www.upkarmarathi.com

वाचनीय लेख - जाणीव



 वाचनीय लेख - जाणीव

लेखन - विजय साळवे,
 पिंपळनेर
 9421513078

           ज्यावेळी अनेक वर्ष निघून जातील , फक्त सूर्य आणि चंद्र आहेत तसेच तुम्हाला दिसतील,पण बाकीचं तुमच्या अवतीभवती असलेल जग सतत बदलताना दिसेल . त्या वेळी समजून घ्यावे की आपण आता तरुण नाही.
          ऋतू येतील आणि ऋतू जातील कधी थंडी जाणवेल , कधी उन्हाळा , तर कधी पाऊस ही बरसेल. आता पावसात  भिजणे नकोसे वाटू लागेल .उन्हाची दाहकता अंग पोळून काढेल. हिवाळ्यामध्ये थंडी कमी वाजावी म्हणून तुम्ही शेकोटी पेटवाल.थंडीमुळे होणारी अंगाची थरथर थांबावी यासाठी शेकोटीभोवती छान आनंदाने बसाल . शेकोटीच्या दिशेने पाय करून त्यांची थर थर थांबावी म्हणून  अधिकाधिक जवळ धराल. थोड्यावेळाने शेकोटीच्या उबेमुळे तुमच्या अंगात उष्णता निर्माण होईल आणि अंगातील थंडी निघून जाईल  . मग तुमच्या लक्षात येईल अजूनही पाय थरथरत आहेत. तेव्हा समजून घ्या , की तुम्ही आता तरुण नाहीत.

       संध्याकाळी जेवण आटपून शतपावली साठी तुम्ही बाहेर जाल. रस्त्याच्या कडेने तुम्हाला अनेक दुकाने दिसतील. त्या दुकानासमोर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लावलेल्या रंगाचे लाइट्स देखील दिसतील .साखर कारखान्याकडे जाणाऱ्या  ऊसाने भरलेल्या अनेक गाड्या दिसतील.थांबलेली एखादी गाडी बघून  त्यातील एक ऊस मोडावा आणि  तो मस्तपैकी खावा. पण तुमचे वाजणारे दात आणि ऊस मोडण्यासाठी नको म्हणणारे हात जेव्हा तुमच्या अशक्तपणा ची तुम्हाला जाणीव करून देतील तेव्हा समजून घ्या की आता आपण तरुण नाही .

नक्की वाचा 👉 उपकार 


      आज पर्यंत ज्यांचा आधार बनण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केला तीच तुम्हाला निराधार म्हणून सोडून देतील. तुमच्या मनात प्रचंड राग असेल एकेकाला चाबकाने फोडून काढावे असे विचार तुमच्या मनात येतील. ते विचार मात्र डोक्यातच राहतील तुमचे शरीर तुम्हाला साथ देणार नाही तेव्हा समजून घ्या की आता तुम्ही तरुण नाही.

       बऱ्याच दिवसांपूर्वी जे माणसे तुमचा शब्द म्हणजे प्रमाण मानत होती. तुम्ही सांगाल ती कृती करणे त्यांच्यासाठी बंधनकारक होते. तुम्ही केलेले नियम हीच घराची शिस्त अशी परिस्थिती होती. तीच माणसे तुम्ही केलेले नियम न मानता तुमच्यावर त्यांनी तयार केलेले नवीन नियम लादतील. तुम्हाला खूप वाटेल झुगारून द्यावे हे सगळे नियम. पण तसं काही होणार नाही. तुम्हाला ते नियम पाळावेच लागतील. तुम्ही कितीही प्रयत्न करा नियम न पाळण्याचा परंतु साम-दाम-दंड-भेद कोणत्याही पद्धतीने तुमच्यावरती नियम लादलेच जातील. मग एक वेळ अशी येईल की तुम्हीच त्या नियमांना शरण जाल आणि सर्व नियम पाळू लागाल. तेव्हा समजून घ्या की तुम्ही आता तरुण नाही.
    मन शांत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी शेतामध्ये जाल. ज्या शेताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाऱ्याचे मोठे मोठे भारे डोक्यावर वाहून तुम्ही सहज आणत होतात. त्याच शेतात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोकळ्या हाताने जाणे सुद्धा नको नकोसे होऊन जाईल . तेव्हा समजून घ्या की तुम्ही आता तरुण नाही.


    या सर्व त्रासातून मोकळ व्हाव म्हणून तुम्ही रागात कुठेतरी शांत ठिकाणी जाण्यासाठी घरातून बाहेर पडाल. तारुण्यात करकर वाजणाऱ्या तुमच्या पायातील चपला पुन्हा तशाच करकर वाजतील. परंतु त्याला छान साथ लाभेल ती तुमच्या गुडघ्यांच्या हाडाच्या कडकड आवाजाची. त्या वेळी हातात काठी घेतल्याशिवाय चार पाऊले चालले देखील कठीण होऊन जाईल. त्यावेळी  समजून घ्या की आता तुम्ही तरुण नाही.

     भौतिक सुखाच्या मागे धावून समाधान शोधण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला परंतु ते समाधान आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत सुद्धा मिळाले नाही .अशी एकच खंत तुमच्या मनाला सतत टोचत राहील. मग कुठून तरी मंदिराच्या गाभाऱ्यातून एखादी भूपाळी किंवा विरहिनी तुमच्या कानावर पडेल. त्या सुरांच्या दिशेने तुम्ही जाल आणि एखाद्या मंदिरात येऊन पोहोचाल. 
     भावनेने ओथंबलेले तुम्ही भगवान रामाचे नाव प्रेमाने घेण्याचा प्रयत्न कराल .परंतु त्या वेळी राम ऐवजी तोंडातून लांब शब्द येईल. त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की किती व्यर्थ आयुष्य जगत होतो आपण. मग आयुष्यातील अनेक आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतील . कोणालातरी केलेली मदत, कुणालातरी दिलेला मदतीचा हात किंवा एखाद्याच्या ध्यानीमनीही नसताना त्याचा केलेला घात . सगळं काही अगदी स्पष्ट आठवेल. पण त्यावेळी आठवण काढल्याशिवाय दुसरे काहीच होऊ शकणार नाही .असे तुम्हाला समजेल. आणि काहीसे आत्मभान जागे होईल. तेव्हा समजून घ्या की, आता आपण समृद्ध म्हातारे झालो.
         आपल्या समृद्ध म्हातारपणाची एकदा जाणीव झाली की ,मग मात्र तुम्हाला कोणत्याही नियमांचा आणि परिस्थितींचा अजिबात त्रास होणार नाही. तेव्हा तुम्ही एक व्यक्तिमत्व राहणार नाही . तर तुम्ही एक निरपेक्ष निरंजन अस्तित्व असणार. ज्याला कोणीही त्रास देऊ शकणार नाही आणि दुखवू शकणार नाही.

खालील लेख वाचायला अजिबात विसरू नका.


 
          प्रिय वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला हे एक छान कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर एखादा लेख वाचायला आवडेल तेही कमेंट करून सांगा म्हणजे मी माझ्या परीने तसा लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या साठी एक छानशी वाचनाची मेजवानी घेऊन येईल खूप खूप धन्यवाद.
      

2 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने