Benefits of lockdown 
1001marathiessay.blogspot.com
लॉकडाऊन चे फायदे




       कुटुंब  ही अशी सामाजिक संस्था आहे की ज्यामध्ये आपल्या भावनिक गरजा पूर्ण केल्या जातात. मनुष्य समाजशील व समाजप्रिय कौटुंबिक प्राणी आहे. कोरोना महामारीच्या संसर्गाच्या  अगोदर लॉक डाऊन हा शब्द देखील अनेक लोकांना माहीत नव्हता. आज मात्र अगदी अशिक्षित माणसाला देखील या शब्दाचा चांगलाच अर्थ माहित आहे.
        लॉक डाऊन मुळे अनेक चांगल्या गोष्टी देखील घडल्या. अर्थात वाईट गोष्टींची यादी ही अजिबात छोटी नाही, परंतु जीवन काही वाईट प्रसंगांमुळे थांबत नाही. ते निरंतर वाहत जाते व  पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहते.
        लॉकडाउनच्या काळामध्ये घडलेली एक सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबातील इतर सर्व लोकांबरोबर भावनिक दृष्ट्या जोडले जाण्यासाठी चांगला वेळ आणि संधी मिळाली. धकाधकीच्या जीवनामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा विस्पोट झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मनुष्य अनेक लोकांशी यांत्रिक दृष्ट्या जोडला गेला. परंतु प्रत्यक्ष स्वरुपात एकमेकांपासून प्रचंड दूर निघून गेलेला होता.
      एकाच घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे स्वतंत्र मोबाईल असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता. अगदी स्वतः पासून एक फूट अंतरावर असणारे लोक देखील एकमेकांशी बोलत नव्हते. असे बरेचसे प्रसंग मी माझ्या डोळ्यादेखत बघितलेले आहेत. बर्‍याच वेळा तर असे प्रसंग माझ्याबरोबर देखील घडलेले आहेत.
        आई-वडिलांबरोबर वेळ घालवण्यासाठी अनेक नोकर वर्गाला देखील सुवर्ण संधी मिळाली. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारा फार मोठा वर्ग बऱ्याच कालावधीसाठी आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालू शकला.कुटुंबातील प्रत्येक सदस्य मध्ये संपत जाणारा परस्पर संवाद स्थापन होण्यासाठी मार्ग मोकळा झाला.
       फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, यूट्यूब यासारख्या माध्यमांवर किती वेळ आपण घालवणार? त्यालाही मर्यादा आहेतच की! सुरवातीचे आठ-दहा दिवस या प्रसार माध्यमांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाला परंतु त्यालाही शेवटी पठार अवस्था प्राप्त झालीी. मनुष्य कंटाळले.हा कंटाळा घालवण्यासाठी आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर संवाद साधणे हाच एक पर्याय उरलेला होता. हा पर्याय आनंददायक आणिििि सोयीस्कर देखील होता.
      यातूनच मग जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागला एकमेका विषयीच्या गप्पा रंगू लागल्या. बालपणात घडलेल्या अनेक मजेशीर प्रसंगांना आवडीने चारचौघात सांगितले जाऊ लागले. त्यामुळे मनापासून आनंद मिळू लागला कारण की मनाच्या कोपऱ्यात खोलवर गाडल्या गेलेल्या आठवणी आपसूकच त्यांच्यावरची चादर फाडून वर आलेल्या होत्या.
         कुटुंबात सगळे लोक एकत्र बसून विविध प्रकारचे खेळ खेळू लागले. कॅरम , चौकट, बॅडमिंटन, लपाछपी, आंधळी कोशिंबीर यांसारखे खेळ सर्वत्र आनंद पसरवू लागले.
         एकत्रित कुटुंबात वेळ घालवताना अनेकांना कल्पक योजना सुचल्या. घरातील कुणाचा वाढदिवस असला तर अगदी प्रेमाने एकत्रितपणे वाढदिवस साजरे केले जाऊ लागले.त्यामुळे परस्परांमध्ये असलेली नात्यांची वीण अजुनच घट्ट झाली आणि संबंध दृढ होऊन आनंद द्विगुणित होण्याला हातभार लागला.







          
मित्रांनो माझा आवडता पक्षी गरुड निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव आणि प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला svbs9695@gmail.com वर तुमच्या नावासह पाठवा .तो तुमच्या नावासह प्रदर्शित करण्यात येईल.
तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला कळवा आम्ही तो निबंध तुम्हाला लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करू.




1001marathiessay.blogspot.com

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने