www.upkarmarathi.com

लोकमान्य टिळक माहिती

प्रिय मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण लोकमान्य टिळक माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत. या माहितीचा उपयोग तुम्ही लोकमान्य टिळक निबंध यामध्ये देखील करू शकता.


लोकमान्य टिळक यांची माहिती 

     |Lokmanya Tilak Information Marathi,आपलं सारं आयुष्य देश कार्याला वाहणाऱ्या देशभक्तांचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे अग्रणी होते. त्यांच्या आधीच्या पिढीत देश कार्याचे व लोकसेवेचे व्रत घेऊन उभ  आयुष्य सर्वस्वी त्यासाठी खर्च करणारी माणसं विरळच होती.


    टिळक म्हणाले होते,

 'देशाच्या निकृष्ट अवस्थेच्या विचारांनी  माथे  भडकलेले आम्ही तरुण आहोत.'

  टिळकांच्या जहाल विचारांमुळे इंग्रज सरकारच्या दरबारी ते ‘राजमान्य’ कधीच झाले नाही ; परंतु लोकांच्या दरबारी मात्र ते 'लोकमान्य' झाले.

जन्म 


      अखिल भारताला हेलावून सोडणाऱ्या या लोकोत्तर पुरुषाचा जन्म  रत्नागिरी(चिखली ) येथे 23 जुलै 1856 रोजी झाला.वडील गंगाधर पंत हे संस्कृत पंडित आणि गणित विषयाचे तज्ज्ञ होते.त्यांच्या विद्वत्तेचा  टिळकांवर खोल परिणाम झाला. संस्कृत आणि गणित  त्या दोघी विषयांवर पुढे त्यांनी प्रभुत्व मिळवलं. मॅट्रिक पास झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी टिळक पुण्याच्या डेक्कन कॉलेजात दाखल झाले.

आरोग्याचे महत्त्व 


      टिळक पुण्याला आले तेव्हा किरकोळ शरीरयष्टीचे होते . कॉलेजातले त्यांचे मित्र त्याच्या वरून त्यांची चेष्ठा   ही करत. टिळकांनाही प्रकृतीचे महत्त्व पटलं. मग वर्षभर त्यासाठी अभ्यास बाजूला ठेवला, भरपूर व्यायाम केला. शरीर वज्रासारखं केलं. त्या दणकट सुदृढ प्रकृतीमुळे पुढच्या अधिक शारीरिक कष्टांना हसत हसत तोंड दिलं.

       या काळातले त्यांचे जवळचे मित्र  गोपाळ गणेश आगरकर. दोघेही बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न आणि विचारी. दोघेही अधाशासारखे वाचत .त्यावर चर्चा करत. दोघांच्याही बुद्धीला विलक्षण धार. दोघांनाही एकत्र प्रश्न बेचेन करत असत .आपल्या देशाचा इतिहास इतका समृद्ध, संस्कृती इतकी महान मग आम्ही आज परकीयांचे गुलाम का? भारताला या निकृष्ट अवस्थेतून बाहेर कसे काढता येईल?

देशसेवेचे व्रत 

       या प्रश्नाचं दोघांनाही उत्तर मिळालं, ते एकच होतं .आपल्या लोकांचे अज्ञान दूर केल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही. त्यासाठी लोकांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावर नव्या विचारांचा प्रभाव पाडला पाहिजे. त्यांना जागं केलं पाहिजे. जागृतीच्या कार्यासाठी आपलं सारं आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी निश्चय केला.

    अशाच विचारांचा भारलेल्या एका व्यक्तीशी टिळक-आगरकर यांची भेट झाली .ती व्यक्ती बद्दल विष्णुशास्त्री चिपळूणकर  . विष्णुशास्त्री चिपळूणकर जबरदस्त ताकदीचे  लेखक होते. मराठी भाषेचे  शिवाजी म्हणून  ओळखले जातात. असं त्याचं भाषेवर प्रभुत्व. तसेच या देशावर प्रेम. भारतीयांचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी त्यांनी सांगितलं ,

आमच्या देशाला काही झालेलं नाही आणि त्याची नाडी  अगदी साफ आहे. 

     त्यांना इंग्रजांची सत्ता मुळीच मान्य नव्हती. पाश्चात्य विद्याबद्दल मात्र त्यांना आदर होता. त्या विद्येतील वैज्ञानिक दृष्टी तंत्रज्ञान,स्वातंत्र्य इत्यादी विचारांनी ते प्रभावित झाले होते.
    
     या मंडळींनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज काढलं . टिळकांच्या समाज कार्यास सुरुवात झाली. शिक्षणसंस्थे प्रमाणेच दुसर प्रभावी साधन म्हणजे वर्तमानपत्र. 

    टिळक आगरकरांनी मराठी भाषेत केसरी आणि इंग्रजी भाषेत मराठा वर्तमानपत्र सुरू केली . वर्तमानपत्र बृहत्तर जीव्हा म्हणजे विशाल जीभ आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे मत टिळक-आगरकर यांना पटत होतं. या जिभेने आपण  लोकांची गाऱ्हाणी चव्हाट्यावर मांडली पाहिजेत, असं त्यांना वाटे. त्याचप्रमाणं लोकांना विचारांच्या दिशा दाखवल्या पाहिजेत, असेही ते मानत. दोघेही पट्टीचे लिहिणारे. अनेक विषयांवर त्यांचे लेखन चाले.

     जिथे अन्याय, भ्रष्टाचार दिसेल, तिथे जबरदस्त प्रहार करत.याच अन्यायाच्या चीडेपोटी  टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधव बर्वे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. बर्वे कोर्टात गेले.कोर्टाने टिळक आगरकर यांना अब्रूनुकसानीच्या  खटल्यात दोषी ठरवलं. दोघांना 101 दिवसांचा तुरुंगवास झाला.

तुरुंगवास 

     लोककार्यासाठी तुरुंगात जाणारे टिळक आगरकर हे पहिले संपादक होते.सुटून आले तेव्हा आम जनतेने त्यांचा सत्कार केला. ज्योतिराव फुलेंसारख्या महात्म्यान त्यांचं कौतुक केलं. यानंतरच्या काळात राजकीय क्षेत्रातल टिळकांचे कार्य सतत वाढतच गेलं ,तरी शिक्षकी पेशाची त्यांना असलेली ओढ अखेरपर्यंत कायम होती. 

एकदा कोणीतरी त्यांना विचारलं,

'समजा,या क्षणी स्वातंत्र्य मिळालं तर तुम्ही काय कराल?'
टिळक तात्काळ म्हणाले,
"पुन्हा शाळेत जाऊन गणित शिकवीन!"

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य


          टिळकांनी केसरीतून लोकांची राजकीय जागृती करण्याचा चंग बांधला. लोकांना संघटित करणे, संघटितपणे विचार करायला शिकवणे हे राजकीय जागृतीच पहिलं पाऊल. त्यासाठी टिळकांनी "शिवजयंती"व "गणेशोत्सव"हे दोन  सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची प्रथा सुरू केली. तिकडं 'केसरी' च्या गर्जना आणि दुसर्‍या बाजूनं या उत्सवातील देशभक्तीपर  व्याख्यान, राष्ट्रप्रेमाची गाणी यांनी समाज खडबडून जागा होऊ लागला . 

    एका नव्या युगाच वारं वाहू लागलं. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दुष्काळ आणि प्लेग या आपत्तींनी महाराष्ट्रात हाहाकार उडवला होता . लोकांना धीर देणे, त्यांना योग्य दिशा दाखवण्याची आवश्यकता होती. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारने काही नियम तयार केले होते. या नियमावलीला "फेमिन कोड" असं म्हणत. 
    
     इंग्रज अधिकारी या नियमांना धाब्यावर बसवत .दुष्काळातही सारा वसुली करत .गरीब अज्ञानी, जनता अशी नागवली जात असे .टिळकांनी फेमिन कोडचे मराठी भाषांतर करून छापले. त्याच्या प्रति गावोगाव वाटल्या. दुष्काळग्रस्त भागांमध्ये दौरे केले. शेतकऱ्यांना सांगितले ,"राज्य कायद्याचे आहे. अधिकाऱ्यांची दंडली चालणार नाही. निर्भय बना . सरकारी अधिकाऱ्यांच्या अरेरावीला घाबरू नका ." यामुळे लोक निर्भय बनले सरकारी अधिकाऱ्यांचा दबदबा कमी झाला.


     दुष्काळाप्रमाणेच प्लेगणेही महाराष्ट्रात थैमान घातले होते. हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. सरकारी व्यवस्था अपुरी होती आणि सरकारी नोकरशाही पेपरवा होते. टिळकांनी गावोगाव जाऊन रोग्यांच्या  छावण्यांची पाहणी केली. सरकारला सूचना केल्या. लोकांनी आधुनिक वैद्यकीय ज्ञानाचा फायदा घ्यावा असा सल्ला दिला. पुण्यातही प्लेगणे कहर माजवला .खुळ्या समजुतींमुळे लोक रोगी दडवून ठेवत. सरकारने याविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी रॅंड नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली.

    रॅंडचे अधिकारी आणि शिपाई घराघरात शिरून रोगी शोधत. हे करत असताना त्यांनी लोकांचे रीतीरिवाज, धर्मकल्पना यांचा विचारच केला नाही आणि परिणाम व्हायचा तोच झाला .लोक संतापले जुलूमशाहीने संतापलेल्या चाफेकर बंधूंनी गोळी घालून रँड ची हत्या केली.

    रँड ची हत्या झाल्यामुळे सरकार बिथरले. धरपकड सुरू केली .आधीच लोक प्लेगणे बेजार होते. त्यात सरकारी छळाची भर पडली . टिळकांनी रँडच्या वधाचा निषेध केला. त्याबरोबरच सरकारी अत्याचारांचाही धिक्कार केला. .सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा स्पष्ट सवाल त्यांनी केसरीच्या अग्रलेखातून विचारला.

     आधीच बिथरलेल्या सरकारने टिळकांवर खटला भरला. टिळकांना दीड वर्षाची सक्त मजुरीची सजा झाली . सारा भारत देश हादरला  आणि संतापला सुद्धा .लोकांच्या मनातील सरकारची आणि तुरुंगाची भीती कमी झाली .
 पुढच्या काळात तर तुरुंग हे भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे जणू पवित्र स्थानच झाले. स्वार्थत्यागाच्या एका महान परंपरेला सुरुवात झाली.|Lokmanya Tilak Information Marathi

    वाढत्या राष्ट्रवादाला आळा घालण्यासाठी 1905 साली इंग्रजांनी बंगालची फाळणी केली.  सारा बंगाल संतापून उठला. "वंदे मातरम" च्या गजराने आसमंत दणाणला .बंगालवर अन्याय म्हणजे भारतावर अन्याय असे टिळकांनी सांगितले. या अन्यायाविरुद्ध सगळ्या भारतीयांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. अन्यायी सरकार विरुद्ध लढा दिला पाहिजे असा संदेश टिळकांनी दिला.

        लढ्याला सूत्रबद्धता यावी म्हणून स्वराज्य ,स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण असा चौपदरी कार्यक्रम आखला. ठिकठिकाणी परदेशी मालाच्या होळ्या झाल्या लोकांनी स्वदेशी माल  वापरण्याच्या आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या शपथा घेतल्या. गावोगावी राष्ट्रीय शाळा उघडण्यात आल्या. साऱ्या देशभर असंतोषाचा डोंब उसळला.

      या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेच आहेत याविषयी सरकारला खात्री होती म्हणून सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला 1908 साली  टिळकांना सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. टिळक म्हणाले ,"कदाचित नियतीचीच अशी इच्छा असेल की मला शिक्षा व्हावी आणि माझ्या हाल अपेष्टांतून माझ्या कार्याला शक्ती लाभावी." सरकारने टिळकांना ब्रह्मदेशात मंडाले इथे तुरुंगात ठेवले. मंडालेचा तुरुंग भयंकर होता. हवा रोगट. दुपारी उष्णता इतकी की जीवाचे पाणी पाणी व्हावे.

     असे असून देखील एखाद्या योग्याप्रमाणे टिळक अविचल होते .आपल्या सहा वर्षांच्या बंदीवासात त्यांनी गीतारहस्य हा भगवद्गीतेवरचा विद्वत्ता पूर्ण ग्रंथ लिहिला .भारताचे पितामह दादाभाई नवरोजी यांनी दिलेल्या "चळवळ करा ,चळवळ करा अखंड चळवळ करा." या संदेशाचा तात्विक पाया टिळकांनी स्पष्ट केला.

    1914 साली टिळक मंडालेहून सुटून परत आले साऱ्या देशाला आनंद झाला त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक मरगळ आली होती. टिळकांच्या सुटकेमुळे ही मरगळ दूर झाली. देशात उत्साहाचे वारे पुन्हा खेळू लागले .टिळक पुन्हा कामाला लागले त्यांनी ऍनी बेझंट यांच्याबरोबर होमरूल चळवळ सुरू केली. होमरूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार आपण स्वतःच पाहणे -स्वराज्य . होमरूलचा प्रसार करण्यासाठी टिळक गावोगाव हिंडले ."स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच". अशी स्फूर्तीदायी घोषणा त्यांनी केली.
  
       भारतीय स्वातंत्र्यसंग्राम ही कोण्या एका जाती धर्माची किंवा वर्गाची मिरास नाही असे टिळकांचे मत होते त्यांना सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळाला या संग्रामात हिंदू मुस्लिमांची एकजूट बळकट व्हावी या दृष्टीने 1916 साली  त्यांनी एक करार घडवून आणला तो लखनऊ करार म्हणून ओळखला जातो.

     कामकरी वर्गाविषयी टिळकांना विशेष आस्था होती .त्यांना संघटित केले पाहिजे .कारण ती एक प्रचंड शक्ती आहे याची त्यांना जाणीव होती. आयटक या कामगार संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी टिळकांची निवड झाली होती.

    भारतीयांनी उपमंडूक वृत्तीने राहू नये. साऱ्या जगातील घडामोडींची दखल घ्यावी .असं लोकमान्य यांना वाटत असे. म्हणून केशरी व मराठा या वृत्तपत्रांमधून ते अशा विषयांवर लेखन करत असत.
   रशियामध्ये 1917 साली  झालेल्या क्रांती विषयी त्यांना विलक्षण उत्सुकता होती . त्यांनी केशरी मध्ये या क्रांतीवर एक लेखमाला प्रसिद्ध केली.

    टिळकांचा कामाचा उरक जबर होता .त्यांचे कार्यक्षेत्र केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्व अनेक दिशांनी फुललेले होते .एक विवेकनिष्ठ ,विचारी तत्त्वज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती होती. गीतारहस्य प्रमाणेच त्यांनी ओरायन आणि आर्टिक होम इन द वेदाज हे विद्वत्ता पूर्ण ग्रंथ लिहिले .गणित आणि खगोलशास्त्र यांच्या मदतीने त्यांनी एक शास्त्रशुद्ध पंचांग तयार केले.

  आयुष्यभरातील देश कार्याच्या धकाधकीने टिळक थकले होते .तरीदेखील धडपड चालूच होती. अखेर हा पहाडासारखा माणूस आजारी पडला. 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईला त्यांचे देहावसान झाले . एक प्रलयंकारी झंजावात शांत झाला.

faqs


लोकमान्य टिळक यांचा जन्म ?

23 जुलै १८५६

लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव?

बाळ (केशव)गंगाधर टिळक

 लोकमान्य टिळक पुण्यतिथी ?

1 ऑगस्ट 1920

लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

गीतारहस्य

लोकमान्य टिळक यांचा जन्म कोठे झाला? 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखलगाव (चिखली)

लोकमान्य टिळकांनी इंग्रजी भाषेत कोणते वृत्तपत्र सुरू केले?

मराठा

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव कधी सुरू केला?

लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने