1001marathiessay.blogspot.com
माणूस नेहमीच असे म्हणत असतो निसर्ग आमचा मित्र निसर्ग माझा सखा. पण नुसता मित्र किंवा सखा म्हणून संबंध घट्ट होत असतात का ? एकीकडे निसर्गाला आपला मित्र म्हणायचं दुसरीकडे हाच माणूस आपल्या अविचारी कृतीने निसर्गाला सतत वेदना देत असतो. नको त्या कृती करत असतो. कधी मनुष्य प्रचंड प्रमाणात वृक्षांची कत्तल करतो. कधी कारखान्यांचे उंच उंच धुरांडे हवेमध्ये दूषित वायू सोडतात. तर कधी याच कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी नद्यांच्या स्वच्छ आणि गोड्या पाण्यात सोडून सगळे पाणीच दूषित करून टाकतो. सहाजिकच या सर्व कृतीमुळे मानवाचा मित्र असलेला निसर्ग मानवावर संतप्त होतो आणि आपला राग व्यक्त करतो. त्यासाठी तो विविध प्रकारचे रौद्र रूप धारण करतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे भूकंप होय.
विज्ञानातील विविध शोधांनी वैज्ञानिकांनी भूकंप का होतो ? याचे शास्त्रीय कारणे शोधून काढलेले आहेत. पण कधी कधी या शास्त्रज्ञांच्या कल्पनांना देखील धक्का बसतो . आता हेच बघा ना ! सह्याद्री पर्वताच्या पठारावर भक्कम खडक भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिथे कधीही भूकंप होणार नाही , असे अनेकांना वाटायचे . पण काही वर्षापूर्वीच कोयनेच्या परिसरात भूकंपाचे धक्के बसले आणि त्यानंतर काही वर्षांनी लातूरच्या भूकंपाने माणसाच्या सर्व संकल्पना व अंदाजांना धूळ चारली . लातूरचा भूकंप म्हणजे मानवाला मानवाच्या चुकीची मोठी शिक्षा होती.
पावसाळा जवळजवळ संपून सप्टेंबरचा महिनाही संपत आला होता. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस होता . सगळे लोक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या सणांमध्ये रमलेले होते . गणपतीच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आणि आता या लाडक्या गणरायाची अनंत चतुर्दशीला बोळवण करून सर्व लोक आपापल्या घरकुला मध्ये गाढ झोपलेले होते. शेतीतील कामे ही संपलेली होती. गाढ झोपेत भविष्याची स्वप्ने रंगवत एका कुशीवर निद्रा घेत असलेल्या माणसांसाठी ही चिरनिद्रा ठरली.
पहाटेला अचानक जमीन हादरू लागली आणि दगड मातीची घरे अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. घरांच्या बांधकामासाठी वापरलेले मोठ मोठे दगड ,चिरे ,विटा झोपेत असलेल्या लोकांच्या अंगावर कोसळले . सर्व माणसे काळाच्या कुशीत सामावले गेलेत. अनेक लोक जमिनीत जसेच्या तसे गाडले गेले . त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल असे दुर्दैवी मरण त्यांच्या वाट्याला आले. या गावाने आत्ताच गणरायाच्या आगमनाचे व विसर्जनाचे धामधुमीचे आणि जल्लोषाचे दिवस बघितले, त्याच गावावर भयानक काळरात्र पसरलेली होती . हसत्या खेळत्या गावांना स्मशानाची स्वरूप प्राप्त झाले होते . मृत्यूचे तांडव सुरू झाले होते. सर्वत्र रडारड आरोळ्या, किंकाळ्यांनी हाहाकार माजलेला होता . भूमातेच्या या उग्र रूपाने सर्व जण सुन्न झाले होते.
विज्ञानाच्या या युगामध्ये ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पण ज्यांनी आपले प्रियजन गमावले होते ते प्रियजन त्यांना पुन्हा कधीही मिळणार नव्हते.जशी ही वार्ता जगाच्या कानाकोपर्यात जाऊन पोहोचली तसे अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे केले. अशा दानशूर व दयावान लोकांना प्रणाम करावेसे वाटते.
चारही बाजूंनी मदतीसाठी धावून आलेले लोक भूकंपाचे ते उग्र रूप आणि प्रकोप बघून हतबल आणि दीड मूड झालेले दिसले आपण कितीही प्रगती केली तरी देखील निसर्गाच्या पुढे जाऊ शकणार नाही, हे निसर्ग माणसाला दाखवून देत होता.
भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसत होते. मदतीसाठी धावून आलेले लोक एकमेकाला मदत करत होते. तर प्रत्येक जण आपल्याला जमेल तशी मदत करत होता. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक गाडले गेलेले होते . काही माणसांना बाहेर काढण्यात यश आले होते. बचाव कार्य फार मोठ्या वेगाने चालू होते. ढिगाऱ्याखाली गाडले जाऊनही अनेक लोक किरकोळ दुखापती सह सुखरूप बाहेर आलेले होते .त्यांच्या जीवनाची वेल पुढे वाढणार होती, तर काहींच्या वंशवेलीच खुंटलेल्या होत्या.
भूकंपामुळे निर्माण झालेल्या अशा भयंकर परिस्थितीतही अनेक ठिकाणी स्वार्थ डोके वर काढत होता. काही माणसे घरांमधून मिळणारे पैसे दागिने आपल्या खिशामध्ये भरत होते. अशा माणसांसाठी जिवंत माणसांपेक्षा निर्जीव पैसाच अधिक महत्त्वाचा दिसत होता. या भयानक क्रूर समयामध्येही त्यांची विवेक बुद्धी जागृत झालेली नव्हती.
काही दिवसातच लोकांसाठी निवारे निर्मितीचे काम वेगाने सुरू झाले लोक आपल्या गमावलेल्या प्रियजनांच्या आठवणीमध्ये या निवार्यामध्ये राहू लागले. काळाच्या ओघामध्ये भविष्यात ते आपले दुःख विसरणार होते परंतु गेलेली जीवाभावाचे माणसे आता पुन्हा कधीही दिसणार नव्हती.
निसर्गाच्या या भयानक कृतीने मात्र माणसाला एक गोष्ट शिकवण दिली स्वतःच्या प्रगतीच्या कितीही गमजा माणूस मारत असला तरी देखील निसर्गापुढे तो क्षूल्लकच आहे. निसर्ग महान आहे महान होता, आणि महान राहील ज्या वेळी मनुष्य आपली मर्यादा ओलांडतो, त्यावेळी तो माणसाला त्याची लायकी दाखवून देतो.
सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा संदेश पाठवा .
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
पहाटचे सौंदर्यावर निबंध लिहून दाखवा
उत्तर द्याहटवानक्कीच
हटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.