www.upkarmarathi.com

         आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये विविध टप्प्यांवर बदल होतात .कधी हे बदल चांगले असतात तर कधी घातक सुद्धा असतात. ज्यावेळी आपल्या मध्ये चांगले बदल होतात त्यालाच आपण विकास झाला असे म्हणतो. आपले मन, भावना ,शरीर, बुद्धी ,सामाजिक जाणीव यांचा विकास झाला तर आपले व्यक्तिमत्त्व संतुलित आणि संपन्न होईल यात शंका नाही. हे सर्व जाणून घेण्याअगोदर व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हे आपण समजून घेऊया.

व्यक्तिमत्व म्हणजे काय


   व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक व्यक्ती मध्ये असणाऱ्या विविध गुणवैशिष्ट्यांचा वैशिष्ट्यपूर्ण संच होय.व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात तसेच व्यक्तिमत्त्वामध्ये सुद्धा अनेक गुणांचा समावेश करावा लागेल.

  काहीजण सुंदर आणि आकर्षक दिसणे याला व्यक्तिमत्व समजतात ,परंतु रुबाबदारपणा किंवा आकर्षक दिसणे हा व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक भाग आहे आणि तोही बाह्य भाग आहे. व्यक्ती मध्ये कोणते सद्गुण आहेत त्याचे विचार कसे आहेत त्याचे आचरण कसे आहे या सगळ्या गोष्टींचा समावेश व्यक्तिमत्त्वामध्ये होतो. 

व्यक्तिमत्त्व विकास माहिती
व्यक्तिमत्त्व विकास


   थोडक्यात सांगायचे झाले तर बाहेर स्वरूपात प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारे आणि डोळ्यांनी न दिसणारे अशा अनेक घटकांचा समावेश व्यक्तिमत्त्वामध्ये होतो. यावरून आपल्या असे लक्षात येईल की व्यक्तिमत्त्वाचे खालील प्रमाणे दोन भाग पडतात .

  • व्यक्तिमत्त्वाचे बहिरंग
  •  व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग
 माणसाचे अंतरंग आणि बहिरंग या दोघांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. हा परिणाम कसा होतो यासाठी आपण दोन उदाहरण बघूया.

     फणस आपण सर्वांनी बघितलेला आहेच फणसाचे गरे  अत्यंत गोड व  रसाळ असतात परंतु फणसाचा बाह्य भाग हा काटेरी आणि ओबडधोबड दिसतो त्याला चिकट असा डिंक येतो. या सर्व बाबींमुळे फणसाचे गरे   इतके गोड  असून देखील फणसाला मागणी कमी असते.

    दुसरे उदाहरण आपण आंब्याचे  बघूया आंब्याचे  बहिरंग बघितले तर आंबा बघताच त्याचे रूप  बघून आपल्याला तो आवडतो .खावासा वाटतो परंतु आंबा कापल्यानंतर तो आतून सडलेला निघाला असे आपल्याला दिसते म्हणजेच अजून जर तो आंबा आपण दोन दिवस काढला नसता तर तो बाहेरून देखील सडला असता.

    म्हणजे केवळ बहिरंग किंवा फक्त अंतरंग चांगली असून चालत नाही तर व्यक्तिमत्त्वामध्ये अंतरंग आणि बहिरंग या दोन्ही बाबींच्या विकासाला विशेष महत्त्व आहे.

   व्यक्तिमत्त्वाचा विकास ही एक क्लिष्ट आणि व्यापक संकल्पना आहे याची पाच अंगे पुढील प्रमाणे आहेत.


  व्यक्तिमत्त्वाची अंगे 

  1. शारीरिक विकास 
  2. भावनिक विकास 
  3. बौद्धिक विकास 
  4. आत्मिक विकास 
  5. सामाजिक विकास

शारीरिक विकास


निरोगी शरीराचे महत्त्व

      आपल्याला कोणतीही कृती करायचे असेल तर त्यासाठी शरीर हे एक माध्यम आहे आणि हे शरीर सुदृढ असेल तर आपण आपले सर्व कामे व्यवस्थितपणे करू शकतो. विविध प्रकारचे व्यवसाय किंवा नोकरी करणारे लोक खेळाडू किंवा इतरांचे मनोरंजन करणारे लोक या सगळ्यांचे शरीर चांगले नसेल तर ते आपले काम व्यवस्थितपणे करू शकणार नाहीत .त्यामुळे शरीर संपदा ही अत्यंत उत्तम प्रतीची असली पाहिजे.

     आपले शरीर जर दुबळे असेल तर आपण देशाचे काय स्वतःचेही रक्षण करू शकणार नाही. व्याधिग्रस्त आणि रोगट शरीर त्यामुळे आपण सतत दुःखी राहतो .आपल्याला वेदना होतात. आपले जगणे कंटाळवाणे आणि निरुत्साही बनते .आपल्याला आनंद उपभोगता येत नाही.

     आरोग्य युक्त  , निकोप शरीर हेच खरे धन आहे असे म्हटले जाते.

   उत्तम शरीरसंपदा म्हणजे नेमके काय

    उत्तम शरीर संपदा मध्ये खालील बाबींचा समावेश करता येईल. 

  • स्नायुचे बल व कार्यक्षमता 
  • शरीराची लवचिकता
  •  दम श्वास
  •  ज्ञानेंद्रिय व स्नायुमधील समन्वय
  • वेगवान हालचाली

   आपले स्नायू उत्तम असतील तर आपली शारीरिक क्षमता वाढते .अनेक काम करताना ताकदीची गरज असते. जसे की जड सामान उचलून नेणे ,डोंगरावर चढणे ,शेतीतील कामे करणे या सर्व गोष्टींसाठी उत्तम स्नायु बल असणे अत्यंत गरजेचे आहेत, म्हणून व्यक्तिमत्वावर याचा निश्चितच परिणाम होतो .ज्याचे   स्नायू चांगले त्याचे व्यक्तिमत्व चांगले होण्यास हातभार लागतो.
  
      कबड्डी ,खो-खो, रनिंग ,क्रिकेट या सारख्या सर्वच खेळांमध्ये वेगवान आणि चपळ हालचाली करणे गरजेचे असते . विविध यांमधील नामवंत खेळाडू आपण बघितले तर त्यांच्या अंगी चपळ हालचाली करण्याची क्षमता होती त्यामुळे ते यशस्वी झाले. चपळ हालचाली करता येणे व वेगवान पद्धतीने प्रतिक्रीया देता येणे हादेखील व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा गुण आहे.

       वेगवान हालचाली करता येण्यासाठी किंवा ताकद वापरता येण्यासाठी आपल्या स्नायूंमध्ये व अवयवांमध्ये लवचिकता असणे सुद्धा गरजेचे आहे वाकून उभे राहणे ,ओणवे उभे राहणे या सर्वांसाठी शरीरामध्ये लवचिकता असणे गरजेचे आहे, लवचिकता नसेल तर आपल्या हालचालींना मर्यादा पडतात. शारीरिक हालचाली पटकन करण्याची क्षमता म्हणजे लवचिकता होय

     कबड्डी, गायनकला, सायकलिंग , रनिंग इत्यादींमध्ये दमश्वासा वरील नियंत्रणाला महत्त्व असते.
       
     आपल्याला कोणतीही कृती करायची असेल तर आपल्या ज्ञानेंद्रिया मध्ये आणि स्नायूंमध्ये योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे. आपली ज्ञानेंद्रिये स्नायूंना आज्ञा देतात व त्यानंतरच स्नायू कृती करतात. त्यामुळे स्नायू आणि ज्ञानेंद्रियांच्यामध्ये समन्वय व्यवस्थित असला तर कोणतीही कृती सफाईदारपणे होते.

उत्तम शरीरसंपत्ती साठी काय करता येईल


     स्वच्छता

     शारीरिक स्वच्छता नसेल तर शरीर संपदा हि राहणार नाही.  केस ,हात , डोळे, जीभ , नखे या सगळ्यांची नियमितपणे स्वच्छता राखली पाहिजे. वैयक्तिक स्वच्छते सह सार्वजनिक स्वच्छतेचेही आपण भान ठेवायला हवे.
 
    आहार

  • शरीराला सर्व पोषक घटक मिळतील असा संतुलित आहार आपण घेतला पाहिजे .
  • आहार पचण्यासाठी हलका असावा. 
  • फास्ट फूड शीतपेय  जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.

   व्यायाम  व विहार

   सध्याच्या आधुनिक काळात शारीरिक व्यायाम फारच कमी झालेला आहे .त्यामुळे शरीराला पुरेसा सराव मिळत नाही. प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगासने कवायतीचे  प्रकार ,सायकल चालवणे, पायी फिरणे, टेकडी चढणे यापैकी विविध प्रकारचे व्यायाम प्रकार नियमित पणे केले गेले पाहिजे.

    काही अंतर पायी चालत जाण्याचा नियमच बनवून घेतला तर फारच उत्तम.

शिस्त (नियमितपणा)

   आपण कोणतेही काम करण्याचे ठरवले परंतु त्यामध्ये जर शिस्त नसेल तर ते काम काही दिवसांनी बंद पडते. सकाळी लवकर उठणे, सूर्यनमस्कार करणे ,सायकलिंग करणे, फिरायला जाणे या सर्व गोष्टी करणे जर आपण ठरवले परंतु त्यात शिस्त ठेवली नाही तर काही दिवसांनी हे करणे आपण बंद करून देतो, म्हणून जे ठरवाल त्यामध्ये शिस्त असणे अत्यंत गरजेचे आहे.
      

       भावनिक विकास

    
         राग ,दुःख ,भीती ,अपमान, अपराधीपणा, नैराश्य, आक्रमकता या सर्व मानवाच्या भावना आहेत .  या भावनांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. जर माणसांमध्ये भावना नसतील तर संपूर्ण जीवनच कंटाळवाणे आणि निरस होऊन जाईल.

      मानवाच्या भावनांचा विकास नीट झाला नाही तर जीवन जगतांना समायोजन साधण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. भावनिक विकासामुळे मन खंबीर बनते. मन खंबीर असले तर शरीरापासून हवे ते काम करून घेऊ शकते परंतु जर मन कमकुवत असेल तर भिमासारखा ताकदवान देह सुद्धा दुबळा पडून जाईल.

    यामुळे आपण मनामध्ये वाईट भावनांना थारा देऊ नये. हेवेदावे द्वेष तिरस्कार गर्व यासारख्या या नकारात्मक भावना  दूर ठेवाव्यात. सतत मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करावा. लक्ष असू द्या आपले मन स्वच्छ निर्मळ आणि सदा प्रफुल्लित ठेवणे आपल्याच हातामध्ये असते.

     स्वतःला नेहमी दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवून विचार करून आपले वर्तन करावे. ज्या पद्धतीने दुसऱ्या मुळे आपल्याला आपले नुकसान झालेले सहन होत नाही त्या पद्धतीने आपल्यामुळे देखील कोणाला त्रास होणार नाही याचा विचार आपल्या मनात सतत असला पाहिजे. सतत असे चिंतन केल्यामुळे आपले मन देखील व्यापक होऊन जाईल.

उत्तम भावनिक विकासासाठी काय करावे


  • सतत चांगल्या गुणांचा स्वीकार करावा . 
  • आपल्यावर झालेले टीका खेळाडू वृत्तीने घ्यावी. 
  • इतरांविषयी प्रेम बाळगावे. 
  • स्वतःचा स्वार्थ दूर ठेवून काम करावे इतरांच्या वेदनांचा आणि अडचणींचा विचार करावा.
  •  खेळ खेळल्याने देखील भावनिक विकास होण्यास मदत होते. खेळामध्ये इतरांशी जुळवून घेण्याची वृत्ती, स्वतःसाठी नाही, तर संघासाठी धडपडण्याची वृत्ती निर्माण होते. त्यामुळे खेळाडू वृत्ती आणि शिस्त आदी गुण माणसांमध्ये येतात.
  • यश किंवा अपयश यांचा विचार न करता अगदी मनापासून कोणतेही काम पार पाडावे असे केल्याने आपण निराशावादी होऊ शकत नाही आणि भविष्यात कधीही अपयश आलेच तर आपण ते पचवून त्यातून पुढे जाण्यासाठी सक्षम असतो.
  • वाचन म्हणजे मनाचे खाद्य आहे .भावनिक विकास साधण्यासाठी वेगवेगळ्या यशस्वी माणसांची ,संतांची चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचा. त्यांनी आपले ध्येय कसे प्राप्त केले याचाही मागोवा घ्या आणि आपले एक आदर्शवत धोरण व ध्येय ठेवा.
  • स्वतःमधील न्यूनगंड झटकून टाका. या जगामध्ये कोणीही सर्वगुणसंपन्न नाही त्यामुळे तुमच्यामध्ये असलेल्या त्रुटी  बद्दल जास्त विचार करत न बसता त्या क्षमता कशा वाढवायच्या याच्यावर काम करा.
  •  न्यूनगंडमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आत्मविश्वास नाही असे दिसते आणि त्यामुळे आपले सद्गुन झाकले जातात .मन दुबळे बनते आणि विविध मानसिक आजार जडतात.
  • भावनांचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे असते कोणत्याही भावनेचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष द्या .इतरांच्या भावनांचा आणि मनाचा विचार करा  .यामुळे आपले मन विशाल होते.
  • इमोशनल फ्रीडम थेरपी म्हणजेच भावनांचे विरेचन पद्धतीचा वापर करायचा म्हणजेच काय, तर एखाद्या घटनेमुळे आपल्याला राग आला तर ते कागदावर लिहायचे आणि मग तो कागद फाडून टाकायचा यामुळे आपल्या मनाला शांत होण्यासाठी व आपला राग जाण्यासाठी मदत होते.
  • कोणत्याही प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये साठवून ठेवू नये .आपले मित्र शिक्षक ,आई-वडील, भाऊ-बहीण इत्यादींविषयी आपल्या मनात ज्या भावना असतील त्या त्यांच्यासमोर व्यक्त करा म्हणजे हलके वाटेल.
  • चांगले चित्रपट नाटके बघा कथा ऐका वाचा कविता गाणे म्हणा या सर्वांमुळे भावनिक विकास होतो.

बौद्धिक विकास


     सजीवांमध्ये असणारे विचार करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी होय. एखादी समस्या समजून घेणे त्याच्यावर विचार करणे त्या समस्येचे विश्लेषण करणे आणि त्यातून एखादा निष्कर्ष करणे किंवा त्या समस्येच्या मुळाचा शोध घेणे या सर्व गोष्टी आपण बुद्धी च्या मदतीने करतो.

     शारीरिक वाढीला मर्यादा येतात परंतु बुद्धीची वाढ सतत होत राहते .ती कधीही थांबत नाही. आपण कोणत्या परिसरात राहतो कोणत्या लोकांच्या संपर्कात राहतो आपले सामाजिक,आर्थिक , भौगोलिक परिस्थिती कशी आहे? आपला मित्र परिवार, आपले नातेवाईक, शाळेमधील वातावरण ,शिक्षण या सर्व गोष्टींचा आपल्या बुद्धीवर नक्कीच परिणाम होतो.

      सातत्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे ती अधिक तल्लख होत जाते. ज्या क्षमता आपल्यामध्ये नाहीत किंवा कमी प्रमाणात आहेत त्या क्षमता प्राप्त करण्याचा सतत प्रयत्न केला म्हणजे बुद्धी तल्लख होत जाते.

बौद्धिक विकास साधण्यासाठी काय करावे?


  •     आपल्यासमोर जी अडचण किंवा समस्या आहे तिचे विश्लेषण करावे .त्या समस्येच्या  मागे कोणकोणते कारणे आहेत, त्यासंबंधी चिंतन करावे. गृहीतक मांडावे. मग विविध तर्कांच्या साह्याने गृहीतकांची सर्व बाजूंनी तपासणी करावी आणि समस्येच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर समस्या सोडवण्याचा मार्ग शोधावा.
  • बौद्धिक विकास साधण्यासाठी सतत आपली जिज्ञासू वृत्ती जागी ठेवली पाहिजे कोणत्याही समस्येचा वेध घेताना कल्पनाशक्तीचा वापर केला पाहिजे याबरोबरच कृतिशीलता हे असली पाहिजे कोणतीही समस्या सोडवण्यासाठी विचारांना कृतीची जोड तर द्यावीच लागेल.
  •  आपल्या मनावर ज्या घटनांमुळे ताण येतो त्या घटनांना मागील कारणांचा शोध घेऊन ती कारणे पुन्हा निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारणे नष्ट केल्यामुळे ती अडचण पुन्हा निर्माण होणार नाही व मनावरील ताण नाहीसा होऊन मन शांत होईल. मन शांत झाल्यामुळे बुद्धीच्या विकासाला चालना मिळते.
  • अनेक प्रकारची कोडी, प्रश्नांची उत्तरे शोधा.
  • विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आणि परिसंवाद यामध्ये सहभागी व्हा.
  • विविध प्रकारचे वाचन करा. छंद जोपासा आणि प्रकल्प तयार करा.
  • वरील सर्व कृतीमुळे बुद्धीच्या विकासाला चालना मिळते.

सामाजिक विकास


     मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जाते सर्वांपासून दूर पूर्णपणे एकटा मनुष्य राहू शकणार नाही. मनुष्याला इतरांची सोबत लागतेच. सर्व समाजाच्या या सहाय्यानेच आपले व्यक्तिमत्त्व घडत असते या बदल्यात आपणदेखील समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये असली पाहिजे.

       अशी भावना मनात ठेवून आपण जी कृती करतो अशा कृती मधूनच आपला सामाजिक विकास दिसतो.

       ज्या समाजामधून माझा विकास होतो आहे त्या मानव समाजासाठी काहीतरी करणे हे माझे कर्तव्य आहे, ही भावना एक पवित्र भावना आहे.

     समाजात वावरत असताना आपल्या मनाला येईल तसे बेजबाबदार आणि बेदरकारपणे वागू नये. अलिखित सामाजिक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
  आपल्याला मिळालेल्या हक्का बरोबरच इतरांच्या हक्कांचे देखील रक्षण करणे आपली जबाबदारी आहे.


  सामाजिक विकास साधण्यासाठी काय करावे?

  1.      इतरांशी संवाद साधताना आपला आवाज आपला स्वर हावभाव यामधून त्यांच्या भावना दुखावणार नाहीत किंवा त्यांचा अपमान होणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे.
  2. समोरच्या व्यक्तीशी नम्रपणे बोलावे.
  3.  इतरांची कुचेष्टा टाळावी .
  4. त्यांच्यावर अकारण टीका करू नये.
  5.  आदराचे ,मैत्रीचे नाते तयार करावे.
  6. आपला विकास साधतांना समाजाचे हित कसे होईल याचा विचार करावा.
  7. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी एकत्र येऊन आनंदाने काम करावे.

आत्मिक विकास


   चांगले काय आणि वाईट काय हे ओळखण्याची क्षमता म्हणजेच विवेक होय . त्यालाच सद्सद्विवेक असेदेखील म्हणतात.  या सद्सद्विवेक बुद्धीचा विकास म्हणजेच आत्मिक विकास होय.ज्याचा हा विकास झाला त्याचा आत्मिक विकास झाला असे म्हणण्यास हरकत नाही.

    आपल्या मनातील सर्व वाईट भावना विकार नष्ट होऊन ज्या वेळी मनाला सात्विक रूप मिळेल ,त्याच वेळेस खरा आत्मिक विकास झाला असे म्हणावे लागेल.

   मी आणि माझे याच्या पलीकडे जाऊन आपला समाज आपले कुटुंब आपले देश या सर्वांशी एकरूप होता आले पाहिजे . ज्या वेळी हे समजेल त्यावेळी आत्मिक विकासाच्या दृष्टीने आपण अग्रेसर होऊ.

    मी ची जाणीव होणे म्हणजेच आत्मिक विकासाचा पाया होय. आपल्या आत्मिक विकासासाठी अनेक घटकांची मदत होत असते. आपले शिक्षण पण पालन पोषण होत असताना आपल्यावर जे संस्कार झालेले असतात हे संस्कारच आपला आत्मिक विकास घडवून आणण्यास सहाय्यभूत ठरतात.
    परिसरातील लोकांची जगण्याची पद्धत माझी परिस्थिती वाचन विविध बाबींचे निरीक्षण यासारख्या अनेक घटकांचा आपल्या आत्मिक विकासावर परिणाम होत असतो.

    मनातील कटकारस्थाने, वाईट प्रवृत्ती, किल्मिषे या सर्वांचा नाश होण्यासाठी संस्कारांची मदत होते आणि आपल्याला निरामय निकोप व्यक्तिमत्त्व प्राप्त होते.

    एकत्रितपणे बघितल्यास आपल्या असे लक्षात येईल की व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण व योग्य विकास होण्यासाठी भावनिक बौद्धिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक अशा पाचही अंगांचा समतोल विकास होणे आवश्यक असते.

      प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय | व्यक्तिमत्त्व विकास माहिती माहीतीपर लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला याविषयी अजून अधिक माहिती हवी असेल तेही सांगा .
खूप खूप धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने