1001marathiessay.blogspot.com

संत गाडगेबाबा यांची माहिती

       असे आपण नेहमीच ऐकतो की , 
         जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | 
          देह कष्टविती परोपकारे ||. 
     संत साधू हे जगाच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर अवतार घेतात, आणि समाजाला मार्गदर्शन करतात.
      संत गाडगेबाबा यांनीदेखील समाजाला अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या  मार्गावरून ज्ञानाच्या योग्य मार्गावर आणण्यासाठी जीवनभर प्रयत्न केले . अंधश्रद्धा , अनिष्ट रुढी-परंपरा , अज्ञान याविषयी संत गाडगेबाबांनी बोलीभाषेत समाज प्रबोधन केले.

  संत गाडगेबाबा यांच्या विषयी निबंध बघण्या अगोदर संत गाडगेबाबांची काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया,,




संत गाडगेबाबा यांचा जीवन परिचय..

पूर्ण नाव:  डेबुजी झिंगराजी जानोरकर.
जन्म : 23 फेब्रुवारी 1876
मृत्यू. : 20 डिसेंबर 1956 (80 व्या वर्षी) 
          अमरावती येथे

        
      चला तर मग संत गाडगेबाबा यांच्या विषयी अधिक जाणून घेऊया. 
      

         संत गाडगेबाबा मराठी निबंध 

      महाराष्ट्राला साधुसंतांची भूमी असे म्हटले जाते . महाराष्ट्रामध्ये साधूपुरुषांची एक विशेष परंपरा आहे. या थोर पुरुषांनी लोकांना समजेल अशा साध्या शब्दात आपल्या वाणीने, कर्माने लोकांचे प्रबोधन केले. अशा महान समाज प्रबोधनकारांमध्ये गाडगेबाबांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
         गाडगेबाबांना राष्ट्रसंत असेही म्हटले जाते. लहान असल्यापासूनच राष्ट्रसंत गाडगे बाबांना भजन आणि कीर्तन ऐकण्याचा छंद होता. पुढे भविष्यामध्ये ते स्वतः कीर्तन करू लागले. गाडगेबाबाचे ठाम मत होते की, निसर्गाने फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच भेद निर्माण केलेले आहेत. परंतु माणसांनी समाजामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ , गरीब-श्रीमंत , उच्च-नीच अशा प्रकारचे भेदभाव निर्माण केलेले आहेत.  यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान होते. श्रीमंतांची पोट भरून अन्न उरत होते , तर गरिबांची उपासमार होत होती. संत गाडगेबाबांना हे बघवत नव्हते.
        गरीबांची अशी अवस्था बघून गाडगेबाबांना दुःख होत असे. ते विचार करीत असत , सुख कशात आहे ?गरीब सुखी की श्रीमंत सुखी? कोणता माणूस सुखी आहे? याचा शोध घेत होते. गावोगावी फिरत होते. त्यांच्या या भटकंतीमुळे त्यांना माणसांची सुखदुःख जाणून घेण्याची संधी मिळाली.

गाडगे महाराज

        दारिद्र्याने आणि दुःखाने पिचलेली माणसे बघून गाडगे बाबा खूपच दुखी आणि हताश झाले. त्यांनी सधन घरदार सोडून दिले . संसाराचा त्याग केला आणि मानव धर्माच्या दिशेने आपली पावले उचलली.
          गरीब आणि कष्टकरी माणूस मरेपर्यंत राबतोच आहे . भरपूर पोरेबाळे झालेले ,यांची होणारी हेळसांड, राहायला पुरेसा निवारा नाही . पुरेसे अन्न नाही, वस्त्र नाही , शिक्षण नाही , चांगले वाईट कळत नाही, घरातील कर्ता पुरुष व्यसनाधीन झालेला. कुटुंबाची सर्व दुर्दशा ,स्वच्छता अभावी रोगराई पसरलेली, औषध-पाणी नाही .अशी अवस्था बघून गाडगे बाबा समाजातील अंधश्रद्धा , अस्वच्छता, दुःख ,दारिद्र्य ,व्यसन याविषयी जनप्रबोधन करत भटकू लागले. कीर्तनातून हितोपदेश करू लागले.
          संत गाडगेबाबा प्रबोधन करत असताना बोलीभाषेचा वापर करत असत .आपल्या ओघवत्या वाणीने त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. गरीब, अशिक्षित, भोळ्याभाबड्या , खेड्यापाड्यातील कामकरी ,कष्टकरी लोकांना साध्या सुलभ वाणीने आपलेसे करून घेतले . लोकांना गाडगेबाबा आपले वाटू लागले.

 संत गाडगेबाबा यांचे विचार

        बेरोजगारांना रोजगार द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेलेल्यांना अन्न द्या , उघड्या-नागड्याना वस्त्र द्या , निराश झालेल्यांना हिम्मत द्या,  बेघरांना आसरा द्या , गरीब मुलांना शिक्षण द्या , गरीब तरुण-तरुणींची लग्न करून द्या , अंध अपंगांना मदत करा ,मुक्या प्राण्यांना अभय द्या ,बेरोजगारांना रोजगार द्या ,रोग्यांना औषध द्या.
असा गाडगेबाबांचा दहा कलमी संदेश होता.
       गाडगेबाबांची राहणी अगदी साधी होती. एका हातात फुटकं खापर . दुसऱ्या हातात खराटा. डोक्यावर बांधलेली चींधोटी ,फाटके कपडे, असा साधा वेश करून हा अवलिया महामानव मोहमाया सोडून समाजहितासाठी स्वतःची पर्वा न करता वणवण गावोगावी भटकत असे. ते आपल्या कीर्तनातून सतत 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला', असे म्हणत. आपल्या साध्या सरळ सडेतोड निर्भिड भाषेतून कीर्तनातून अज्ञानाने बरबटलेल्या समाजाला परिवर्तनाकडे घेऊन जाण्यासाठी अहोरात्र पायपीट करीत त्यांनी उभा महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. त्यांच्या या निस्सीम आणि निस्पृह कर्तृत्वामुळे भारत वर्षाने त्यांना राष्ट्रसंत गाडगे महाराज अशी ओळख मिळवून दिली.
  संत गाडगेबाबा जयंती भाषण
        माणसामाणसांमध्ये देव पहा . दगडात देव नाही . जगाची सेवा करा . गरिबांवर दया करा. नवससायास करू नका. अज्ञान सोडा, अंधश्रद्धा बाळगू नका. कर्जबाजारी होऊ नका . आपल्या मुलांना शिक्षण द्या. त्यांना शाळेत घाला. शहाण्यासारखे वागा. असे अगदी तळमळीने गाडगेबाबा सर्व लोकांना सांगत असत . गाडगेबाबा स्वतः अशिक्षित असून देखील आपल्या अनुभवातून त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान लोकांसमोर साध्या शब्दात मांडले.
          संत गाडगेबाबा यांनी जनजागृती करण्याचा लोकसेवेचा वसा घेतलेला होता. त्या काळामध्ये शिक्षणापासून वंचित असलेला समाज अंधश्रद्धेच्या आणि अज्ञानाच्या विळख्यात अडकून पडलेला होता. निरर्थक कर्मकांड मध्ये अडकून पडलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी गाडगे महाराजांनी लोकजागृतीसाठी कीर्तनाचे माध्यम निवडले.
      गाडगेबाबांनी कीर्तनामध्ये सवाल-जवाब  चालू केले . लोक विचार करण्यास प्रवृत्त होत. कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत . तुम्ही जो नैवेद्य देवाला देता, तो नैवेद्य देव खातो का नैवेद्य कोण खातो? देवापुढे ठेवलेल्या नेवैद्य कुत्रा खातो. तुम्ही घरातल्या लेकरा बाळांना उपाशी ठेवतात आणि या दगडाच्या देवाला नैवेद्य देतात. अरे मायबाप हो माझ जरा ऐका, दगड धोंडा पुजू नका माणसा माणसात देव पहा देव दगडात नाही. तो माणसात आहे अशा सवाल जबाबामुळे लोक गोंधळून जात, पण विचार करण्यास प्रवृत्त होत असे. गाडगेबाबा सांगत.,,
 देव दगडाचा केला|
गवंडी त्याचा बाप झाला||
सोडुनिया खऱ्या देवा|
करी म्हसोबाची सेवा||

     नवस-सायास करण्याला गाडगेबाबांचा कडकडून विरोध असायचा. याविरोधात ते कीर्तनामध्ये संत तुकोबांच्या अभंगांचा नियमितपणाने उल्लेख करत असत,,  जसे की

नवस खोटा देव खोटा|
रडतो भारत आपला तोटा
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन
विसरून गेले खऱ्या देवा||

     संत गाडगेबाबा यांनी अज्ञानामुळे समाजामध्ये केल्या जाणाऱ्या कर्मकांडावर घनघोर टीका केली. नुसतीच टीका केली नाही तर कर्मकांड यांमधील फोलपणा त्यांनी सिद्ध करून दाखवला. लोकांना फक्त अंधश्रद्धा म्हणजे काय एवढेच त्यांनी समजून सांगितले नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणत्याही घटनेकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन त्यांनी  माणसांना दिला.


  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .








  
         

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने