सखाराम आणि सरस्वती यांचा संसार सुखाने चालला होता. त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर कळी उमलली होती .त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव आवडीने मैथिली असे ठेवले होते.
       मैथिली म्हणजे चैतन्यानं भरलेलं जणू एक फुलपाखरू. घरामध्ये सतत नाचत बागडत असायची. तिचे बोबडे बोल ऐकून सखाराम आणि सरस्वती यांचे सर्व श्रम कुठल्या कुठे पळून जात असत. मैथिली वयानं तीन चार वर्षाची होती. लहान असली तरी देखील तिला गाणे गाण्याची फार हौस होती .गाण्यातील शब्द कळले अथवा नाही कळले तरी देखील फक्त गुणगुणत राहने तिला आवडायचं . भुंग्याचा जसा गुंजारव असतो त्या पद्धतीने मैथिलीचा गुंजराव संपूर्ण घरांमध्ये चालू असायचा.
   परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने सखाराम आणि सरस्वती  मैथिलीचे सर्व लाड पूर्ण करू शकत नव्हते. पण काहीही झाले तरी हे दोघे नवरा बायको मैथीलीला नेहमी आनंदात आणि सुखात ठेवत. 
      मैथिली बालवाडीच्या शाळेमध्ये जाऊ लागली होती .तिथे तिला अनेक लहान लहान मैत्रिणीही भेटल्या होत्या . त्यामधील गीता  मैथिलीची सर्वात प्रिय मैत्रीण.गीतालाही मैथिली खूप आवडत असे .दोघांच्या घरांमधील अंतर त्यांच्या वयाच्या मानाने जास्त होते. तरीही सखाराम मैथिलीला गीता बरोबर खेळण्यासाठी सोडून येत असे.
मैथिली चे घर म्हणजे छोटीशी झोपडी  शेतामध्ये होती. 
     सखाराम  शेतामध्ये सालदार म्हणून काम करत असे. 
      गीताला एक दिवस तिच्या पप्पांनी छान पैंजण आणले. पैंजण पायात घालून गीता घरभर नाचत सुटली. तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. ती नाचत असतानाच मैथिली त्याठिकाणी आली .गीताचा आनंद बघून मैथिलीच्या चेहऱ्याची कळी आणखीनच खुलली .        गीताच्या पायातील पैंजण छम छम वाजू लागले होते आणि त्या तालावर मैथिली आनंदाने उड्या मारत होती. टाळ्या वाजवत होती .गीताच्या भोवती फेर धरून नाचू लागली होती. . थोड्याच वेळात सखाराम मैथिली ला घेण्यासाठी तिथे आला त्याने तिला मानेवर घेतले आणि गप्पा मारत दोघेही घराकडे निघाले.
      रात्रीचे जेवण झाल्यानंतर सखाराम मैथिलीच्या पुस्तकातील चित्र बघत बघत मैथिली बरोबर गप्पा मारू लागला .बाप लेकीच्या खेळाकडे सरस्वती आनंदाने बघत होती .भाकरी थापताना तो सगळा आनंद भाकरीच्या पिठात मिसळत होता आणि भाकरी चा सुगंध संपूर्ण झोपडीत पसरला होता. खेळत असतानाच मैथिली गोड आवाजात सखारामला म्हणू लागली," बाबा मला पण  गीतासारखे छम छम वाजणारे पैंजण घेऊन द्या."
    मैथिली लडिवाळपणे आपल्या वडिलांकडे हट्ट करत होती. सखारामला आणि सरस्वतीला हे बघून आश्चर्य वाटले आजपर्यंत कसलाही हट्ट न करणारी आपली  छकुली आज अचानक पैंजण कसे मागू लागली. . सखाराम आणि सरस्वती यांचे डोळे भरून आले. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सखाराम मनात कसला तरी बेत आखून घराबाहेर पडला .जाताना सरस्वतीला ,,"यायला थोडा उशीर होईल ."असे सांगून गेला.
      रात्री दहा वाजता सखाराम  आला दिवसभराच्या कष्टामुळे अंग टाकताच सखारामला झोप आली.
    सकाळी लवकर उठून सखाराम शेतात गेला. अर्ध्या तासात आला येताना बरोबर मोगऱ्याच्या भरपूर कळ्या तो घेऊन आला. ह्या कळ्यांच्या त्याने दोन  छान दोन माळा बनवल्या. त्या  माळा आपल्या पायांमध्ये गुंडाळून मैथिली समोर उभा राहिला . फेर धरून नाचू लागला जणू अगदी खरे पैंजण त्याने पायात घातले  पाय आपटून तो नाचू लागला. तोंडाने छम छम आवाज करत तो बेभान होऊन नाचू लागला .मनातल्या मनात सखाराम आपल्या परिस्थितीवर दुःखी होता आणि ते दु:ख तो मुलीसमोर  नाचून व्यक्त करत होता. मैथिली सखारामला म्हणाली बाबा पैंजणांचा आवाज होत नाही तुम्ही तोंडाने छम छम करता पण या फुलांच्या पैंजणांचा गीताच्या पैंजनापेक्षा छान वास येतो.
      सखाराम मैथिलीला म्हणाला," गीता जवळ आहेत अगदी तसेच छान छम छम वाजणारे पैंजण मी तुला आणून देणार काळजी करू नकोस फक्त थोडा धीर धर अजून आठ दिवसांनी म्हणजे पुढच्या रविवारी मी तुला पैंजण आणून देणार. सखाराम चे शब्द ऐकून मैथिली आनंदाने उड्या मारू लागली.सखारामने वचन तर दिले परंतु इतके पैसे आणणार कुठून असा सरस्वतीच्या मनात  प्रश्न निर्माण झाला.
      सखाराम ने अजून एका ठिकाणे हमालीचे काम स्वीकारले मिळेल त्या वेळेत हमाली करायचे व उरलेल्या वेळेत शेतातील कामे करायची असा त्याचा नियम सुरू झाला परंतु शरीर मात्र फार थकले रात्री आल्याबरोबर मैत्रिणीचा पहिला प्रश्न असेल बाबा छम छम कधी आणणार मग दररोज एक एक दिवस कमी करून सखाराम मैथिलीला सांगतसे
        शनिवारी मात्र सखारामला काही बरे वाटत नव्हते त्याच्या शरीरात अशक्तपणा त्याला जाणवत होता परंतु मुलीला दिलेले वचन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. संध्याकाळी आल्यानंतर सखाराम मैथिली बरोबर छान गाणे गात असे तेही गाणे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सखाराम गात नव्हता. शनिवारी सखाराम संध्याकाळी मनात ठाम निश्चय करून घरातून बाहेर पडला सरस्वतीला सांगून सखाराम ते पैंजण आणण्यासाठी गेला होता. सखाराम ने सोनाराला सांगून मुद्दामच जास्त घुंगरू पैंजणला बसवून घेतले होते. 
       सकाळी मैथिलीला पैंजण द्यायचे .  तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची त्याला खूप इच्छा झाली होती. तिचा हसरा चेहरा , तिचे नाचणे त्याला डोळ्यासमोर आत्ताच दिसू लागले होते. आनंदाच्या भरात सखाराम आज दोन घास जास्त जेवला . छम छम च्या तालावर नाचणारी मैथिली त्याला घरभर दिसू लागली . सखारामच्या चेहऱ्यावर आतुन येणारा संतोष बघून सरस्वतीही आनंदून गेली होती.
       सखाराम सकाळी लवकर उठला आंघोळ आटपून शेतातून सुगंधी मोगऱ्याच्या कळ्या आणायच्या आणि त्याच्यात पैंजण लपवून मैथिलीला देण्याचा त्याचा बेत होता. 
घाईघाईने सखाराम चप्पल घालायचेही विसरून गेला. तसाच धावत मोगऱ्याच्या वेलीजवळ आला .एका दुसऱ्या झुडपाच्या आधाराने उभी असलेली मोगऱ्याची वेल जणू सखारामची वाट बघत होती. बेधुंद होऊन सखाराम कळ्या खुडून घेऊ लागला. वेलीच्या चारही बाजूने फिरू लागला .फिरता फिरता त्याला पायाला काटा टोचला ,पण त्याकडे सखाराम चे लक्ष नव्हते. तिकडे दुर्लक्ष करत सखारामने मोगऱ्याच्या भरपूर कळ्या खुडून घेतल्या आणि घराकडे निघाला.
       घरी पोहोचल्यावर सखारामने मोगऱ्याच्या कळ्यांमध्ये पैंजण लपवले त्याची  छोटी पुडी बांधली. शांत झोपलेल्या या आपल्या मैथिलीकडे बघत सकाराम तिला उठवू लागला.... मैथिली आज रविवार तुझे पैंजण तुझी वाट बघत आहेत असे सखाराम म्हणताच मैथिली जागी झाली. कमळाच्या पाकळ्या उघडाव्यात तसे तिने आपले नाजूक डोळे उघडले, परंतु तिचे उघडलेले डोळे सखारामला पुसट दिसू लागले .त्याच्या डोळ्याच्या पापण्या बंद होऊ लागल्या. तो खूप प्रयत्न करूनही पापण्या बंदच होत होत्या. त्याला मळमळू लागले होते .अस्वस्थ वाटू लागले होते. इकडे मैथिलीने  पैंजणात पाय घालून ते पायात टाचेच्या वर सरकवलेही होते. ती आनंदाने सर्व घरात नाचू लागली. घुंगरांचा छम छम आवाज सगळ्या झोपडीत पसरू लागला.  सखाराम ला खूप इच्छा असूनही आपली मुलगी दिसेनाशी झाली होती . पण घुंगरांचा छम छम आवाज त्याच्या कानावर पडत होता.त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता .सखारामच्या चेहऱ्यावरची वेदना सरस्वतीला लगेच कळली.  तिचे लक्ष सखारामच्या हातांकडे गेले मगाशी काटा टोचलेला होता त्या ठिकाणी सखाराम चोळत होता आणि काही शोधण्याचा प्रयत्न करत होता. सरस्वतीने ते बघताच तिला कळले सखारामला सर्पदंश झालेला होता. सखारामच्या तोंडातून फेस  येऊ लागला होता .सरस्वती झोपडीच्या बाहेर आली शेजारच्या माणसाला दुरूनच हाक मारण्याचा प्रयत्न करून बोलवू लागली. माणसे सखाराम भोवती गोळा झाले ,परंतु काहीही उपयोग नव्हता मैथिली मात्र बाबाने आपला शब्द पाळला आणि आणून दिलेल्या पैंजणांचा छम छम अशा आवाजाच्या तालावर फेर धरून नाचत होती. सरस्वतीला मात्र कळत नव्हते सर्पदंशाने मलूल झालेल्या आपल्या नवऱ्याकडे बघावे की पैंजण घालून नाचणाऱ्या आपल्या अबोध मुलीकडे बघावे. मुलीचे डोळे तेजाने प्रफुल्लित झाले होते तर नवऱ्याच्या डोळ्यातील तेज मालवले होते आणि तिचे स्वतःचे डोळे अश्रुंनी भरलेले होते.

यात चूक कुणाचीही नव्हती. तरीदेखील दुःख मात्र तिघांना भोगावे लागणार होते म्हणून माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की,, आहे त्या परिस्थितीत सर्वांशी प्रेमाने वागा .कोणावर काय प्रसंग कधी येईल आणि परिस्थितीचे चक्र कसे फिरून जाईल याचा काहीही भरवसा नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत सर्वांच्या जीवनात आनंद देत राहा. बाकी जीवन-मरणाचे चक्र तर चालूच राहणार आहे......

                           लेखन :
                      ❣️  विजय साळवे ❣️

1001marathiessay.blogspot.com








कृपया ब्लॉगवर असलेल्या सदस्यता घ्या या ठिकाणी क्लिक करा व तुमचा ई-मेल टाकून ब्लॉग ला सबस्क्राईब करा . आणि ब्लॉग ला फॉलो करायला अजिबात विसरू नका.

तुम्हाला आमच्याशी तुमच्या कल्पना शेअर करायच्या असतील काही सुचवायचे असेल तर  contact us या बटणावर क्लिक करा आणि तेथे माहिती भरा. तुमच्या सर्वांच्या सूचनांमुळे  आम्हाला खूप मार्गदर्शन मिळते.





     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने