www.upkarmarathi.com
प्रिय मित्रांनो आज मी तुमच्यासाठी डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यावर आधारित एक छान भाषण घेऊन आलेलो आहे. हे भाषण तुम्ही वाचा आणि अनेक स्पर्धांमध्ये याचा उपयोग करा.
डॉ. ए. पी. अब्दुल कलाम वर मराठी भाषण
|speech on Abdul Kalam in Marathi
|apj abdul kalam information in marathi
या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी अभिवादन करतो. येथे उपस्थित सर्व विद्यार्थी आणि माझ्या गुरुसमोर डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयी माझे मत व्यक्त करण्याची संधी मला या भाषणाद्वारे दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो .
डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणजे स्वतंत्र भारताला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे सुवर्ण स्वप्न होय. भारताचे माजी राष्ट्रपती माननीय एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणजे अगदी अजातशत्रू व्यक्तिमत्व. माझ्या डोळ्यासमोर येणार्या अनेक थोर विभूतींपैकी एक महान व्यक्ती म्हणून डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव मला घ्यावेसे वाटते. आज प्रत्येकाने त्यांचे अनुकरण केले पाहिजे.
परिस्थिती माणसाला घडवू देखील शकत नाही आणि बिघडवू देखील शकत नाही. या वाक्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम होय . घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानादेखील भौतिक जगामध्ये ज्ञानाच्या अनेक सीमा पार करणारे एपीजे कलाम म्हणजे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
अब्दुल कलाम यांचे वडील होडी चालवत असत. रामेश्वरला येणाऱ्या भाविकांना ते होडीमधून धनुष्कोडीला घेऊन जात व आणत. यातून त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी होते. मुलांच्या शिक्षणासाठी महाविद्यालयात लागणारी फी भरण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. अब्दुल कलाम यांना शिकता यावे म्हणून त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवले व त्यांना पैसे दिले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कोणत्यातरी स्त्रीचा हात असतो, असे म्हटले जाते . हे वाक्य याठिकाणी तंतोतंत सत्य झाले आहे. असे मला वाटते.
मुळातच अब्दुल कलाम यांना शिक्षणाची फारच आवड होती त्यामुळे वर्तमानपत्र विकून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि केले देखील. त्यांच्याकडे असलेल्या अचाट ज्ञानाच्या सामर्थ्याने त्यांनी भारताला संरक्षण क्षेत्रात आदरणीय स्थान प्राप्त करून दिले.
डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. विद्यार्थी म्हणून ते जरा लवकरच शाळेत गेले होते. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना विज्ञान विषयाची खूप आवड होती. तसेच भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकी यामध्ये त्यांनी आपली करिअर घडवले. प्रचंड आव्हानांचा सामना करून देखील ते वेळेत अभ्यास करू शकले. म्हणतात ना ज्याला खरोखर यश मिळवायचे असते तो अडचणी बघत नाही तर अडचणी सोडून पुढे निघून जातो त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम.
विज्ञान म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होता. अनेक वर्षे त्यांनी विज्ञान क्षेत्राची सेवा केली. शिक्षक म्हणून ते अत्यंत प्रिय होते. डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे देखील म्हटले जाते. कारण की भारताला मिसाईल म्हणजेच क्षेपणास्त्र बनवून देण्याच्या कामांमध्ये त्यांचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा आणि अतुलनीय होता व आहे.
एपीजे अब्दुल कलाम यांनी जीवनभर समग्र भारताच्या कल्याणासाठी कार्य केले. म्हणून ते आज खूप प्रसिद्ध आहेत .अगदी त्यांच्यापश्चात देखिल त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर व कृतज्ञता आहे.
मला एक गोष्ट अजून प्रकर्षाने सांगावीशी वाटते की 2002 साली डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळू लागले. राष्ट्रपती म्हणून त्यांच्या नियुक्तीला सत्ताधारी व तत्कालीन विरोधक या दोघांनीही पाठिंबा दिला. यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा किती आदरणीय आणि श्रेष्ठ होती हे लक्षात येते.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ज्यावेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला त्यावेळी ते सार्वजनिक व्याख्यानासाठी भारतीय व्यवस्थापन संस्थेकडे जात होते. आजन्म कार्यरत राहणारा सेनानी कार्य करतानाच अनंतात विलीन झाला. असेच म्हणावे लागेल...
अशा या आदरणीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मी शतशः नमन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सरतेशेवटी त्यांच्या गौरवासाठी मी असेच म्हणू शकतो की,
"मुक्या मनाने किती उधळावे
शब्दांचे बुडबुडे
तुझ्या यशाचे गाणे गाती
तोफांचे चौघडे"
प्रिय मित्रांनो तुम्हाला हा ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावरील निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.