www.upkarmarathi.com
माणसाचे मन म्हणजे अजब रसायन आहे. याच्यावर अनेक शोध निबंध लिहिले गेले परंतु त्याचा थांगपत्ता काही लागत नाही. असेच एक दिवस बर्याच दिवसांनी बाहेर गेलेलो असताना माझ्यासोबत घडलेला एक साधा प्रसंग आणि त्यातून मनात निर्माण झालेले विचार इथे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
सहज सुचलं म्हणुन..... तादात्म्य
भरपूर पाऊस पडून गेल्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. चिखलाची पायमल्ली भरपूर झाल्यानंतर आणि कोरोनामुळे भरपूर दिवस घराचे बंदीपूरात रूपांतर झालेले होते. आता काहिसे कैद्याच्या भूमिकेतून मुक्त झाल्याच्या आनंदात बाहेर पडून लोक मास्कच्या आत... उष्ण का होईना,, परंतु दाबलेला ..मोकळा श्वास घेऊ लागलेत.
शेतकरी शेतामध्ये कांद्याच्या बियांसाठी रोपणी करण्यामध्ये व्यस्त आहेत. शेतामध्ये मऊ मऊ गाद्या अंथरल्यासारखे वाफे तयार करून शेतकऱ्यांनी बीज मातीच्या कुशीत टाकले आहेत .त्या बीजातून छोटे छोटे कोंब धरतीच्या बाहेर डोकावू लागले आहेत. तितक्यात परतीच्या पावसाने डोकावणाऱ्या छोट्या छोट्या कोवळ्या नाजूक पिकाच्या डोक्यावर जोरजोरात नाचायला सुरुवात केलेली आहे .यावर्षी जणू या परतीच्या पावसाने असे ठरवून घेतले आहे की लोकांना स्वच्छतेचे आणि जीवनाच मोल शिकवुणच जायचं .
बर्याच दिवसांनी घराच्या कैदेतून बाहेर पडलो होतो मुलाला घेऊन . फिरण्यासाठी. लॉक डाऊन च्या काळात घरात बसून बसून पोटाचा चंबु कधी झाला हे कळलच नाही . आता त्या चंबुचा माठ होऊ नये म्हणून आज पासून पुन्हा व्यायाम करायची सुरुवात म्हणून फिरायला आलो होतो.
तसा मी फार चिंतनशील माणूस आहे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कोण कोणत्या घटना कशा पद्धतीने घडतात याचे सतत निरीक्षण करत राहतो. त्यातून निसर्ग कशा पद्धतीने वागतो? कृती आणि परिणाम यांचा एकमेकांशी संबंध कसा साधतो. या गोष्टीवर माझ्या मनात सतत काही ना काही विचार चालूच असतात.
माझे गाव पिंपळनेर . बर्यापैकी मोठे गाव आहे. गावाबाहेर असलेल्या पेट्रोल पंप पासून मुख्य रस्त्याला एक फाटा फुटतो आणि तिथून शेतांना सुरुवात होते कोरणा ने माणसांना गर्दीतून एकांतात आणले आणि मग एकांतात असलेल्या रस्त्यांवर गर्दी दिसू लागली.त्यामुळेच नेहमी एकांत असणाऱ्या या रस्त्यावरून आता बर्याच लोकांची ये-जा दिसू लागली.
माझ्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन मी या आजही बऱ्याच वेळा या रस्त्याने फिरण्यासाठी आलेलो आहे. आज जेव्हा हा गेलो होतो तेव्हा माझा मुलगा मला सहज म्हणू लागला बाबा आता या रस्त्याला एवढी गर्दी का आहे मी त्याला आत्ताच्या परिस्थितीचा त्याला समजेल अशा शब्दांमध्ये आढावा देण्याचा प्रयत्न केला. माझे शब्द ऐकताना त्याचे लक्ष इतरत्र उडणाऱ्या पक्षांवर होते त्यातच विद्युत तारेवर बसलेल्या कावळ्यांच्या आवाजाकडे तो फार लक्ष देऊन बघत होता.
त्याच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडले. "बाबा, कोरोनामुळे सगळी माणसे मास्क लावून घराबाहेर पडतात ,पण हे पक्षी बघा ना ,कुणीही मास्क लावत नाही आणि त्यांना हवे तिथे त्यांना जाता येतं . माणसाचे मात्र तसं काही नाही माणसाला एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी गाडीचा वापर करावा लागतो.", पण पक्ष्यांचे भारी आहे ,वाटलं तिथे जाता येतं ."
त्याच्या बालसुलभ मनातून आलेले विचार छान होते सुंदर होते आणि बरोबरही होते.
मी त्याला म्हटले," तू पक्षी झाला तर काय करशील? यावर तो लगेच म्हणाला ,
"मी पक्षी झालो तर इकडे तिकडे उडून जाईल. नवे नवे गाव बघेन ."
मग तो शांत झाला ,मी म्हटलं ,"बस इतकेच ?"
तो परत म्हणू लागला ,
"मी दाणे खाण्यासाठी शेतांमध्ये घरांवरती बसेन आणि आजी जशी चिमण्यांसाठी दररोज दाणे टाकते तसे जिथे दाणे टाकले असतील तिथे जाऊन दाणे खाइन ,आणि पिलांसाठीही घेऊन येईल. महत्वाचे म्हणजे अंडी पण घालीन."
"अंडी पण घालीन. "या त्याच्या एका वाक्यामुळे मला हसू आले , परंतु माझ्या स्वभावाप्रमाणे माझ्या मनात लगेच विचार आला की फक्त एका कल्पनेने लहान मुलाने किती तादात्म्य साधले. म्हणजे बघा ना , मी पक्षी झाल्यावर काय करीन याविषयीचे अनेक विचार माझ्याही मनात येऊन गेले ,परंतु अंडी घालीन हा विचार माझ्या मनातही आला नाही.... अंडी घालने हा तर पक्षांचा जीवनक्रमातील महत्त्वाचा भाग.... पण तरीही माझ्या मनात तसा विचार का आला नाही ? याविषयी मी चिंतन करु लागलो आणि मला याचे उत्तर सापडले ते म्हणजे तादात्म्य म्हणजे एकरूपता.
यातून मला एकच सांगायचे आहे की आपण एखाद्या गोष्टीची किंवा समस्येची जेव्हा चर्चा करतो, त्यावेळी त्या समस्येचा किंवा त्या गोष्टीचा फक्त वरचेवर विचार करुन ती गोष्ट सोडून देतो परंतु त्याच गोष्टीच्या बाबतीत आपण खोलवर विचार तेव्हाच करू शकतो ज्या वेळी आपण या समस्येशी, कल्पनेशी तादात्म्य पावु म्हणजेच एकरूप होऊ.
जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर खरेखुरे प्रेम करतात ते एकमेकांविषयी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करतात,,, विचार करतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनात ते विचार आपोआपच येतात. याचे कारण त्यांनी आपल्या प्रियकर-प्रेयसी अथवा जोडीदाराबरोबर साधलेले तादात्म्य.म्हणजे ते त्या नात्यांमध्ये इतके एकरूप झालेले असतात की आपल्या प्रिय माणसाशी संबंधित प्रत्येक सुखदुःख,, घटना यांचा ते त्यांच्याही नकळत सखोल विचार करू शकतात.
असे तादात्म्य बऱ्याचदा आईच्या ठिकाणी आपल्या मुलाविषयी दिसते .मुलाला काय लागते, त्याच्या साठी चांगल्या गोष्टी कोणत्या ,वाईट कोणत्या ,कोणत्या गोष्टींमुळे मुलाचे भले होईल ,त्याची प्रगती होईल या गोष्टी आपसूकच आईच्या अंतकरणात निर्माण होतात याचे कारण आईची मुलाबरोबर असलेली एकरूपता किंवा तादात्म्य.
दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला असणारे सर्व व्यक्तींचे ,,मित्र असतील ,शत्रू असतील सर्वांचे आपण नीट निरीक्षण केले तर त्यांच्याबरोबर आपले असलेले संबंध हे फारच मर्यादित स्वरूपात असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असलेल्या समस्या अडचणी यांचे पुसटसे विचारही आपल्या मनात येत नाहीत, म्हणून ज्यावेळी आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराची माणसांशी एकरूप होऊ त्याच वेळेस आपल्याला आजूबाजूच्या समस्या व आपली बलस्थाने नक्की समजतील.
ज्या ज्या लोकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसराची किंवा त्यांची ज्याच्यावर श्रद्धा आहे विश्वास आहे यांच्याशी एकरूपता साधली त्यांनी जगामध्ये आलोकित कार्य केलेले आहेत .
आता आपण अनेक मोठमोठे व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी लोक बघतो . त्यांनी समाजाचे निरीक्षण करून कोणत्या गोष्टींची संपूर्ण मानव समाजाला गरज आहे, कोणत्या गोष्टीने मानवी समाजाची प्रगती आणि उत्क्रांती होऊ शकते, याविषयी सखोल विचार करून पावले उचलली आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यात त्यांना यश मिळाले अर्थात यामध्ये त्यांच्या कष्टाचा वाटा ही महत्त्वाचा आहेच. पण हे कष्ट करण्याची जिद्द सुद्धा त्या एकरुपते मधून येते.
हा लेख वाचून आपण मनात एकच ठरवा की ,आपल्या जवळच्या माणसांशी एकरुपतेने वागा मग गंमत बघा.
संतांनी देवाशी एकरूपता साधली तर त्यांना देव भेटला .आपण जर आपल्या जवळच्या आजूबाजूच्या माणसांशी आणि परिसराशी एकरूपता साधली तर आपल्याला देखील त्यांच्यातील देव सापडायला अजिबात उशीर लागणार नाही.
लेखन कसे वाटले याविषयी नक्की कळवा . कमेंट करा इतरांनाही वाचण्यासाठी पाठवा.
खूप खूप धन्यवाद.
1 नंबर सर आपल्यातील लेखन शैली उत्कृष्ट आहेच पण अधिकाधिक ती बहरत जावी ही सदिच्छा .👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
हटवाउत्तम लेख ! अभिनंदन!
उत्तर द्याहटवातुमची प्रतिक्रिया म्हणजे आमच्या पुढील लिखाणासाठी एक प्रेरणा आहे. खूप खूप धन्यवाद
हटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.