरज आहे. कारण नेहमी आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर  शक्ती प्रदर्शन करणारा तू..आज एका अतिसूक्ष्म आणि  अदृश्य व्हायरसशी मुकाबला करताना थकलेला व घाबरलेला  दिसत आहेस. 
     सुरुवातीला बुद्धी चांगल्या कामासाठी वापरत होतास, पण हळूहळू बुद्धी भ्रष्ट होत गेली तुझी. एकमेकांना ओरबाडून झालं, अन्य पशुपक्षांना व पिकाझाडांना ओरबाडून झालं. आणि गेल्या काही वर्षांत तुझा माज एवढा वाढला की तू चक्क तुझ्या पालनकर्त्या निसर्गालाच.. मलाच ओरबाडू लागलास. स्वतःच्या करमणूकी साठी पशुपक्षांना पिंजर्‍यात कोंडणे, स्वतःची घर उभारण्या साठी झाडांची कत्तल करणे जणू तुझा छंदच झाला. प्रगतीच्या नावाखाली वातावरण प्रदूषण, जलप्रदूषण केलसं. जमीनीची वारेमाप खोदाई केलीस. पण सगळ्यात हुशार व  कर्तबगार  लेकरू म्हणून आधी मी कानाडोळा करत राहिलो तुझ्या वागण्याकडे . आता मात्र तुझ्यावर डोळे वटारल्या शिवाय पर्यायच  उरलेला दिसत  नाही माझ्याकडे.
     माझी निसर्गाची उदात्त देणगी तुला लाभली ती म्हणजे बुद्धीमत्ता. अश्मयुगापासून आजवर तू बौद्धिक दृष्ट्या संपन्न होत आलास. तू मी निर्माण केलेल्या वनस्पतींचे अनेक वाण तुझ्या बुद्धीने तयार केलेस, पण वनस्पती तर  मीच निर्माण केल्या होत्या . तू चित्त्याला जोरात पळताना बघितलस आणि  मोटारगाडी तयार केलीस . तू शार्कला पाण्सयात अगदी सहज पोहताना बघितलस आणि जहाज तयार केलस. तू गरुडाला आकाशात भरारी घेताना बघितलस आणि विमान तयार केलस. अगदी सगळी सुंदर आधुनिक निर्मिती तू केली असे तुला वाटत असले तरी मूळ कल्पना माझीच होती रे बाळा. तरी पण तुझं कौतुकच केल मी. तू जलविद्युत व पवनऊर्जेचा शोध लावलास तेव्हा मला अभिमान वाटला तुझा. लाडके लेकरू म्हणून मी मिरवत होतो.
     पण नंतर नंतर विनाशकाले विपरीत बुद्धी झाली तुझी. आधी तू मला दैवत मानत होतास, आता उपभोगाचे साधनच मानू लागलास व सध्या तर लुबाडणूक करत आहेस. हस्तीदंतासाठी हत्तीना मारायचे, वाघनखांसाठी वाघांना. गायीगुरांना कत्तलखान्यात द्यायचे असले उद्योग तू करू लागलास. कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली नदीनाले बुजवायचे आणि   झाडे तोडायची तुला तर  सवयच लागली. कारखानदारी हवामान व जलस्रोत विस्कळीत करू लागली. लवकर पीक येण्यासाठी खतांचा भडीमार होऊ लागला पण जमीनीचा पोत बिघडला हे तुझ्या लक्षात येऊन पण तू बेफिकीर होऊ लागलास. एका लेकराचे हुशार म्हणून लाड करताना माझ्या बाकीच्या लेकरांचे हाल होऊ लागले.
     प्रगती आणि  उत्कर्षाला माझा कधी विरोध नव्हताच रे बाळ . पण जेव्हा याच्या नावाखाली तू तुझी  सद् सत् विवेक बुद्धी हरपूणन   माणूसकीच्या तोंडावर काळीमा फासू लागलास तेव्हा मात्र मी माझे रौद्ररूप धारण करू लागलो. कधी भूकंपाच्या रूपाने , कधी दुष्काळाच्या रूपाने , कधी महापूराच्या रूपाने  लहान मोठे धक्के देऊन तुला सावध करू लागलो. पण संकट टळले की , तुझे पुन्हा  ये रे माझ्या मागल्या सुरूच . मग आता  महामारीची भीती तुला दाखवत आहे. बघ जरा.. पूर्ण जगात, फक्त  तुला एकट्याला घरी बसवल्यावर माझ्या इतर सर्व  लेकरांचे जगणे किती सुसह्य झाले आहे . वन्यजीव बिनधास्त वावरु लागले, झाडे आनंदाने डोलू लागली. पाणी व हवा पुन्हा  शुद्ध झाली .त्याचा  आनंद ते अनुभवत आहेत. तो त्यांच्या हक्काचा होता पण तू हिरावून घेतलास. मी त्यांना परत मिळवून देतोय इतकेच.
     माझे अंतःकरण  खूप क्षमाशील आहे, हे संकट देखील काही दिवसांत जाईलच . पण यानंतर मात्र  माझी  तुझ्याकडून एक रास्त अपेक्षा आहे ,ती म्हणजे तू फक्त  तुझ्या स्वार्थासाठी माझ्या वरदानाचा असा  गैरवापर करणार नाहीस. 
                                                                                   तुझा पण फक्त तुझा नव्हे 
                                                                                                     निसर्ग.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने