1001marathiessay.blogspot.com
आला पाऊस आला
पटपट पट
चला वाजवू टाळ्या
टपटप टप
अशी छान छान गाणे गाउन लहान - लहान मुले पावसाचे मोठ्या आनंदाने स्वागत करतात .पावसाच्या आगमनाने त्यांचे चित्त मोहरुन जाते. त्यांच्या मनाचा मोर आनंदाने नाचू लागतो . तसाच रानातला खराखुरा मोरही पावसाच्या आगमनाने आपला सुंदर पिसारा फुलवून थुई थुई नाच करून पावसाला आगमना बद्दल धन्यवाद देत असतो.
येरे येरे पावसा म्हणून स्वच्छंदाने बागडणारे लहान मुले ज्याचे स्वागत करतात तो पाऊस. शेतकरी ज्याची वाट बघत असतात तो पाऊस . प्रौढ वयातील माणसाच्या अंगाचा दाह शांत होतो तो पाऊस . सृष्टीला नवचैतन्य प्राप्त करून देणारा पाऊस. या पावसाची अशी रूपे मनाला सारखीच वेड लावतात.
पाउस येताना आपल्याबरोबर नवचैतन्याची शक्ती घेऊन येतो. आपल्या हजारो-लाखो थेंबांनी या धरणी मातेला सौभाग्यवतीचा हिरवा शालू पांघरतो .पावसाचे सौम्य रूप नेहमीच आनंददायक वाटते . मे महिन्याची सुट्टी संपून जून महिन्यात जेव्हा शाळा पुन्हा सुरू होते आणि मुले जेव्हा नवीन जोमाने शाळेत जाण्यास उत्सुक असतात तेव्हा पाऊस नेमकी आपली हजेरी लावून मुलांची व त्यांच्या पालकांची धांदल उडवून देतो. असा खोडकर पाऊसही चांगलाच लक्षात राहतो.
आपल्या धकाधकीच्या कामांमध्ये व्यस्त असलेली माणसे ज्यावेळी अचानक पाऊस येतो तेव्हा आडोसा शोधू लागतात. डोक्यावर छत्री अंगावरील रेनकोट टोपी पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून घातलेले जाकीट या सर्वांच्या दर्शनाने रस्त्यावर चालताना एक वेगळाच अनुभव मुले अनुभवत असतात. विविध रंगांचे रंगीबिरंगी जॅकेट्स रेनकोट घातलेले अनेक मंडळी रस्त्यावर फिरताना दिसू लागतात.
हाच आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ही पहावयास
मिळतो. नांगरणी , पेरणी करताना शेतातील पावसामुळे झालेला चिखल पायी तुडवताना त्याला त्रासदायक वाटत नाही. या पावसातच हिरव्यागार भरघोस पिकाची भविष्याची स्वप्ने तो पाहत तो मनोमन अगदी सुखावतो.
वडीलधारी माणसे कामावर जाताना अगर घरात बसल्याबसल्या या पावसाचे आनंदाने स्वागत करताना दिसतात. चराचर सृष्टी आनंदाने डोलू लागते . निसर्गातील या सृष्टीचे वर्णन अनेक लेखकांनी आपल्या भाषेत केलेले आढळते.
हा पाऊस थोरामोठ्यांच्या लहानांच्या आशा-आकांक्षा पल्लवित त्यांना दिलासा देतो. मने प्रफुल्लित करतो. जीवनाला सार्थकता देतो. वसुंधरेच्या घरी चार महिने पाहुणा आलेला हा पाऊस आपल्या सौम्य स्वरूपाने शांत प्रवृत्तीने कृपाकटाक्षाने वसुंधरेच्या दारात वैभवाच्या पायघड्या घालतो. वसुंधरेला धान्य ,फळे ,भाजीपाला यांचा आहेर देऊन रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ तिच्या स्वाधीन करतो व तिचे स्वागत करून तिचा निरोप घेत निघून
जातो. वसुंधरा या पाहुण्याकडे कुतूहलाने पाहत राहते पुन्हा येण्याची त्याची वाट बघत.
पावसाचे हे स्वरूप सर्वांनाच हवेहवेसे वाटते, पण या पावसाचे रौद्ररुप मात्र नकोसे होते .पावसाची संततधार कुणालाच आवडत नाही.
मुलांना खेळता येत नसल्यामुळे ती या पावसावर नाराज असतात सतत दीर्घकाळ पाऊस शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळते. उभ्या असलेल्या पिकाची नासाडी पाहतांना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. नद्या नाले भरभरून वाहतांना सर्वसामान्य माणूस धास्तावलेला असतो. आपल्या घराची होणारी पडझड उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही .
मानवी व्यवहाराचे सारे बंध या पावसाच्या हातात
आहेत .मला वाटते की , या पावसाला निसर्गातील अनभिषिक्त बादशहा असे म्हटले तर काय हरकत आहे.
पावसाचा जोर वाढत जातो पायाच्या घोट्यापर्यंत वाहणारे पाणी हळू गुडघ्यापर्यंत येते. त्यावेळी मात्र मानवाच्या चेहऱ्याचा रंग उडायला सुरुवात होते. आणि बघता बघता जीवन म्हणवणारे हे पाणी अनेक जीवांचा काळ ठरायला सुरुवात होते.
अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या पातळी मुळे अनेक ठिकाणी अपघात होतात. अनेक जण आपला जीव गमावतात. त्यांच्यावर अवलंबून असणारी कुटुंबे उघड्यावर येतात . त्यांचे संसार महापुरामध्ये वाहून जातात. अशावेळी चराचराची काळजी वाहणारा परमेश्वर डोळे बंद करून शांत का बसलेला असतो असे विचार मनामध्ये येतात.पावसाचे उग्र करून त्याच्या छातीत धडकी भरते काळ्याकुट्ट ढगांनी व्यापलेले आकाश आणि पावसाच्या वातावरणाची आठवण करून देतो तेव्हा एकदा हा पाऊस थांबेल याची वाट बघत भेदरलेली धरणी जणू मौनच धारण करते.
निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. या ब्लॉगवरील इतर निबंध वाचा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.