1001marathiessay.blogspot.com




परीक्षा.... सावधान ....exam -marathi lekh   एक वाचनीय सुंदर मराठी  लेख 
      

       आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवतोच . फक्त आपण त्यातून शिकतो की नाही हे अत्यंत महत्त्वाचे असते. माझ्या जीवनातही असाच एक प्रसंग घडला .या प्रसंगामुळे मी माझ्या कानाला खडाच लावला.
       पिंपळनेर सारख्या शहरवजा गावातून नोकरीसाठी ज्यावेळी कोल्हापूरला जात होतो त्यावेळी मनामध्ये अनेक कल्पना घेऊन निघालो होतो .शिक्षण शास्त्रांमध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्या गोष्टी प्रत्यक्ष शाळेवर जाऊन राबवण्याची एक आंतरिक ऊर्जा मनामध्ये जागी झालेली होती. कोल्हापूर मधील शाहूवाडी तालुक्यात हजर झाल्यानंतर कासारवाडी या नावाची शाळा मिळाली. लगेच शाळेवर रुजू झालो . शाळेच्या गावा पासूनच तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घुंगुर नावाच्या गावामध्ये राहण्याची व्यवस्था झाली. ती व्यवस्था कशी झाली  याविषयी इतर लेखांमध्ये सांगेलच, परंतु आता मला तुम्हाला काही वेगळे सांगायचे आहे.
       संपूर्ण शैक्षणिक आयुष्य आणि बालपण हे सपाट भूप्रदेशा मध्येच गेलेले होते .म्हणजे थोड्याफार प्रमाणात डोंगर वगैरे अनुभवले होते, परंतु ज्यावेळी शाळेवर हजर झालो त्यावेळी निसर्गाचे खरे दर्शन घडले .      
       डोंगराच्या कुशीत वसलेली अगदी छोटीशी शाळा. इयत्ता चौथी पर्यंतच . नंतर आम्ही ती शाळा इयत्ता आठवी पर्यंत नेली. मिळालेले सर्व सहकारी फारच चांगले आणि प्रेमळ होते. मी प्रथमच घरापासून इतक्या दूर नोकरीनिमित्त राहत होतो परंतु कोल्हापूर कडची माणसे खरोखरच अगदी प्रेमळ आहेत. हे मला वारंवार जाणवत होते, आणि त्यामुळे इतक्या दूरवर देखील माझ्या वरील प्रेमाचा वर्षाव कमी होत नव्हता.
        
      घुंगुर वाडी तील विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या मागे एका घरामध्ये माझी राहण्याची व्यवस्था झाली. घुंगुर वाडी म्हणजे फक्त दोन-तीनशे लोकांची वस्ती असलेले साठ-सत्तर घरांचे खेडेगाव. गावांमधील दौलत बुवा, यशवंत बुवा हे या विठ्ठल मंदिरामध्ये दैनंदिन हरिपाठ व भजन म्हणत असत. आमच्या घरातही अध्यात्मिक वारसा असल्यामुळे मलाही वारकरी संप्रदायातील बरेच अभंग ,गवळणी पाठ होत्या. आवड असल्यामुळे मी ही भजनासाठी दररोज मंदिरात जात असे.
     घुंगुर वाडी मध्ये दोन  बसेस रात्री मुक्कामी येत असत .त्या गाडीमधील ड्रायव्हर आणि कंडक्टर मंदिराच्या ओट्यावरच रात्री झोपत असत. तर काहीजण एसटीमध्ये झोपून  घेत .हळूहळू माझी या ड्रायव्हर कंडक्टर यांच्याबरोबर ओळख जमली. त्यातील एक ड्रायव्हर मी ज्या गावातील शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होतो त्या गावाचा होता. आमची अधूनमधून भेट होत असे ,परंतु दोघांच्या कामाची वेळ सारखीच असल्यामुळे ही भेट बऱ्याच वेळा बसमध्येच होत असे. त्यांच्या प्रत्येक भेटीत आणि प्रत्येक बोलण्यात मला नेहमी असे वाटत असे की ,त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी शंका आहे .कारण की  वेगळ्या भागातून त्या ठिकाणी मी नोकरीला गेलेलो असल्यामुळे माझ्या भाषेत आणि उच्चार यामध्ये बराच फरक होता. या फरकामुळेच कदाचित त्यांच्या मनात माझ्याविषयी काही शंका असावी असा विचार मी करत असे.
           एक दिवस  कोल्हापूरच्या अंबाबाई चे दर्शन घ्यावे असे मनात आले. रविवारचा दिवस निवडला . सकाळी सात वाजेच्या पहिल्या गाडीने  कोल्हापूरला जाण्याचे ठरवले आणि पहिल्या गाडीला जे कंडक्टर होते ते माझ्या चांगल्या परिचयाचे होते .तर ड्रायव्हर आमच्या शाळेच्या गावातीलच होते. 
      गाडी चालू झाली गप्पांचा चांगला डाव रंगला .मला मुळातच गप्पा मारण्याची खूप सवय असल्यामुळे कोल्हापूर कधी आले हे काही कळलेच नाही. उतरत असताना कंडक्टर मला आवर्जून म्हणाले," की संध्याकाळी देखील आम्हीच मुक्कामी गाडीला असणार आहोत .तेव्हा परत जाताना आम्हाला फोन करा म्हणजे आपण याच गाडीने जाऊया. " मी त्यांचा फोन नंबर घेतला आणि राम कृष्ण हरी म्हणून निरोप घेतला.
       संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालया जवळ मी बस ची वाट बघत थांबलो होतो. कंडक्टर ला फोन केला गाडी पाच मिनिटातच येईल असे त्यांनी सांगितले. गाडी आल्यानंतर मात्र कंडक्टरचा चेहरा दिसणे सुद्धा मुश्किल झाले होते . गाडी प्रवाशांनी इतकी भरली होती की  नीट उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. तरीही कसाबसा बस मध्ये शिरलो .कंडक्टरच्या जागेवर जाऊन बसलो . कंडक्टर ओळखीचे असल्यामुळे तेवढा फायदा तरी झाला.
       कंडक्टर शेवटून पुढे तिकीट देत आले . त्यांना येताना बघून मी  त्यांच्या जागेवरून उठून उभा राहिलो. कंडक्टर त्यांच्या जागेवर बसले आणि मला शेवटच्या स्टॉप चे तिकीट दिले. तिकिटाचे उरलेले पैसे परत देताना त्यांच्याकडून चुकून 20 रुपये जास्त आले. हे माझ्या निरीक्षणात आले. परंतु मी त्यांना काही सांगणार तितक्यात गाडी एका बसथांब्यावर आली. त्यामुळे भरपूर लोक अचानक गाडीत चढले आणि मी  कधी गाडीत मागं जाऊन पोहोचलो हे कळलेच नाही. मागे गेल्यानंतर मनात विचार आला जाऊदे 20 रुपये तर जास्त आलेत आपल्याला तेवढा फायदा झाला. असं म्हणून मी शांत बसलो.' परंतु एक मन वारंवार सांगत होते हे आपल्या कष्टाचे नाहीत आणि ज्या नोटेला आपल्या कष्टाच्या घामाचा वास नाही ती नोट आपली नाही हे जीवन जगण्याचा आपलं साधं तत्त्वज्ञान विसरून कसं चालेल . कंडक्टर शेवटी ज्यावेळी हिशोब करतील त्यावेळी हे 20 रुपये कमीच भरतील .मग ते 20 रुपये कंडक्टरला स्वतःच्या खिशातून टाकावे लागतील. असे अनेक विचार मनात आले पैसे परत द्यावे की देऊ नये ,असा होय नाही चा मानसिक संघर्ष मनात चालू होता.
      विचारांच्या या चक्रामध्ये गाडी गावाच्या जवळ येऊन पोहोचली होती  . म्हणजे अजून दोन गाव गेलीत की आमचे मुक्कामाचे गाव येणार होते. आता गाडीतील गर्दीही बरीचशी कमी झालेली होती. शेवटून तीन नंबरच्या सीटवर मी बसलेलो होतो. गाडीतील बरीच जागा तशी रिकामी झाली होती परंतु मी तिथेच बसून राहिलो.गाडी आपल्या गंतव्य कडे वेगाने धावत होती. गाडीच्या चाकाबरोबरच माझ्या मनातील विचारांची चाके देखील गरागरा फिरत होती. प्रश्न फक्त वीस रुपयांचा नव्हता प्रश्न होता तत्वांचा .आजपर्यंतच्या आयुष्यात ज्यांच्याशी कधीही तडजोड केली नाही अशा तत्वांचा ,परंतु मन काहीसं दुर्बल बनवत होतं. आध्यात्मिक संस्कार आणि मूल्य शिक्षण अपंग होईल की काय अशी भावना मनात येत होती. विचारांच्या या खेळात गुंतलेलो असताना शेवटच्या ठिकाणावर येऊन पोहोचलो आणि गाडीतून उतरणार तितक्यात माझा हात खिशाकडे गेला आणि कंडक्टरला मी सांगितले," अहो मघाशी तुमच्याकडून वीस रुपये जास्त आले. मला कंडक्टरने ते पैसे माझ्याकडून घेतले. माझ्याकडे बघून मिस्किलपणे हसले त्यांच्या हसण्या तील अर्थ मला कळत नव्हता परंतु त्यात अर्थ मात्र नक्की होता. कंडक्टर तसे वयाने माझ्यापेक्षा मोठे होते. म्हणून वडिलकीच्या स्वरात मला म्हणाले लेकरा," पास झालास  परीक्षेत."
     मला काही समजेना तेव्हा कंडक्टर मला सांगू लागले ,"की या गाडीचे ड्रायव्हर हे तुम्ही ज्या गावात नोकरीला आहात त्या गावातील रहिवासी आहेत . त्यांनीच मला तुमची ही परीक्षा घ्यायला सांगितली. हे वीस रुपये मी मुद्दाम तुम्हाला जास्त दिले होते...."   कंडक्टर पुढचे काही बोलणार तितक्यात ड्रायव्हर त्याठिकाणी आले  ते बोलू लागले."गुरुजी, आमच्या गावात तुम्ही नवीनच आलेले आहात . या आधीही आमच्या गावात अनेक शिक्षक आले , परंतु इतक्या कमी वेळामध्ये मुलांच्या गळ्यातील ताईत बनण्याची किमया कुणाला जमली नाही. गावातील मोठ्या माणसांसह  स्त्रियाही तुमचे कौतुक करतात . बोलण्यातील अजब साधेपणा मनमोकळेपणा आणि कुणाशीही चर्चा करताना सहज दिसून येणारा तुमचा साधा स्वभाव याविषयी सगळीकडे गावात बऱ्याच वेळा चर्चा होत असते. म्हणून मी ठरवले की तुम्ही जसे इतरांना दिसतात इतरांशी वागतात तसे खरोखर मनातून आहात की नाही हे बघण्यासाठी मीच माझ्या जोडीदाराला तुमची परीक्षा अशा पद्धतीने घ्यायला सांगितली. कारण आमच्या गावाचे भविष्य ज्या हातांनी आणि ज्या मनाने घडणार आहे ते मन खरोखर त्या पद्धतीने सद्वर्तनी आणि सदाचारी आहे की नाही हे मला बघायचे होते. "
     आचार आणि विचार या दोघांमध्ये ज्यावेळी एक वाक्यता येते त्यावेळी तेच व्यक्तिमत्व खरे आणि साधे असते. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात तरीदेखील तुम्हाला अहो जाहो असे मानाने हाक मारण्यात मला आता कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवणार नाही.
    खरोखर गुरुजी तुमच्या माता-पित्याने तुमच्यावर छान संस्कार केलेले आहेत . तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..
   येथून बदली होऊन तुम्ही कधीतरी गावाकडे जाणार परंतु हे मूल्य तुम्हाला आयुष्यात तुम्ही कुठेही गेलात तरी प्रगतीपथावरच नेतील याची मला खात्री आहे. चला मी येतो बराच उशीर झालेला आहे आणि आज आम्ही थकलेलो हि आहोत."
       घराकडे जाणाऱ्या ड्रायव्हरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून ते मला कोणी व्यक्ती वाटत नव्हती तर प्रत्यक्ष माझी परीक्षाच माणसाचं रूप घेऊन आली होती असे मला वाटू लागले.
     मला चांगलाच घाम फुटला होता. त्या रात्रीच्या अंधारातही मी आकाशाकडे बघून कुठे देव दिसतो का हे शोधू लागलो, आणि देवाला धन्यवाद देऊ लागलो. देवा मोहाच्या या क्षणांमध्ये  माझ्या मनाला ढळू न देण्याचे सामर्थ्य मला दिलस त्याबद्दल मी तुझा आजन्म ऋणी आहे. कारण मोहाचा क्षण मला किती महागात पडला असता .देवा तु खरोखर दयाळू आणि कृपाळू आहेस.

   नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसातच तू माझी परीक्षा घेतलीस आणि मला पात्र ठरवलं. मोह हा वाईटच असतो आणि ज्यावेळी मन मोहाने ग्रासते त्यावेळेस माणूस अधोगतीकडे फेकला जातो . आपल्या जीवनात येणारा मोहाचा प्रत्येक क्षण म्हणजे आपली परीक्षा असते .त्यामुळे अशा मोहाच्या क्षणी सावधान व्हा. म्हणजे जीवनाच्या परीक्षेत नापास होणार नाही.


लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.



1001marathiessay.blogspot.com








कृपया ब्लॉगवर असलेल्या सदस्यता घ्या या ठिकाणी क्लिक करा व तुमचा ई-मेल टाकून ब्लॉग ला सबस्क्राईब करा . आणि ब्लॉग ला फॉलो करायला अजिबात विसरू नका.

तुम्हाला आमच्याशी तुमच्या कल्पना शेअर करायच्या असतील काही सुचवायचे असेल तर  contact us या बटणावर क्लिक करा आणि तेथे माहिती भरा. तुमच्या सर्वांच्या सूचनांमुळे  आम्हाला खूप मार्गदर्शन मिळते.


1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने