1001marathiessay.blogspot.com




सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये आपण सर्वजण यंत्रांवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत हे सर्वांना माहीत आहे पण याची जाण मात्र आपल्याला अजिबात नाही म्हणजे बघाना यंत्र आपल्याला दैनंदिन जीवन जगताना एवढी मदत करतात आपले कष्ट कमी करतात पण माणसाला त्याची जाणीवही होत नाही. समजा हे सगळे यंत्र संपावर गेलेत तर किती फजिती होईल.

यंत्रे संपावर गेली तर.  yantra  sampavar geli tar Marathi nibandh
Kalpanatmak nibandh.

         "सगळी माणसे सारखीच . आपली काळजी कोणीच घेत नाही . आपण त्यांची इतकी मदत करतो, परंतु ही कृतघ्न माणसं त्याचीही जाणीव ठेवत नाहीत.काल तो स्पीकर सांगत होता , ते अगदी बरोबर आहे. आपण सर्वांनी संपावर जाऊ या." मी खुर्चीवर बसलेलो असताना माझ्या कानावर हे वाक्य. पडले . मी म्हटलं ,कोण बोलतय ? मग पुन्हा आवाज आला . "मी घड्याळ बोलते आहे ,तुमच्या घरातली. तुम्ही माणसं आमची काळजी घेत नाहीत आता आम्ही उद्यापासून संपावर जाणार आहोत . " सर्वप्रथम माझा विश्वासच बसत नव्हता हे यंत्र माझ्याशी बोलत आहे . 
             मी घड्याळाकडे बघितले त्यात नऊ वाजलेले होते. तेवढ्यात पुढे घड्याळ तावातावाने बोलू लागले . आता जर सुधारले नाहीतर उद्यापासून आम्ही कोणतीही कामे करणार नाहीत. मग मी सांगून टाकलं तुमच्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही .आम्ही तुम्हाला निर्माण केलेला आहे. तुम्ही आम्हाला निर्माण केलं नाही.मग मात्र घड्याळ शांत बसले. मी आपला पेपर वाचू लागलो. पेपर वाचून बराच वेळ झाल्यानंतर मला झोप लागत होती , म्हणून मी झोपण्यासाठी निघालो .

यंत्रे संपावर गेली तर

            घड्याळात बघितले तर आताही नऊच वाजलेले होते. मी थोडे घड्याळाला हाताने हलवले पण घड्याळात मात्र नऊ वाजले होते .असो मी तसाच झोपी गेलो. सकाळी लवकर शाळेत जायचे होते, पण सकाळचा गजरच वाजला नाही. झाल  शाळेच्या वेळेचे देखील बारा वाजले. घाईघाईने उठलो आणि आंघोळीसाठी हिटर चालू केला. हिटर देखील चालू होत नव्हते. मग गार पाण्याने अंघोळ केली. इतक्यात आईला गॅसवर   चहा करून मागितला. आई म्हटली गॅस चालू होत नाही सकाळपासून. चहा प्यायलाही मिळाला नाही . 
          कपड्यांना  थोडी इस्त्री फिरवावी म्हणून कपडे घेतले तर इस्त्रीही चालू होईना. शेवटी कंटाळून तसेच चुरगळलेले कपडे घातले. शाळेला जाण्यापूर्वी थोड्या बातम्या बघूया म्हणून टीव्ही चालू केला तर टीव्ही बंद. टीव्ही बंद , इस्त्री बंद हे बघून मला रागच आला. मग म्हटलं थोडंसं पाणी पिऊया. गार पाणी पिण्यासाठी फ्रीज उघडून बघितला, तर फ्रीज ही बंद पडलेला होता. मग माठातलं पाणी पिलं आणि सोफ्यावर जाऊन बसलो .आईला म्हटलं," आई जरा फॅन चालू कर ग  घाम येतो आहे." आईने फॅन चालू केला पण फॅन काही चालू होईना. सगळंच्या सगळं बंद असं म्हणून आईने पप्पांना वायरमनला बोलावून आणायला सांगितलं . 
       पप्पा वायरमनला बोलावण्यासाठी गाडी चालू करु लागले पण गाडी चालू होईना .आता मात्र मला फारच राग आला. 
        एकतर घरातली सगळी यंत्रे बंद. माझ्या शाळेचा वेळ  मला कळत नव्हता.स्कूल बस ची वाट बघून बघून मी दमलो होतो ,पण आज स्कूल बसचा  पत्ता नव्हता. तसाच रागारागाने घरातून बाहेर आलो . बघतो तर काय सगळीकडे माणसंच माणसे .. नेहमीच्या रस्त्यांवर जिथे  वाहनांची वर्दळ असायची, चालण्यासाठी खूप अडचण असायची. त्या रस्त्यावर आज एकही वाहन दिसत नव्हते. सगळीकडे माणसंच माणसे दिसत होती . ती सगळी गोंधळलेली होती. 
       गोंधळलेल्या माणसांकडे बघत मी इकडे तिकडे फिरू लागलो. रस्त्यांवर असणारे पथदिवे सुद्धा बंद होते. लाल ,पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे वाहतूक नियंत्रित करणारे दिवे देखील बंद होते .त्या ठिकाणी फक्त पोलीस उभे होते आणि ते देखील शांत होते कारण की आज रस्त्यावर वाहनेच नव्हती. सर्वत्र फार मोठी  वाताहत झालेली दिसत होते.
         सगळा झालेला गोंधळ पोलिसांना कळवावा म्हणून कोणीतरी मोबाईलवर नंबर टाकण्याचा प्रयत्न केला ,परंतु मोबाईल देखील तपाला बसल्यासारखा शांत होता. त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नव्हता. हा काय अचंबा झाला हे कुणालाही कळत नव्हते. सगळच जग थांबल्यासारखे दिसत होते.
          असाच चालत चालत बसस्थानका पर्यंत येऊन पोहोचलो तर सगळ्या गाड्या एका ठिकाणी थांबलेल्या होत्या एक हे गाडी चालू होत नव्हती चालक आणि वाहक डोक्याला हात लावून बसलेले होते. त्यांच्याकडे बघत असतानाच कुठून तरी मोठ्याने रडण्याचा आवाज येत होता आवाजाच्या दिशेने गेलो तर दवाखान्यापर्यंत येऊन पोहोचलो शस्त्रक्रियेसाठी लागणारे सगळे यंत्र बंद पडलेली होती आणि त्यामुळे एका माणसाला स्वतःचा जीव गमवावा लागलेला होता आणि त्याच्या घरातील त्याच्यावर आधारलेली माणसे मोठमोठ्याने रडत होती.

 yantra sampavar geli tar Marathi nibandh

       एक गोष्ट मात्र सगळीकडे चालु होते ती म्हणजे सर्वत्र यंत्रांची दुरुस्ती करण्यासाठी धावपळ करणारी माणसे दिसत होती पण यंत्र काही चालू होण्याचे नाव घेत नव्हते एकतर यंत्रांमध्ये काही बिघाडही दिसत नव्हता पण यंत्रे चालू होत नव्हती. आकाशात मात्र सर्व जगाला ऊर्जा देणारा भास्कर नेहमीसारखेच यंत्रवत पणे आपले काम प्रामाणिकपणे करत होता त्याचा उजेड सर्वत्र पसरलेला होता तरी देखील मात्र सर्वत्र अंधार भासत होता 
       काय करावे हे कुणालाही काही सुचत नव्हते. सगळे हवालदिल झाले होते एकमेकांशी चर्चा करत होते. आता विनाश  घडणार की काय? असेच वाटत आहे .अशा चर्चा होऊ लागल्या .इतक्यात आवाज आला; "आता आमचे महत्त्व पटले का?" हे ऐकल्यावर मला काल रात्रीचा प्रसंग आठवला. मी घड्याळाकडे बघू लागलो आणि घड्याळाला म्हटले," तूच बोलत आहेस ना?" पुन्हा आवाज आला .आता ताळ्यावर आलास वाटतं .आमचे महत्त्व कळलं का आता?
         मी मात्र शांतपणे  सर्व यंत्रांकडे  बघत होतो . यंत्रांशी बोलू लागलो." हो, आम्हाला आमची चूक कळलेली आहे. तुम्ही सर्व यंत्र आहात म्हणून आमचे जीवन अगदी सुरळीतपणे चालू आहे .तुमची काळजी घेणे ,आमचे कर्तव्य आहे .आता मात्र आमच्यावरचा हा रुसवा सोडा. सर्व जनजीवन सुरळीत चालवा. आम्ही सर्व तुमची काळजी घेऊ. अशी मी ग्वाही देतो. ठीक आहे आता सगळे काही सुरळीत होईल पण आम्हाला दिलेले वचन विसरू नका.
      आमचा संवाद संपल्यानंतर काही क्षणातच सर्व यंत्रे पूर्ववत कार्य करू लागलेत. दुःखीकष्टी झालेले सर्व माणसांचे चेहरे आनंदाने फुलून गेले .. सर्व लोक आपापल्या कामांसाठी मोठ्या उत्साहाने निघू लागले. खरोखरच यंत्रामुळे आपले जीवन किती आनंददायी आणि सुसह्य झालेले आहे.याचा मला आणि सगळ्यांनाच अनुभव आला.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने