1001marathiessay.blogspot.com
कोरोनाविषाणू हा शब्द आता जवळजवळ प्रत्येक आबालवृद्धांच्या तोंड पाठ झालेला आहे. ज्याप्रमाणे कधीही शाळेचे तोंड बघितले नसेल त्यांना देखील कोविड (covid-19) हे नाव पाठ झालेले आत्ता दिसून येते .किती विलक्षण शत्रू आहे हा. उघड्या डोळ्यांनी दिसत नाही परंतु भल्याभल्यांना पाणी पाजले याने.
कोरोनाविषाणू कुठून आला? कोणाच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहे? कोणता देश प्रगत? कोणता अप्रगत? अमेरिका ,इटली यासारखे प्रगत म्हणावं असे देश या विषाणू पुढे कसे हतबल झाले? या सगळ्या चर्चा आता बंद करून समग्र मानव जातीच्या विकासासाठी आवश्यक अशा एकत्रित प्रयत्नांची वेळ आता येऊन पोहोचलेली आहे.
काळ कुणासाठीही थांबत नाही आणि कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही. हे जग जाहिर आहे त्याप्रमाणेच कोरोना परिस्थिती देखील कायमस्वरूपी राहणार नाही. परंतु आपण अगदी हा कोरोनाविषाणू चीनमधून इतरत्र सगळीकडं पसरण्याच्या वेळेपासून विचार केला तर आपल्याला असे निदर्शनात येईल की माणसाचा गाफीलपणा हा स्वभावातच असतो. म्हणजे बघा ना चीनमध्ये काही काळ हा विषाणू पसरत आहे ही बातमी सर्व जगाला माहीत होती तरीदेखील संपूर्ण जगाने चीनमधील विषाणू भारतात किंवा संपूर्ण जगात कसा येईल या गोष्टीचा साधा विचारही केला नाही. प्रगत राष्ट्र म्हणणाऱ्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष आणि चीनमधील एका कोविल ग्रस्त नागरिकाला मिठी मारली आणि बंधुत्वाचे दर्शन घडवून आणले परंतु हे आंधळे बंधुत्व काय कामाचे की जे अनेक बांधवांचे जीव घेऊन गेले.
|Corona ek jagtik Sankat nibandh in Marathi |
माणसाने चंद्रावर , मंगळ ग्रहावर यान पाठवले. त्या ठिकाणी वस्ती करण्याचे स्वप्न मनुष्याता बघतो आहे . काही क्षणात जगाच्या एका टोकातून दुसऱ्या टोकाला मनुष्य प्रवास करू शकतो. संपूर्ण जग म्हणजे एक छोटेसे खेडे झालेले आहे . इतकी प्रगती करून देखील कोरणा सारख्या अतिसूक्ष्म विषाणूचा बंदोबस्त करण्यामध्ये मानवाला घाम फुटतो आहे.
कोरोना वरील एक रामबाण उपाय सर्वांनाच माहित आहे ते म्हणजे सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अगदी काटेकोर पद्धतीने केलेला स्वीकार.
या गोष्टींचे सर्वांनी पालन केले तर कोरोनाविषाणू वर आपण नक्की विजय मिळवू शकतो हे सर्वांना माहीत आहे, परंतु तरीदेखील किती लोक या गोष्टीचे अनुसरण करतात हा एक संशोधनाचा विषय आहे.
डार्विनने अनेक वर्षांपूर्वी सांगून ठेवलेला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत सर्वांना तोंडपाठ आहे. बळी तो कान पिळी या मराठी म्हणीतून देखील तो सिद्धांत अगदी सर्वश्रुत आहे. जो सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आणि परिस्थितीशी समायोजन करून घेईल तोच टिकेल व बाकी सर्व नष्ट होतील. इतका साधा नियम आहे हा.
अनेक वर्षांपूर्वी सांगितलेला हा नियम पाळताना माणसाचे आज पाचावर धार बसते हे बघून खरोखरच खंत वाटते.
आपण फक्त भारत देशाच्या बाबतीत विचार करू या.
सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई पुणे सारख्या शहरात आणि दिल्ली या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्या येऊ लागल्यात मध्येच दिल्ली येथील मरकस यामुळे विषाणूच्या प्रसारासाठी हातभार लागला असेही सर्व बातमी पत्रांमधून प्रसिद्ध होऊ लागले. विविध न्यूज चैनल मध्ये देखील त्याविषयी सविस्तर चर्चा झाली आणि मग अनेक विचार प्रवाह आणि मतप्रवाह एकत्र येऊन त्यामध्ये भांडण तंटे निर्माण होऊ लागले जाती-धर्म याविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागल्यात. अमुक धर्म आणि तमूक धर्म कोरोनाविषाणू च्या प्रसारासाठी कारणीभूत आहेत अशा चर्चा गल्लोगल्ली रंगू लागल्या. एकमेकांवर दोषारोप करण्याची आणि दुषणे देण्याची जणू स्पर्धाच लागली. मग हळूहळू जसजसा हा कोरोनाविषाणू भयानक रूप धारण करू लागला तसे एकमेकांना दोष देण्याची सवयही बदलू लागली. माणूस हळूहळू माणुसकी शिकू लागला. जी आधुनिकतेच्या युगामध्ये मनुष्य हळूहळू विसरत जात होता.
मोठमोठ्या शहरांमध्ये परराज्यातून कामानिमित्त आलेले मजूर जिवाच्या आकांताने आपापल्या गावाकडे पळू लागले.शासनासाठीही हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे कशा पद्धतीने या प्रसंगाचे नियोजन करावे ,याबाबतीत सगळ्यांचीच तारांबळ उडालेली होती.
वृत्तवाहिन्या मध्ये आणि पेपरांमध्ये गावाकडे निघालेल्या लोकांच्या गर्दीचे फोटो पहिल्या पानांवर झळकू लागले. दूरदर्शन वरती पोलीस जिवाच्या आकांताने सर्व लोकांना शिस्तीने आपापल्या गावापर्यंत जाण्यासाठी दिशा दाखवत होते. प्रत्येक राज्याने जिल्ह्यातून आलेल्या लोकांना आपापल्या गावी परतण्यासाठी बसची व्यवस्था करून दिली होती. मरणाच्या भितीने घाबरलेले लोक कोणतेही दिव्य करून जाण्यासाठी तयार होते. बऱ्याच जणांनी पोलिसांच्या दांडक्याचा मारही खाल्ला. पण हा मार मरणाच्या भीती पुढे काहीही नव्हता.
त्याच काळात एक दुःखदायक घटना ऐकायला मिळाली ,की एक मजूर महाराष्ट्र राज्यातून आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघाला . सुमारे दीड हजार किलोमीटर अंतर चालून आपल्या गावी पोहोचल्यानंतर घराच्या दारातच मरण पावला.
कोरोनाविषाणू च्या सुरुवातीच्या काळातच इतकी भयानक अवस्था झाली होती कि मनुष्य मरणाच्या भीतीमुळे मरणाशीच दोन दोन हात करायला तयार झालेला होता.याच काळामध्ये ही मानवाच्या अंतकरणात दडून बसलेली मानवता बाहेर पडलेली बऱ्याच ठिकाणी दिसून आले.
अनेक श्रीमंतांनी गोरगरिबांच्या मदतीसाठी आपल्या तिजोऱ्या मोठ्या प्रमाणात रिकाम्या करायला सुरुवात केली. अनेक सिने कलाकारांनी देखील आपल्या उत्पन्नातील फार मोठी रक्कम भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य या सर्वांना देऊ केली. स्वतः देखील या मदत कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. रतन टाटा, सोनी सुड ,महेश बाबू, अक्षय कुमार यांसारख्या विशाल हृदयाच्या लोकांनी मनापासून मदत केली.
कारोना हे अखेरचे जागतिक संकट नाही
सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाविषाणू च्या वर्तनाविषयी सखोल माहिती नसल्यामुळे समस्त आरोग्य विभागा पुढेही फार मोठे आव्हान उभे राहिले होते. कोरोना विषाणू नेमका कसा पसरतो? कोरोना विषाणू संपर्कजन्य आहे? की संसर्गजन्य आहे? कोरोना विषाणू प्राणी आणि पक्षी या दोघांमध्ये ही पसरू शकतो का? कोरोनाविषाणू ची रचना कशी ?त्याचा जीवन काल किती? यासारख्या अनंत प्रश्नांनी माणसाला भेडसावून टाकलेले होते.
त्यानंतर भारतामध्ये 23 मार्च रोजी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. आणि लॉक डाऊन म्हणजे काय असतं ? याची ओळख संपूर्ण भारत देशाला झाली. बेदरकारपणे आणि स्वच्छंदीपणे जगणार्या माणसाला अचानक घरामध्ये बंद राहण्याची वेळ आलेली होती. याच काळात पिंजर्यातल्या पक्षी ला कसे वाटत असेल याचा अनुभव अनेकांनी घेतला. सलग अनेक दिवस दुकान बाजार बंद राहणार त्यामुळे दुकान वरती इतक्या दिवसांचा किराणा आणि भाजीपाला विकत घेण्यासाठी गर्दीचा महापूर लोटला. अशा परिस्थितीतही अनेक दुकानदारांनी स्वतःचा स्वार्थ साधून मालाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्या व स्वतःच्या स्वार्थावर कळस चढवला.
Coronaviruss
आरोग्य विभागामध्ये तर माणसाच्या जिवाचा व्यवहार होत असल्याचे ही खूप घटनांमधून उघड झाले. अनेक आरोग्य सेवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या अपरिचित आणि अदृश्य शत्रू बरोबर अगदी नेटाने युद्ध केले. मरणाच्या भितीने ज्यावेळी हजारो माणसे घरात जगून बसलेली होती त्यावेळ स्वतःचा जीव हातावर घेऊन ही संपूर्ण आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करत होती. याच काळामध्ये आरोग्य हीच खरी संपत्ती आहे याची पुन्हापुन्हा प्रचिती येत होती. पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या अनेक लोकांनी या परिस्थितीशी समायोजन न साधल्यामुळे आत्महत्या केल्याच्या ही खूप घटना या काळामध्ये घडल्या.
आपल्या प्रियजनांपैकी कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेहही अनेकांना बघायला मिळाला नाही. ज्यांना मृतदेह बघायला किंवा अग्नीदानासाठी मिळण्याची शक्यता होती त्यांनीदेखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा या विषाणूचा संसर्ग पासून वाचण्यासाठी तो मृतदेह घेणे टाळले. मृतदेह जाळण्यासाठी ही रांगेत उभे रहावे लागत होते. या सारखे भयानक दृश्य आजपर्यंत कोणीही पाहिलेले नव्हते.
|कारोनासंकट ही नव्या भविष्याची संधी
घरामध्ये राहून सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकते. हे या corona (कोरोना)काळामध्ये समजून आले.
|Work from home ही छान संकल्पना या काळामध्ये रूढ होऊ लागली आहे. घरातून काम केल्यामुळे प्रवासात जाणारा वेळ देखील कामासाठी मिळू लागलेला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे तर असे म्हणणे आहे की, या वर्क फ्रॉम होम स्कीम मुळे कार्यक्षमता वाढलेली आहे आपल्या वेळेनुसार काम करण्याची संधी मिळते एकाच वेळी ऑफिस आणि घरातील कामे देखील करता येतात त्यामुळे मनावरील ताण देखील कमी होतो. काम करताना थकवा जाणवत नाही आणि जाणवलाच तर लगेच थोडीशी विश्रांती घेता येते.
कोरोना महामारी च्या संसर्गामुळे लॉक डाऊन करण्यात आला .अनेक लोकांनी स्वतःच्या नोकऱ्या गमावल्या. नोकऱ्या गमावलेल्या लोकांनी लगेच स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम शोधले किंवा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू केला.सुरु केलेल्या व्यवसायामध्ये यश मिळविण्या शिवाय त्यांच्यासमोर दुसरे काही पर्यायच नव्हते . त्यामुळे अगदी मनापासून या व्यवसायात लक्ष दिले व खूप लोकांना सुरु केलेल्या व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाले अशा घटनाही खूप घडल्या. भविष्यामध्ये काम करण्याच्या संकल्पना पूर्णपणे बदलून जाणार आहेत. त्या दृष्टीने आता बर्याच मोठ्या कंपन्यांनी वाटचालही सुरू केलेली आहे. आता आपण स्वतःला या नवीन पद्धतीमध्ये कसे तयार करतो हे आपल्यावर अवलंबून आहे.
|Please give me an essay on covid-19 experience
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.