1001marathiessay.blogspot.com
छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा,संस्कार कथा ,short stories,moral stories, stories for all ,bed time stories.
आपण लहान असल्यापासून तर मोठे होईपर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकत असतो. गोष्टी आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच गोष्टी अगदी मन लावून ऐकतात . गोष्टींमधून हसत-खेळत माणसाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात .समजतात .माणसाचा दृष्टीकोण वृद्धिंगत होण्यामध्ये गोष्टींचा फार मोठा हात असतो.
आपल्या घरातील लहान मुले गोष्टी अगदी आनंदाने ऐकतात. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरातील वडीलधारी मंडळी मुख्यत्वेकरून आजी-आजोबा आपल्या नातवांना अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असत .रामायण महाभारत कृष्ण यातील गोष्टी ऐकण्यामध्ये मुलांना फारच आनंद देत असे आज जरी अनेक प्रकारचे कार्टून्स टीव्ही वर उपलब्ध असलेले तरीदेखील मुलांना आपल्या घरातील आपल्या ्रिय वडीलधार्या माणसांनी कडून गोष्टी ऐकणे आज देखील आवडते.
तुम्हाला तुमच्या मुलांना सांगण्यासाठी या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही त्या गोष्टी वाचा किंवा आपल्या घरातील मुलांना वाचण्यासाठी द्या.माझ्या मतानुसार या गोष्टी तुम्हीच वाचा आणि तुमच्या मुलांना सांगा जेणेकरून तुमच्या मधील नाते अजूनच खुलून येईल.
प्रत्येक गोष्टीचा खाली काही सोपे प्रश्न दिले आहेत. ते प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना गोष्ट सांगितल्यानंतर विचारा. म्हणजे त्यांनी गोष्ट किती लक्षपूर्वक ऐकली हे कळेल. तसेच तुम्ही ही गोष्ट कशी सांगितल्या याविषयी तुम्हाला कल्पना येईल आणि गोष्ट सांगण्याची तुमची पद्धत सुधारण्याची तुम्हाला संधी मिळेल. त्यानंतर अजून काही गोष्टी येथे टाकण्यात येतील .तोपर्यंत या गोष्टींचा आनंद घ्या.
गोष्ट क्रमांक १
खरी संपत्ती
रामू नावाचा एक शेतकरी होता. तो शेतात खूप कष्ट करत असे . त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर पीक येत असे. त्याला तीन मुले होती .तीनही मुले खूप आळशी होती .त्यामुळे त्याला सतत चिंता वाटत असे की, आपल्यानंतर या मुलांचे कसे होणार?
काही दिवसांनी रामू खूप आजारी पडला. त्याने आपल्या तीनही मुलांना जवळ बोलावले .तो म्हणाला," मी काही ह्या आजारातून बरा होईल असे वाटत नाही. तेव्हा जाता जाता एक गुपित सांगतो .आपल्या शेतात खूप धन ठेवलेले आहे." असे सांगितल्यानंतर काही वेळातच त्याचा जीव गेला.
कष्ट न करता धन मिळणार याचा मुलांना खूप आनंद झाला .हे धन शेतात नक्की कोणत्या ठिकाणी ठेवले आहे याची त्यांना माहिती नव्हती . त्यामुळे त्यांनी सर्व शेती खणून काढली . त्यांना कोठेही धन मिळाले नाही. शेवटी त्यांनी आयत्या धनाची आशा सोडून दिली आणि इतके खणले आहेच तर त्यात धान्य पेरून देऊ. असा विचार केला आणि त्यांनी धान्य पेरले .
भरपूर केलेल्या कष्टामुळे त्यावर्षी पीकही भरपूर मिळाले. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांना वडिलांच्या सांगण्याचा अर्थ समजला की शेतात खूप कष्ट केल्यावरच आपणास धन मिळेल. अशा तऱ्हेने त्यांना कष्टाचे महत्त्व समजले.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- शेतकऱ्याचे नाव काय होते?
- शेतकऱ्यांची मुले कशी होती?
- मुलांना कशाचा आनंद झाला?
222222222222222222222222222222222222222222
गोष्ट क्रमांक २
चतुर कोकरू
एका कुरणात मेंढ्यांचा कळप चरत होता. कळपाची राखण करण्यासाठी काही कुत्रे होते. चरता चरता एक कोकरु कळपाच्या मागे राहिले. कळप पुढे निघून गेला.
तिथे एक लांडगा कळपावर नजर ठेवून होता .एक कोकरू कळपाच्या मागे राहिल्याचे त्याने पहिले आणि तो त्या कोकराच्या मागे लागला.
कोकरु धावू लागले. आपण आता लांडग्याच्या तावडीतून सुटत नाही .हे त्याच्या लक्षात आले होते .मग ते धावण्याचे सोडून हसत लांडग्याला म्हणाले ,"लांडगे दादा ,आनंदाने हसत हसत मरावे असे मला वाटते म्हणून तुम्ही थोडावेळबासरी वाजवा .म्हणजे मला खूप खूप आनंद होईल."
लांडग्याने कोकराचे ते म्हणणे मान्य केले .त्याने बासरी वाजवायला सुरुवात केली . बासरीचा आवाज कळपातील कुत्र्यांच्या कानी पडताच ते तेथे धावून आले. आलेले कुत्रे पाहताच लांडगा बासरी फेकून देऊन पळून गेला .अशा प्रकारे चतुर कोकरुने मोठ्या चतुराईने आपले प्राण वाचवले.
गोष्ट वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या
- मेंढ्यांचा कळप कुठे चरत होता?
- कोकराच्या मागे कोण लागला ?
- बासरी वाजवायला कोणी सुरुवात केली?
गोष्ट क्रमांक ३
शहाणा ग माझा राजा
मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता. अचानक त्याला मुसमुसून रडण्याचा आवाज आला. त्यांना इकडे तिकडे पाहिलं तर पायरीच्या कडेला एक फुलपाखरु पडलं होतं.ते जखमी होते.
"काय रे, काय झालं तुला ?"मनुने विचारलं
"तो गणू दुष्ट आहे .त्यांना मला पकडलं .माझे पंख फाटले."
"अरेरे"
"आता मी घरी कसा जाऊ? मला आई पाहिजे ना"
"कुठे आहे तुझं घर?"
"त्या सुर्यफुलाच्या शेतात ."
"चल मी नेतो तुला तुझ्या घरी."
"हळूच हा "
"मनुने फुलपाखराला हळूच ओंजळीत घेतलं आणि सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडलं ."
घरी गेल्यावर मनुने आईला ही हकीकत सांगितली . आईने मनुला जवळ घेतलं. त्याचा पापा घेतला आणि म्हणाली ," शहाणा ग माझा राजा तो".
खालील प्रश्नांची उत्तरे द्या
- फुलपाखराला कोणी पकडले होते?
- फुलपाखराचे घर कोठे होते?
- मनूने फुलपाखराला कसे सोडले?
गोष्ट क्रमांक ४
सिंह आणि चित्ता
राज्यकारभार फार वाढल्यामुळे सिंहाने प्रधान नेमण्यासाठी सभा बोलावली होती. त्याने आलेल्या प्रत्येकाची मुलाखत घेतली आणि कोल्ह्याची नेमणूक केली .सर्वांना ती पसंत पडली .सर्व पशु निघून गेले पण चित्ता तेथेच बसून राहिला .
सिंहाने त्याला विचारले," काय रे, काय हवे तुला ?
चित्ता म्हणाला महाराज ,"तुम्ही कोल्ह्याची नेमणूक केली हे चांगलं नाही केलं. त्याला ना रंग ,ना रूप!"
"मी बघा कसा आहे?, माझा रंग बघा, माझे डोळे कसे आहेत बघा, माझी शेपूट बघा ,माझ्यावर अन्याय झाला आहे."
सिंह म्हणाला," तू बोललास ते बरं झालं, मी मुलाखत घेतली ती प्रधानाच्या पदासाठी. हा बुद्धिमान असावा लागतो. रूप नसलं तरी चालेल .हे तुला समजत नाही हे तू सिद्ध केलंस. मी हे आधीच ओळखलं म्हणून तुला नेमलं नाही. चित्त्याला हे पटले तो मुकाट्याने निघून गेला.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- प्रधान नेमण्यासाठी सभा कोणी बोलावली ?
- प्रधान म्हणून कोणाची नेमणूक केली?
- प्रधान म्हणून कोल्ह्याची नेमणूक कुणाला आवडली नाही?
वरील गोष्टी वाचा आणि तुम्हाला गोष्टी कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे अजून गोष्ट टाकण्यासाठी प्रेरणा मिळेल.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.