1001marathiessay.blogspot.com






थोर समाज सुधारक 
कर्मवीर भाऊराव पाटील
      कोल्हापूरच्या मातीत अनेक नररत्न जन्माला आलेले आहेत . त्यातीलच एक रत्न म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कितीही अडचणी आल्या, संकटे आलेत तरीही त्या सर्वांवर मात करीत त्यांनी गोरगरिबांसाठी व जनसामान्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केलीत. त्यांचे जीवन चरित्र, त्यांची कर्तृत्व गाथा आपल्यापैकी कुणासाठीही प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
       त्यांची जयंती 22 सप्टेंबर या दिवशी साजरी केली जाते तर मग जरा बघूया आपण त्यांच्या कार्य वैभवाचा थोडासा आढावा.
           
          कर्मवीर भाऊराव पाटील

     कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर रोजी झाला.कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे रयतेच्या हृदयसिंहासनावरील अनभिषिक्त सम्राटच आहेत . कोल्हापूरच्या मातीत जन्मलेले भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगुबाई असे होते.
        महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण सर्वांना मिळालेच पाहिजे असा वसा घेऊन गोरगरिबांना तसेच खेड्यापाड्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम हाती घेतले होते. फुले यांच्या या कार्याचा वसा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुढे सतत चालू ठेवला हे पवित्र कार्य खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य अण्णांनी केले.
         कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे सदस्य होते याबरोबरच ते समाजसुधारक शिक्षणप्रसारक पुरोगामी स्वातंत्र्य सेनानी होते ते महात्मा गांधींचे देखील अनुयायी होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दीनदलितांच्या गोरगरिबांच्या घरापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवली आणि शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केलीत अडचणींच्या अनेकानेक डोंगर ओलांडून कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.या रयत शिक्षण संस्थेचे आता मोठ्या कर्तुत्वरुपी पर्वतामध्ये रूपांतर झालेले आहे.
    महात्मा फुले यांचा एक विचार सर्वश्रुत आहे तो म्हणजे विद्येविना मती गेली 
मतीविना नीती गेली 
नीतीविना गती गेली
 गतीविना शूद्र खचले
 इतके सगळे अनर्थ 
एका अविद्येने केले.
   फुले यांचा हाच विचार कर्मवीर अण्णांनी प्रत्यक्षामध्ये उतरवला.
      सर्वसामान्य रयतेचा विचार करून अण्णांनी 4 ऑक्टोबर 1919 मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात काले या गावामध्ये वसतिगृहाची स्थापना केली ,आणि हीच रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ होती.
      एका छोट्याशा खेड्यामध्ये स्थापन झालेली ही रयत शिक्षण संस्था पुढे 1924 साली सातारा मधील धनीणीच्या बागेमध्ये स्थलांतरित करण्यात आली.

           रयत शिक्षण संस्था सध्या फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण प्रसाराचे कार्य करत आहे.रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष आहे ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या पारंब्या सर्वत्र पसरतात अगदी त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या शाखा सर्वदूर पसरलेल्या आहेत.
          रयत शिक्षण संस्था सर्वसामान्यांची गोरगरिबांची तसेच सर्व रयतेचे झालेली आहे या संस्थेच्या माध्यमातून अण्णांचा संबंध सर्व स्तरातील जनतेशी आला. अण्णांचे प्रमाणिक कार्य बघून रयत शिक्षण संस्थेला लोकांकडून अनेक देणग्या मिळाल्या. संस्था वाढतच गेली.
       संस्थेचा विस्तार करत असताना अण्णांनी खेड्यापाड्यापर्यंत संस्थेच्या मार्फत प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू केल्या बहुजन पर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचवणारे अण्णा हे खरे कर्मयोगी आणि कर्मवीर होते. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हणजे फक्त कर्म करा फळाची अपेक्षा करू नका अगदी याच पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णांनी संपूर्ण जीवनभर कार्य केले.
    शिकता शिकता विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही व्हावी ह्या दृष्टीने अण्णांनी कमवा आणि शिका योजना प्रथमच आपल्या संस्थेमध्ये राबवली. स्वावलंबी बनवणाऱ्या शिक्षणावर अण्णांनी जोर दिला. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य बोल वाक्य आहे ,"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद".
      त्यांना ज्यावेळी 25 वर्षांचे झाले त्यावेळी लग्नाच्या बंधनात अडकले. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते.नावाप्रमाणेच लक्ष्मीबाई लक्ष्मीच्या रूपाने कर्मवीर अण्णांच्या जीवनामध्ये आणि संसारामध्ये आल्या. अण्णांच्या शैक्षणिक कार्याला त्यांनी समर्थपणे साथ दिली मुलांचे वस्तीगृहाची जबाबदारी लक्ष्मीबाईंनी समर्थपणे सांभाळली व आपल्या कर्मवीर पतीला खऱ्या अर्थाने साथ दिली.
      असे म्हटले जाते की प्रत्येक कर्तुत्ववान यशस्वी पुरुषाच्या मागे एक समर्थ स्त्री उभी असते . अगदी त्याप्रमाणेच कर्मवीर अण्णांच्या पाठीमागे लक्ष्मीबाई खंबीरपणे पर्वतासारख्या उभ्या राहिल्या.

    संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे,
जे का रंजले गांजले ,
त्यासी म्हणे जो आपुले ,
तोचि साधू ओळखावा
 देव तेथेची जाणावा
     या उक्तीप्रमाणेच या दाम्पत्याने मनात कोणताही स्वार्थ न धरता शिक्षणाची सेवा केली कर्मवीर आन सारख्या एका ध्येयवेड्या माणसाने शिक्षण संस्था स्थापन करण्याचे व शिक्षणाच्या प्रवाहात सर्वांना आणण्याचे स्वप्न बघितले. यामध्ये लक्ष्मीबाईंनी अगदी मनापासून साथ दिली.
     एकदा अण्णा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते नेमके त्याच वेळी वस्तीगृहातील धान्य संपलेले होते सगळी मुले उपाशी होते लक्ष्मीबाईंना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी स्वतःचे मंगळसुत्र गहाण ठेवण्यासाठी सेक्रेटरीच्या हातात दिले . कारण की त्यांच्या अंगावरील सर्व दागिने आधीच विकून झालेले होते. पण मुले उपाशी राहू नयेत म्हणून त्यांनी आपल्या सौभाग्याचा अलंकार असलेले मंगळसूत्र त्यांनी गहाण ठेवण्यासाठी दिले व त्या पैशातून वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना पोटभर जेवण खाऊ घातले . इतक्या समर्पण भावाने लक्ष्मीबाईंनी अण्णांची साथ दिली.
           रयत शिक्षण संस्थेचा प्रसार आणि कार्य वाढतच असताना गांधीजीनाही त्या विषयी माहिती मिळाली.25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींनी रयत शिक्षण संस्थेला भेट दिली गांधीजी सोमवार पेठेतल्या अण्णांच्या घरी आले त्याठिकाणी बॉर्डर चे उद्घाटन व नामकरण विधी पार पडला त्या बोर्डिंगला ,"छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस ,सातारा "असे नामकरण करण्यात आले.
     शिक्षक जर चांगल्या प्रकारे प्रशिक्षित असतील तर ते विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने घडवू शकतात. म्हणून शिक्षकांच्या प्रशिक्षणाला मदत व्हावे यादृष्टीने अण्णांनी 1935 झाली सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज सातारा येथे सुरू केले या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची देखील व्यवस्था त्यांनी केली याच कॉलेजचे नंतर नाव बदलून महात्मा फुले अध्यापक विद्यालय असे करण्यात आले.श्री यांनाही प्रशिक्षित करण्यासाठी आण्णांनी साताऱ्यात 1942 मध्ये जिजामाता अध्यापिका विद्यालय सुरू केले. महात्मा गांधी जी ने घेतलेला श्री शिक्षणासाठीचा पुढाकार आणि वारसा अण्णांनी देखील पुढे चालवला.
       भारताला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर खेड्याकडे चला असा गांधीजींनी दिलेला संदेश अण्णांनी देखील अनुसरला त्यांनी ग्रामीण भागांमध्ये महाविद्यालय हायस्कूल सुरू केले सन 1954 मध्ये तर शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीरांनी  तर क्रांतीच घडवली.
      कराड तालुक्यातील सैदापूर या ठिकाणी अण्णांनी महाविद्यालय सुरू केले त्यासाठी लागणारी अनामत रक्कम पंचवीस हजार रुपये पुणे येथील मंडईतल्या मंडळींनी जमा करून दिली.
      पदवीधर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी 1955 मध्ये आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन ची स्थापना केली. येथून प्रशिक्षित होऊन अनेकच दर्जेदार शिक्षक तयार होऊ लागले.
    गाडगेबाबा आणि अण्णा यांचे फारच घनिष्ठ संबंध होते गाडगेबाबांनी नेहमीच आणण्याच्या संस्थेला सर्व पद्धतीने सहकार्य केले याची जाणीव म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कराड येथील त्यांच्या संस्थेच्या महाविद्यालयाला गाडगेबाबांचे नाव दिले.
       रयत शिक्षण संस्थेचा विस्तार आता फारच वाढलेला आहे.आज संस्थेची साठ महाविद्यालय आहेत या मध्ये पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग अध्यापक महाविद्यालय इत्यादींचा समावेश आहे. अण्णांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मोठ्याप्रमाणात भरीव कामगिरी केली आहे.
    समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिक्षणा इतके प्रभावी साधन कोणतेच नाही हे कर्मवीरांना चांगलेच ठाऊक होते म्हणूनच बहुजन समाजापर्यंत शिक्षणाचे अमृत घेऊन जाण्याचे पवित्र कार्य अण्णांनी केले ज्या पद्धतीने महात्मा फुले यांना जनतेने महात्मा ही पदवी त्यांच्या कार्यामुळे दिली अगदी त्याच पद्धतीने अण्णांना ही लोकांनी कर्मवीर अशी पदवी दिली.
         कर्मवीर भाऊराव पाटील यांना केंद्र शासनाने पद्मभूषण हा किताब दिला .सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अण्णांना डि.लीट. ही पदवी दिली. कर्मवीरांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेसाठी स्वतःला वाहून घेतलेले होते. मा.ह.रा.महाजनी यांनी कर्मवीरांना महाराष्ट्राचे Booker t washington (बुकर टी वॉशिंग्टन) असे संबोधून त्यांचे यथार्थ वर्णन केले आहे.
      कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांचे जीवन म्हणजे शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचवण्यासाठी भेटत असलेला एक धगधगता महायज्ञ होता. अशा या महान कर्मयोगाची कर्मवीरांचे प्राणज्योत 9 मे 1959 रोजी मालवली.



      


      

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने