www.upkarmarathi.com
संतांचे महत्त्व मराठी निबंध
| santanche mahatva marathi nibandh |
संतांचे महत्त्व शब्दात वर्णन करणे म्हणजे चातकाने समुद्र प्राशन करण्यासारखे आहे.
Santanche mahatva in Marathi मानवता आणि संस्कृतीशी एकरूप झालेल्या संतांनी माणसांमध्ये देव शोधण्याची निर्मळ दृष्टी सर्वांना दिली. जीवनाचा मार्ग विशिष्ट तत्वाने जगण्याचा मूलमंत्र संतांनी दिला. पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये सगुन समाज निर्माण करून संतांनी मानवतावाद रुजवला या सर्व संत मांदियाळीला विनम्र अभिवादन.
| संत आनंदाचे मुळ आणि प्रेरणेचे स्त्रोत आहेत.
संतांची महती वर्णन करताना मला एवढेच म्हणता येईल की,
" तुम्ही संत मायबाप कृपावंत
काय मी पतित किर्ती वाणू
अवतार तुम्हा धराया कारण
उद्धराया जन जड जीव "
" सकळासी येथे आहे अधिकार " अशी रोखठोक घोषणा करीत मानव समाजातील अठरापगड जातींना संतांनी भक्तीच्या झेंड्याखाली एकत्र आणले. महाराष्ट्रातील संत मांदियाळीचे वर्णन केले तर त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली भक्त शिरोमणी नामदेव महाराज संत जनाबाई संत मुक्ताबाई संत गोरोबाकाका शांतिब्रह्म एकनाथ महाराज चांगदेव संत चोखामेळा समर्थ रामदास स्वामी संत सावतामाळी संत सोयराबाई संत कान्होपात्रा जगद्गुरु संत तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगेबाबा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी अशी मोठी परंपरा तयार होईल.
सर्व संतांनी निस्सीम भक्ती ची शिकवण दिली. संत अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी भक्ती मधून प्रेरणा देतात प्रापंचिक दुःखावर मात करण्यासाठी नैतिक सामर्थ्य वाढवण्याचा विश्वास जागवतात. दुःखी पीडित गांजलेल्या जीवांना जीवनाचा खरा अर्थ संतांनी समजावून सांगितला समाजाला परमार्थ प्रवण करून सतत त्यांच्या कल्याणासाठी संत अहोरात्र झटतात त्यामुळेच संत हे परमेश्वरा पेक्षा जास्त जवळचे वाटतात.
भक्ती ज्ञान वैराग्य या त्रिवेणी संगमाने संतांचे चरित्र प्रखर तेजाने झळकत असते. आजची पिढी ही डोळ्यांवर झापड असल्याप्रमाणे वागते आहे ही झापड दूर करण्यासाठी संत विचारांचे अंजन घालून स्थैर्यता देण्याचे कार्य करतात आणि या मध्येच उद्याचे भविष्य व जीवनाचा खरा अर्थ दडला आहे त्यामुळेच संतांनाच आनंदाचे मुळ आणि प्रेरणेचा स्त्रोत असे म्हणता येईल.
महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या मानव समाजाला संतान पासून संस्कारक्षम शाश्वत मूल्यांचा खजिना मिळाला हे संत म्हणजे साक्षात ईश्वर स्वरूप जगाच्या कल्याणासाठी विधात्यानं संतांना इहलोकी पाठवलेलं असतं. संतांनी आपल्या आचरणातून मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्श आहे आणि या आदर्श यांमुळेच महाराष्ट्राच्या लोक जीवनावर उत्तम उत्तम संस्कार झाले.
संतांनी मानवतेची गुढी उभारून माणुसकीला सर्वोच्च प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजासाठी स्वतःला समर्पित करणारे ही संतमंडळी लोक उद्धाराचे एवढे प्रचंड कार्य करु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील संत परंपरा.
सांस्कृतिक, शैक्षणिक ,आध्यात्मिक, सामाजिक यापैकी कोणतेही क्षेत्र असू द्या. यांमध्ये संत विचारांचा प्रभाव निश्चित बघायला मिळतोो. समाजाला ज्ञानप्रकाशाच्या वाटेवर आणून मोठा पुरुषार्थ संतांनी करून दाखवला आहे.
सध्याचे चित्र मात्र बदलताना दिसत आहे. संतांच्या या पावन भूमीमध्ये काळाच्या ओघात समाज पुन्हा अंधकाराच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या विचारांमुळे आपण भौतिक सुखाचे प्रमाणाबाहेर कौतुक करीत आहोत. एक सुखाच्या लालसेने माणूस आपले माणूस पण विसरत जात आहे. त्यामुळे स्वतःच्या सुखासाठी मनुष्य वाटेल ते करायला आणि कोणत्याही स्तराला जायला तयार आहे.
भौतिक सुखाला जास्त महत्त्व देत असल्यामुळे, समाजात अशांती, अविश्वास, मानसिक तणाव, संघर्ष निर्माण होत आहे. इंटरनेटच्या युगामध्ये सद्विचार वाचायला सुद्धा तरुणाईला वेळ नाही. धकाधकीच्या जीवनामध्ये तरूणाईला संतांच्या विचारांचाही विसर पडलेला आहे. भौतिक सुखाच्या आणि आभासी जगाच्या प्रेमात आज मानव पडलेला. त्यामुळेच मनुष्य जगण्याची दिशा आणि मनःशांती हरवून बसला.
आजच्या जगात प्रत्येक समाजाला व माणसाला सात्विक वृत्ती ची गरज आहे कारण संकुचितपणा आणि स्वार्थ टोकाला पोहोचला आहे मानवी विचारांना वासना आणि विकृतीची वाळवी लागली आहे व म्हणून माणसाचे व्यक्तिमत्त्व पोखरत जात आहे यासाठी समाजाच्या उद्धाराकरिता संतांचे विचार आचरणात आणण्याची नितांत गरज आहे.
संतांच्या उपकाराचे वर्णन करताना जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की,
"संतांचा महिमा तो बहू दुर्गम
शाब्दिकाचे कामं नाही येथे "
याचा अर्थ असा की संतांचा महिमा इतका दुर्गम आहे कि तो सांगणे देखील अवघड आहे . संत ज्या वाटेवरून चालतात ती वाट एवढी दुर्गम की शब्दांनी त्यांचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे , किंबहुना शब्दांचे तेथे कामच नाही कारण शब्दांमध्ये तेवढी ताकत नाही की, संतांच्या उपकारांचे वर्णन ते करू शकतात.
- नक्की वाचा 👉संतवाणी ,संतांची शिकवण
प्रिय मित्र तुम्हाला हा | संतांचे महत्त्व मराठी निबंध , | Santanche mahatva essay in Marathi कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा . तसेच संतांचे महत्त्व या विषयावर तुमच्या मनातही काही विचार असतील , तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सांगितलेले संतांचे महत्त्व या विषयावरील तुमचे विचार या ठिकाणी आम्ही अपडेट करू .खूप खूप धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.