स्वच्छतेमुळे आपले मन प्रसन्न राहते. आपली कार्यक्षमता वाढते. स्वच्छतेविषयीची सविस्तर माहिती आपण पुढील निबंधात वाचूया.

 या निबंधांचे खालील प्रकारे नावे असू शकतात .
  1. मानवी जीवनात स्वच्छतेचे महत्व.
  2. मानव आणि स्वच्छता.
  3.  स्वच्छतेचे दारी आरोग्य वास करी.
  4.  आरोग्य हेच धन .
  5. आरोग्याचे महत्व .
                      या पद्धतीचे निबंध लिहिण्यासही खालील निबंधातील मुद्यांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
                                
                                स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
                         swachhateche mahatw marathi nibandh.


                                "स्वच्छता असेल ज्याचे घरी      रिद्धी सिद्धी तेथे वास करी"

                    असे उगीचच म्हटले जात नाही. ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणीच आरोग्य आहे. अन जिथे आरोग्य आहे त्याठिकाणी सर्व आनंद  आहे.
              आपल्या जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व आहे . हे कुणीही नाकारू शकत नाही, कारण जिथे स्वच्छता नसेल तिथे रोगराई असणारच.
रोगराई जिथे असेल त्या ठिकाणी मनुष्य सुखाने ,आनंदाने कसा राहू शकतो ? हा तर सगळ्यांना समजू शकणारा साधा विचार आहे.
           आपण विविध प्रकारच्या आरोग्यदायी सवयी आत्मसात करतो . सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाणे किंवा रनिंग करणे त्यालाच जॉगिंग असे आपण म्हणतो. ह्या सर्व खटाटोपाचा पाया काय तर उत्तम आरोग्य . मग इतकं सगळं करूनही जर स्वच्छता बाळगली  नाही तर आरोग्य कसे मिळेल? स्वच्छता फक्त वैयक्तिक असते असे नाही, तर सामूहिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता, गाव स्वच्छता इत्यादी गोष्टींचाही स्वच्छतेमध्ये विचार करावा लागेल . 
                  स्वच्छता अंगी बाणवून घेण्यासाठी कटाक्षाने काही नियम पाळावे लागतील. स्वच्छतेमध्ये आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या साधन स्त्रोतांचा जपून व विचारपूर्वक वापर याचाही समावेश होतो. जसे की पाणी हे निसर्गाने मानवाला दिलेले एक अमूल्य रत्न आहे ,परंतु याचा अविचाराने वापर करताना अनेक ठिकाणी बघायला मिळते . बऱ्याच ठिकाणी नळ विनाकारण चालू असलेले दिसतात . त्यामुळे पाणी वाहून जाते हे मोठे नुकसान तर आहेच ,परंतु तेच पाणी रस्त्याने वाहत जाताना चिखल होतो. त्या ठिकाणी डास, मच्छर तयार होतात आणि ते पुन्हा आपल्याला चावतात . मग आपल्याला दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागतात .
                 आपल्या अंगावर असणारे कपडे जर स्वच्छ नसतील तर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. कपड्यांच्या स्वच्छतेवर माणसाचे मन कळत नसले ,तरीदेखील माणसाचा स्वच्छतेविषयीचा दृष्टिकोन मात्र नक्की कळतो . त्याचे विचार कसे असतील हेही कळते .म्हणून निश्चितच आपल्या जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व प्राप्त झालेले आहे.
                बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम झालेले नाही . लोक उघड्यावर शौचास जातात. हेच मलमूत्र मग कोणत्या तरी मार्गाने पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळून मानवाच्या शरीरात प्रवेश प्रवेश करते. अशा दुषित पाण्यामुळे  आरोग्य धोक्यात येते . शासनाने शौचालय बांधण्यासाठी विविध प्रकारच्या अनुदानाची व्यवस्था केलेली आहे . तरी देखील काही  घरांमध्ये शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले दिसत नाही. 


       सार्वजनिक शौचालयांमध्येही स्वच्छतेची काळजी फारशी घेतली जात नाही . तसेच अशा सार्वजनिक ठिकाणांवरील वस्तूंची तोडफोड केलेलीही बऱ्याच वेळा निदर्शनात येते. सार्वजनिक मालमत्तेचे केलेले नुकसान म्हणजेच आपले नुकसान होय ,कारण त्यासाठी सरकारने केलेला खर्च हा आपल्याच खिशातून कराच्या रूपाने गोळा केलेला पैसा असतो . अशा ठिकाणी स्वच्छता बाळगणे व वस्तूंची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे.
               स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर आपल्याला स्वतःच्या विचारधारेमध्ये काही बदल करावे लागतील. सर्वप्रथम आपले घर स्वच्छ रहावे . दुसऱ्याच्या अंगणात आपल्या घरातील कचरा टाकणे  ही  घातक प्रवृत्ती बदलावी लागेल ;कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते.
             स्वच्छ भारत अभियान यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला समग्र व एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे . या प्रयत्नांचे फळ लगेच दिसेल असे नाही. ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे . म्हणून आपण आत्ता स्वच्छतेचे पाईक बनून सतत कार्य करत राहिलो तर एक दिवस आपला भारत निर्मल भारत बनल्याशिवाय राहणार नाही.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने